ETV Bharat / international

इराणमध्ये प्रचंड स्फोट; युद्धकाळातील बॉम्ब फुटल्याने 14 'रिव्होल्युशनरी गार्ड्स' ठार

'फार्स न्यूज एजन्सी'ने नमूद केले आहे की, या भागात न फुटलेले बॉम्ब अस्तित्वात असल्याने सुमारे 1200 हेक्टर शेतजमीन धोक्यात आहे.

Huge explosion in Iran
इराणमध्ये प्रचंड स्फोट (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2026 at 10:18 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

तेहरान: वायव्य इराणमध्ये युद्धसामग्री निकामी करण्याच्या मोहिमे(Ordnance Clearance Operation)दरम्यान झालेल्या एका स्फोटात 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'चे (IRGC) 14 जवान ठार झाले असून, अन्य दोन जण जखमी झालेत. इराणी प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिलीय.

एका विशेष मोहिमेदरम्यान अचानक बॉम्बचा स्फोट : सरकारशी संलग्न असलेल्या 'फार्स न्यूज एजन्सी'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना झांजन प्रांतात घडली. एका विशेष मोहिमेदरम्यान अचानक बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटाचे बळी ठरलेले जवान अशा एका तुकडीचा भाग होते, ज्यांच्यावर त्या भागात युद्धकाळापासून पडून असलेली आणि न फुटलेली युद्धसामग्री (बॉम्ब) हटवण्याची आणि निकामी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, ही युद्धसामग्री अद्यापही सामान्य नागरिक आणि शेतजमिनीसाठी सुरक्षेचा धोका निर्माण करत आहे. 'फार्स न्यूज एजन्सी'ने नमूद केले आहे की, या भागात न फुटलेले बॉम्ब अस्तित्वात असल्याने सुमारे 1200 हेक्टर शेतजमीन धोक्यात आहे.

'विघटन' (dismantlement) करण्याच्या रणनीतीचा अवलंब : तत्पूर्वी गुरुवारी 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) असा दावा केला की, ट्रम्प प्रशासनाने जागतिक ऊर्जा संसाधनांच्या व्यवस्थापनाबाबत 'विघटन' (dismantlement) करण्याच्या रणनीतीचा अवलंब करण्यास सुरुवात केलीय. IRGC ने पुढे नमूद केले की, या रणनीतीला विरोध करणाऱ्या एका आघाडीचा (युतीचा) केंद्रबिंदू म्हणून आता इराण उदयास आला आहे. IRGC ने असाही दावा केला की, चीन, रशिया आणि युरोपवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अमेरिकेनेच हा 'विघटन प्रकल्प' सुरू केला आहे.

ट्रम्प प्रशासनाकडून 'नौदल नाकेबंदी' (naval blockade) सुरूच : 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये IRGC ने म्हटले आहे. "चीन, रशिया आणि युरोपवर नियंत्रण मिळवण्याच्या आपल्या रणनीतीचा एक मुख्य भाग म्हणून ट्रम्प प्रशासनाने 'नौदल नाकेबंदी' (naval blockade) सुरू केली होती; मात्र ही मोहीम सुरू होऊन 20 दिवस उलटले असताना व्हाईट हाऊसमध्ये सध्या असा सूर उमटत आहे की, हा प्रकल्प अपयशी ठरला आहे आणि उलट या मोहिमेला होणाऱ्या विरोधाचा मुख्य केंद्रबिंदू आता तेहरान बनले आहे."

इराणने सादर केलेल्या एका नवीन प्रस्तावाबाबत असमाधान व्यक्त : दरम्यान, शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने सादर केलेल्या एका नवीन प्रस्तावाबाबत असमाधान व्यक्त केलंय. हा प्रस्ताव सध्या सुरू असलेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने मांडण्यात आला होता; मात्र, त्याच वेळी ट्रम्प यांनी यावर अंतिम करार होण्याची शक्यताही धूसर असल्याचे संकेत दिले. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "त्यांना (इराणला) करार करायचा आहे, पण मला तो प्रस्ताव मान्य नाही (मी त्यावर खूश नाही); त्यामुळे आता पुढे काय होते ते पाहू यात." प्रस्तावातील नेमके कोणते तपशील त्यांना अमान्य आहेत, याबद्दल त्यांनी सविस्तर भाष्य केले नाही; परंतु तेहरान अखेर या कराराला संमती देईल की नाही, याबद्दल त्यांनी अनिश्चितता व्यक्त केली. व्हाईट हाऊसच्या 'साऊथ लॉन'वरून बोलताना ट्रम्प म्हणाले की, "त्यांनी काही प्रमाणात प्रगती केलीय; परंतु ते आपल्या उद्दिष्टापर्यंत कधी पोहोचू शकतील की नाही, याबद्दल मला खात्री नाही."

फुटीचा वाटाघाटींच्या प्रक्रियेवर परिणाम होणार : ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वातील अंतर्गत मतभेदांकडेही अप्रत्यक्षपणे निर्देश केला आणि सुचवले की, अशा प्रकारच्या फुटीचा वाटाघाटींच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यांनी पुढे असेही नमूद केले, "तेथील नेतृत्व अत्यंत विस्कळीत आहे. तिथे दोन किंवा तीन कदाचित चारही गट कार्यरत आहेत आणि हे नेतृत्व अतिशय खंडित स्वरूपाचे आहे; असे असले तरी त्या सर्वांना एखादा करार करायचा आहे, परंतु त्यांच्यात सध्या गोंधळाची स्थिती आहे." मध्यपूर्वेमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठीच्या वाटाघाटींना गती देण्याच्या उद्देशाने इराणने एक नवीन प्रस्ताव सादर केल्यानंतर ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. हा प्रस्ताव म्हणजे सदर संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका मसुदा योजनेत वॉशिंग्टनने अलीकडेच केलेल्या सुधारणांना दिलेले एक प्रत्युत्तरच आहे.

हेही वाचाः

"आम्हाला इराणवर पुन्हा बॉम्बहल्ल्याची गरज भासू शकते," डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं

नेपाळ एअरलाईन्सने आपल्या 'नेटवर्क नकाशात' जम्मू-काश्मीरला पाकिस्तानचा भाग दर्शवल्यानंतर मागितली माफी