ETV Bharat / international

हमासचा नवीन लष्करप्रमुख इस्रायल हल्ल्यात ठार : हमासनं दिला दुजोरा

हमाचा नवीन लष्करप्रमुख मोहम्मद ओदेह इस्रायल हल्ल्यात ठार झाला आहे. मोहम्मद ओदेह ठार झाल्याच्या वृत्ताला हमासच्या वतीनं दुजोरा देण्यात आला.

Israeli Airstrikes In Gaza City
हमासचा नवीन लष्करप्रमुख इस्रायल हल्ल्यात ठार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2026 at 10:05 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

गाझा : बुधवारी गाझा शहरात झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान सात लोकांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लष्कराचे नवीन प्रमुख मोहम्मद ओदेह यांचा मृत्यू झाला, याला हमासनं दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या आधीच्या लष्करप्रमुखाचा मृत्यू होऊन अद्याप दोन आठवडेही उलटले नाहीत. मंगळवारी झालेल्या हवाई हल्ल्यात मोहम्मद ओदेह यांच्यासह त्यांच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, असं निवेदन हमासनं केलं आहे. यापूर्वी, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इस्रायली सैन्यानं ओदेह यांना लक्ष्य करून ठार केलं आहे, असं जाहीर केले होतं.

हल्ल्यात ओदेह यांच्यासह कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू : स्थानिक रुग्णालयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गाझा शहरातील एका बाजारावर झालेल्या हल्ल्यात ओदेह आणि त्यांच्या कुटुंबातील किमान पाच लोकांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. बुधवारी संध्याकाळी शहरात झालेल्या आणखी काही हल्ल्यांमध्ये किमान सात लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन मुले आणि एका महिलेचा समावेश होता. 'शिफा' रुग्णालयाच्या माहितीनुसार, 20 हून अधिक नागरिक आणि बालक जखमी झाले. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या. आजूबाजूचे नागरिक जखमींना रुग्णवाहिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ करताना दिसून आले. गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात हल्ले केले असून, त्यात हमासच्या दोन दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले होते, असं इस्रायली सैन्यानं बुधवारी संध्याकाळी सांगितलं.

ओदेह यांच्या कुटुंबाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी : बुधवारी गाझा शहरात ओदेह यांच्या कुटुंबाच्या सामूहिक अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक जमले. या जमावानं चारही मृतदेहांवर हमासचे हिरवे ध्वज पांघरुन शहरातून अंत्ययात्रा काढली. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करुन हवेत गोळीबारही केला. काहींच्या हातात ओदेह यांचा फोटो असलेली फलकं होती, यावर "कस्सम ब्रिगेडच्या (हमासची लष्करी शाखा) प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी एक" असे शब्द लिहिलेले होते. हमासनं या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. ओदेह हे तीन दशकांहून अधिक काळापासून या संघटनेत सक्रिय होते. चळवळीची लष्करी व सशस्त्र शाखा स्थापन करण्यात मदत करणाऱ्या पहिल्या पिढीचा ते एक भाग होते, असं हमासच्या वतीनं नमूद करण्यात आलं.

गाझामध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून युद्धाची ठिणगी : काट्झ यांनी ओदेह यांना 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा 'प्रमुख सूत्रधार' असल्याचं संबोधलं. याच हल्ल्यामुळे गाझामध्ये दोन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धाची ठिणगी पडली होती. त्यांनी सांगितलं की, युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलनं हमासच्या लष्करी शाखेच्या प्रमुखाला ठार करण्याची ही चौथी वेळ आहे. माजी प्रमुख इझ अल-दिन अल-हद्दाद यांची 16 मे रोजी हत्या करण्यात आली. कॅट्झ यांनी सांगितलं की, "7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या हमासच्या नेत्यांना लक्ष्य करणं इस्रायलकडून सुरूच राहील. "हमासची नागरी किंवा लष्करी सत्ता यापुढं चालणार नाही, अशी आम्ही प्रतिज्ञा केली आहे," असं त्यांनी 'X' वर लिहिलं. तर निवडणुकांची तयारी करत असलेले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही असा इशारा दिला की, "7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला इस्रायल लक्ष्य करेल."

हेही वाचा :

  1. मोदी नेसेटमध्ये : भारताने गाझा शांतता योजनेला दिला पाठिंबा, 'दहशतवाद सर्वत्र धोकादायक' अशी केली घोषणा
  2. गाझामधील निर्वासितांसाठी मदत गोळा करताना संशयास्पद आर्थिक व्यवहार; एटीएसच्या तक्रारीनंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल
  3. गाझा शांतता योजनेला हमासकडून विरोध; प्रस्तावाला 'हास्यास्पद' म्हणत लावलं धुडकावून