ETV Bharat / international

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यादरम्यान दमास्कसमध्ये स्फोट, 18 जण जखमी

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सीरिया दौऱ्यावर असतानाच हे स्फोट झाले आहेत.

Syrian President Ahmad al-Sharaa, right, meets French President Emmanuel Macron at the presidential palace in Damascus, Syria, Tuesday, July 7, 2026.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा. (AP)
author img

By AP (Associated Press)

Published : July 7, 2026 at 7:12 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

दमास्कस : सीरियाची राजधानी दमास्कस एकामागोमाग झालेल्या साखळी स्फोटांनी हादरली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सीरिया दौऱ्यावर असतानाच हे स्फोट झाले आहेत. मंगळवारी दमास्कस येथील 'फोर सीझन्स हॉटेल'जवळ स्फोट झाले. या स्फोटात जवळपास 18 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सीरियाच्या गृह मंत्रालयानं दिली आहे.

सीरियाचे वैविध्यपूर्ण रूप अनुभवलं - मॅक्रॉन : प्राणघातक स्फोटांनंतर मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, "पूर्णपणे सार्वभौम, सुरक्षित, बहुलवादी आणि एकसंध सीरियामध्ये राहण्याच्या सीरियन महिला आणि पुरुषांच्या आकांक्षांना कशानंही दडपता येणार नाही," असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. तसंच "आज सकाळी मी सीरियाचे वैविध्यपूर्ण रूप अनुभवलं. मला तिथं प्रतिष्ठा, धैर्य आणि दृढनिश्चय दिसून आला," असंही त्यांनी म्हटलं आहे. मॅक्रॉन हे सिरियामधील दमास्कस येथील 'फोर सीझन्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास असल्याचं सीरियन प्रसारमाध्यमांनी सांगितलं. या हॉटेलजवळच हे स्फोट झाले. दरम्यान, पर्यटन मंत्रालय आणि दमास्कस राष्ट्रीय संग्रहालयाच्या मुख्यालयाजवळील एका गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले आहेत. यात एक व्हॅन आणि मोटारसायकल जळताना, तसंच रस्त्यावर रक्ताचे डाग पडलेले दिसून येत होते.

अल-शारा यांच्यासमोर एक मोठं आव्हान : हे स्फोट सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांच्यासमोर एक आव्हान उभे करतात. कारण, 2024 मध्ये बशर असद यांना सत्तेवरून हटवणारे बंड यशस्वीपणे घडवून आणल्यानंतर आणि देशातील 14 वर्षे चाललेला उठाव व त्यानंतरचे यादवी युद्ध संपुष्टात आणल्यानंतर ते सत्तेवर आले होते. असद यांच्या घराण्यानं अर्धा शतकाहून अधिक काळ सीरियावर अत्यंत कठोरपणं राज्य केलं होतं. तेव्हापासून अल-शारा यांनी युद्धग्रस्त सीरियावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचे आणि याठिकाणी स्थिरता आणण्याचे प्रयत्न केले आहेत. तसंच, त्यांच्या इस्लामवादी नेतृत्वाखालील राजवटीबद्दल साशंक असलेल्या अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करण्याचा आणि पाश्चात्य सरकारांचा पाठिंबा मिळवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. अल-शारा यांनी 'हयात तहरीर अल-शाम' या पूर्वी अल-कायदाशी संबंध असलेल्या गटाचं नेतृत्व केल्यामुळं पाश्चात्य सरकारांना त्यांच्याबद्दल चिंता वाटत होती. अनेक दशकांच्या हुकूमशाही राजवटीनंतर त्यांच्या सरकारनं राजकीय आणि आर्थिक सुधारणांचे आश्वासन दिलं आहे.

सीरियाला भेट देणारे मॅक्रॉन हे पहिलेच प्रमुख पाश्चात्य नेते : दरम्यान, अल-शारा सत्तेवर आल्यापासून सीरियाला भेट देणारे मॅक्रॉन हे पहिलेच प्रमुख पाश्चात्य नेते आहेत. मंगळवारी होणारी अल-शारा आणि मॅक्रॉन यांची भेट ही 'नाटो' (NATO) परिषदेसाठी अंकारा (तुर्की) इथं जाण्यापूर्वीची आहे. मॅक्रॉन यांची सीरियन समकक्षासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचीही योजना आहे. मॅक्रॉन यांच्या दौऱ्याचे तपशील आणि सुरक्षेबाबत माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. सीरियावरील बहुतांश निर्बंध मागे घेण्यासाठी युरोप आणि अमेरिकेला प्रवृत्त करण्यात मॅक्रॉन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते सोमवारी रात्री एका आर्थिक शिष्टमंडळासह सीरियात दाखल झाले. 14 वर्षांच्या युद्धानंतर पुनर्बांधणीसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असलेल्या या देशात, ते आपल्या समकक्षासोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणार आहेत.

जखमींपैकी चार जण पोलीस अधिकारी : सीरियन सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयानं सांगितलं की राजधानीच्या मध्यवर्ती भागात झालेले दोन स्फोट हे स्फोटक उपकरणांमुळं झाले. यातील एक उपकरण कचऱ्याच्या डब्यात आणि दुसरे उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यात आले होते. तसंच या स्फोटात जखमींपैकी चार जण पोलीस अधिकारी आहेत आणि यात कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त तत्काळ मिळालेलं नाही. तसंच हल्ल्याच्या ठिकाणी सध्या तपास सुरू आहे. कोणत्याही गटानं तत्काळ या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही, असंही गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, दमास्कसमधील 'जस्टिस पॅलेस'जवळील एका कॅफेमध्ये स्फोटक उपकरण घडवून आणल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. 'जस्टिस पॅलेस'जवळील या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर 20 हून अधिक जण जखमी झाले होते.

हेही वाचा :

  1. भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देणार, संरक्षण संबंध अधिक मजबूत होणार
  2. 'ब्रिज मॅन ऑफ इंडिया' गिरीश भारद्वाज यांचं निधन, वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  3. बंगळुरूमध्ये मुलीच्या हत्येप्रकरणी वडिलांना अटक, आई फरार, पोलिसांवर छळाचा आरोप