अमेरिकेत माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये भारतीय प्रेयसीचा मृतदेह आढळला; हत्येनंतर आरोपीला तामिळनाडूतून अटक
मेरीलँडमधील कोलंबिया येथील तिच्या 26 वर्षीय माजी प्रियकर अर्जुन शर्माच्या अपार्टमेंटमध्ये निकिताचा मृतदेह चाकूने वार केलेल्या अवस्थेत सापडलाय.


Published : January 5, 2026 at 1:25 PM IST
|Updated : January 5, 2026 at 3:27 PM IST
लास वेगास : गेल्या आठवड्यात अमेरिकेत बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय भारतीय महिलेचा मृतदेह आढळलाय आणि पोलीस तिच्या माजी प्रियकराचा आता शोध घेत आहेत. तो प्रेयसीची हत्या करून नंतर भारतात पळून गेल्याचा आरोप होतोय. एलिकॉट सिटीची निकिता गोडिशाला 2 जानेवारीला बेपत्ता झाली होती. हॉवर्ड काउंटी पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मेरीलँडमधील कोलंबिया येथील तिच्या 26 वर्षीय माजी प्रियकर अर्जुन शर्माच्या अपार्टमेंटमध्ये निकिताचा मृतदेह चाकूने वार केलेल्या अवस्थेत सापडलाय. विशेष म्हणजे निकिता गोडिशाला हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, इंटरपोल अधिकाऱ्यांनी मृत तरुणीचा माजी प्रियकर आणि मुख्य संशयित आरोपी अर्जुन शर्माला तामिळनाडूमध्ये अटक केलीय.
पोलिसांकडून अटक वॉरंट जारी : पोलिसांनी शर्माविरुद्ध फर्स्ट आणि सेकंड डिग्री मर्डरच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केलंय. वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते गोडिशालाच्या कुटुंबाशी संपर्कात आहेत आणि सर्व शक्य तेवढी कॉन्सुलरमार्फत मदत पुरवत आहेत. त्यात असेही म्हटले आहे की, "दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांसोबतही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे."
आरोपीकडून महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल : अधिकाऱ्यांनी सांगितले की, शर्मा यांनी पोलिसांकडे बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांनी 31 डिसेंबर रोजी मेरीलँडमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये शेवटचे गोडिशालाला पाहिले गेले होते, असे म्हटले होते. नंतर पोलिसांना समजले की, शर्मा यानं 2 जानेवारीला म्हणजेच ज्या दिवशी तक्रार दाखल करण्यात आली, त्याच दिवशी भारतात जाणाऱ्या विमानाने देश सोडून पळून गेला होता. दुसऱ्या दिवशी त्यांच्या अपार्टमेंटची झडती घेण्यात आली, जिथे गोडिशाला मृतावस्थेत आढळून आली. 31 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजल्यानंतर शर्मा यांनी गोडिशालाची हत्या केल्याचे पोलिसांचा अंदाज आहे.
गोडिशालाच्या हत्येचा हेतू अज्ञात : हॉवर्ड काउंटी पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू आहे आणि हत्येचा हेतू सध्या अज्ञात आहे. शर्माला शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी ते अमेरिकेतील संघीय कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितलंय.
हेही वाचाः
मूळ भारतीय वंशाचे पुलकित देसाई यांनी जिंकली निवडणूक; पार्सिपनीच्या महापौर पदाची घेतली शपथ

