नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 1127 वर : पोलीस
रसुवामधून 45, नुवाकोटमधून 155, धाडिंगमधून 59, चितवनमधून 348, गोरखातून 66, तनहुनमधून 38, नवलपरासी पूर्वमधून 217 आणि नवलपरासी पश्चिममधून 190 मृतदेह आढळले आहेत.


Published : September 2, 2026 at 5:17 PM IST
काठमांडू: बुधवारी नेपाळमधील पुरामुळे मृतांची संख्या 1127 वर पोहोचली असून, एकूण 1127 मृतदेह सापडले आहेत, असंही नेपाळ पोलिसांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रसुवामधून 45, नुवाकोटमधून 155, धाडिंगमधून 59, चितवनमधून 348, गोरखातून 66, तनहुनमधून 38, नवलपरासी पूर्वमधून 217 आणि नवलपरासी पश्चिममधून 190 मृतदेह आढळले आहेत.
पुरात प्राण गमावलेल्या लोकांच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही : नेपाळ पोलिसांनी हे देखील सांगितले की, भारतात नऊ मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांपैकी केवळ 95 जणांची ओळख पटली असून, ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. याआधी बालेन्द्र शाह यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले होते की, पुरात प्राण गमावलेल्या लोकांचे मृतदेह ज्यांची ओळख अद्याप पटलेली नाही अशांसह कायद्यानुसार आणि वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे हाताळले जात आहेत. ते म्हणाले की, "सरकार ज्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, त्यांची व्यवस्था करत आहे आणि त्याच वेळी ओळख पटवण्यास मदत करू शकणारे डीएनए नमुने आणि इतर पुरावे जतन करत आहे." नेपाळ लष्कर, नेपाळ पोलीस आणि नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाच्या मदतीने या मृतदेहांची व्यवस्था केली जात आहे. ज्यांची ओळख पटली आहे, असे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जात आहेत.
बचावकार्यासाठीची विशेष आंतरराष्ट्रीय पथके महत्त्वाच्या जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी तैनात : याव्यतिरिक्त नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळ लष्करासोबतच भारत आणि चीनमधील बोगद्यांमधील बचावकार्यासाठीची विशेष आंतरराष्ट्रीय पथके महत्त्वाच्या जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. काठमांडूमध्ये मंत्रालयाच्या चौथ्या अधिकृत पत्रकार परिषदेदरम्यान प्रवक्ते आणि सार्वजनिक मुत्सद्देगिरी विभागाचे प्रमुख लोक बहादूर छेत्री यांनी सांगितले की, धोकादायक भूमिगत मोहिमा हाताळण्यासाठी विशेष आंतरराष्ट्रीय तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. छेत्री म्हणाले की, "आम्ही यापूर्वीच नमूद केल्याप्रमाणे, आमचे तात्काळ राष्ट्रीय प्राधान्य स्पष्ट आहे. जीव वाचवणे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, वाचलेल्यांना बाहेर काढणे, तात्काळ मदत पुरवणे आणि बाधित व्यक्तींना मग ते नेपाळी असोत किंवा परदेशी नागरिक योग्य मदत आणि आधार मिळेल याची खात्री करणे."

