ओपेकमधून यूएईच्या बाहेर पडण्याचे ट्रम्प यांच्याकडून स्वागत, इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता
यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, "हे खूप चांगले आहे. मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो.


Published : April 30, 2026 at 1:39 PM IST
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) ओपेक आणि ओपेक+ या संघटनांमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे स्वागत केलंय. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायूच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते, असंही ते म्हणालेत.
तेलाच्या किमती कमी करण्यासाठी ही एक चांगली गोष्ट : यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, "मला वाटते की हे खूप चांगले आहे. मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. ते खूप हुशार आहेत आणि कदाचित त्यांना त्यांच्या स्वतःच्या मार्गाने जायचे आहे. वायूच्या किमती कमी करण्यासाठी, तेलाच्या किमती कमी करण्यासाठी सर्व काही कमी करण्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे हे सर्व आहे. ते खरंच एक महान नेते आहेत. मला यात काही हरकत नाही. ओपेकमध्ये त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे."
जागतिक तेल क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बदल : मंगळवारी यूएईने ओपेक आणि मोठ्या ओपेक+ गटातून बाहेर पडण्याची घोषणा केली, हा निर्णय जागतिक तेल क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवतो. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्य पूर्वेतील प्रादेशिक संकटे आणि पुरवठ्यातील व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर उत्पादनात अधिक लवचिकतेसाठी आग्रह धरत आहे. ASK वेल्थ ॲडव्हायझर्सच्या एका अहवालानुसार, UAE च्या निर्णयाचा तेलाच्या किमतींवर होणारा तात्काळ परिणाम अनिश्चित आहे. "तेलाच्या किमतींवर अल्पावधीत थेट परिणाम होणार नाही. गुंतवणूकदारांनी तात्काळ निष्कर्ष काढू नयेत," आणि असेही निरीक्षण नोंदवले आहे की, भू-राजकीय धोके आणि पुरवठ्यातील व्यत्यय विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित असलेले बाजाराच्या गतिशीलतेवर परिणाम करीत आहेत.
कालांतराने किमतींमधील अस्थिरता वाढण्याची शक्यता : अहवालात असे सुचवले आहे की, जरी या निर्णयामुळे किमतींमध्ये तात्काळ घट होणार नसली तरी त्यामुळे समन्वित पुरवठा नियंत्रणे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे कालांतराने किमतींमधील अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. OPEC+ मधील कमी झालेला समन्वय "कार्टेल प्रीमियम" देखील कमी करू शकतो. यामुळे कच्च्या तेलाच्या व्यापाराची व्याप्ती अधिक विस्तृत आणि अस्थिर होऊ शकते. अर्थशास्त्रज्ञांनी अशा बदलांच्या महत्त्वपूर्ण परिणामाबद्दल चिंता व्यक्त केलीय. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी इशारा दिला आहे की, वाढता भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती जागतिक अर्थव्यवस्थेला संकटाकडे ढकलू शकतात. "जागतिक अर्थव्यवस्था एका गंभीर संकटातून जाईल," असे सॅक्स यांनी नमूद केले. तेल आणि वायू पुरवठ्यातील सततच्या व्यत्ययांमुळे व्यापक अस्थिरता निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.
कच्च्या तेलाच्या किमती आधीच प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर : त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) माघारीला एक धोरणात्मक चूक म्हटले आणि जीवाश्म इंधनांपासून दूर जाण्याच्या जागतिक संक्रमणादरम्यान समन्वित पुरवठा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. सॅक्स यांनी नमूद केले की, कच्च्या तेलाच्या किमती आधीच प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेल्या आहेत आणि तणाव कायम राहिल्यास त्या आणखी वाढू शकतात.
हेही वाचाः
1 मे पासून OPEC मधून बाहेर पडण्याची यूएईकडून घोषणा
दाऊद इब्राहिम मोठा झटका! साथीदार सलीम डोलाला इस्तंबूलहून भारतात आणलं

