ETV Bharat / international

इराणमध्ये वातावरण चिघळलं, इंटरनेट आणि टेलिफोन सेवा बंद; हजारो निदर्शक रस्त्यांवर

इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून महागाई आणि पडत्या चलनाच्या मुद्द्यावरून निदर्शनं सुरू आहेत. गुरुवारी रात्री (8 जानेवारी) ही निदर्शनं आणखी तीव्र झाली.

iran massive protests
इराणमध्ये वातावरण चिघळलं (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 2:32 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

तेहरान : इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली निदर्शनं आता तीव्र होऊन हिंसक बनली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या अनेक शहरांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याचं वृत्त आहे. निदर्शक देशाचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. इराणी मानवाधिकार स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरच्या अखेरीस आंदोलन सुरू झाल्यापासून किमान 45 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

वाढती महागाई आणि घसरत्या चलनामुळे जनतेचा उद्रेक : खरं तर, इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून महागाई आणि पडत्या चलनाच्या मुद्द्यावरून निदर्शनं सुरू आहेत. गुरुवारी रात्री (8 जानेवारी) निर्वासित युवराज रझा पहलवी यांनी लोकांना घराबाहेर पडून इस्लामिक राजवटीविरुद्ध निदर्शनं करण्याचं आवाहन केलं. यानंतर जनतेची निदर्शनं आणखी तीव्र झाली आहेत. रझा पहलवी यांच्या आवाहनानंतर, मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, इराणी सरकारनं रस्ते मोकळे करण्यासाठी सुरक्षा दल तैनात केले आहेत. इराणच्या किमान 50 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत असल्याचं वृत्त आहे. लोक रस्त्यावर उतरून इराणी राजवटीविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी जनतेला पाठिंबा व्यक्त केला असून म्हटलं आहे की, जर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांना सोडलं जाणार नाही. दरम्यान, 1979 च्या इस्लामिक क्रांतीच्या आधी, इराणचे तत्कालीन शाह मोहम्मद रझा पहलवी अमेरिकेत पळून गेले होते. त्यांचा मुलगा, क्राउन प्रिन्स रझा पहलवी हे सध्या अमेरिकेत निर्वासित जीवन जगत आहेत.

रझा पहलवी काय म्हणाले? : निर्वासित युवराज रझा पहलवी यांनी लोकांना रस्त्यावर उतरून इस्लामिक रिपब्लिकविरुद्ध निषेध करण्याचं आवाहन केलं. एका निवेदनात पहलवी म्हणाले की, "जग इराणवर लक्ष ठेवून आहे. रस्त्यावर उतरा आणि एकत्र या आणि तुमच्या मागण्या मोठ्यानं मांडा. मी इस्लामिक रिपब्लिक, त्यांचे नेते आणि रिव्होल्यूशनरी गार्ड यांना इशारा देतो की, जग आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तुमच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. लोकांवरील अत्याचाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल." स्थानिकांनी सांगितलं की, पहलवींच्या आवाहनानंतर, गुरुवारी रात्री 8 वाजता लोक रस्त्यावर उतरले. निदर्शकांनी 'इस्लामिक रिपब्लिक मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी सुरू केली. शाहच्या समर्थनार्थ 'ही शेवटची लढाई आहे, पहलवी परत येतील', अशा घोषणाही देण्यात आल्या.

इंटरनेट सेवा बंद : परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं, इराणी सरकारनं इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. सोबतच, टेलिफोन लाईन्स कापल्या आहेत. इंटरनेट मॉनिटरिंग ग्रुप नेटब्लॉक्सनं सांगितलं की, लाईव्ह डेटावरून असे दिसून आले आहे की अनेक सेवा प्रदात्यांमध्ये कनेक्टिव्हिटी खंडित झाली आहे, ज्यामुळे देशातील अनेक भाग ऑफलाइन झाले आहेत.

हेही वाचा