नवी दिल्लीत शेख हसीना यांच्या थेट प्रसारमाध्यम संवादाबाबत बांगलादेशची नाराजी
नरसंहारासाठी दोषी ठरलेल्या आणि फरार असलेल्या शेख हसीना यांना बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली.


Published : August 6, 2026 at 10:42 AM IST
ढाका: सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी साधलेल्या थेट संवादाबाबत बांगलादेशने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर बांगलादेश आणि तेथील जनतेविरुद्ध "विषारी विधाने" केल्याचा आरोप करण्यात आलाय. बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "नरसंहारासाठी दोषी ठरलेल्या आणि फरार असलेल्या शेख हसीना यांना बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली, ही बाब बांगलादेशसाठी अत्यंत खेदजनक आहे. या संवादादरम्यान त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांगलादेश सरकार आणि जनतेविरुद्ध विष ओकले."
'जुलै क्रांती'चा दुसरा वर्धापन दिन साजरा : निवेदनात पुढे म्हटले आहे की, "अशा घटनेचा आमच्या द्विपक्षीय संबंधांवर होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत भारत सरकारकडे चिंता व्यक्त करूनही या सार्वजनिक कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली, याचे ढाकाला (बांगलादेशला) अत्यंत दुःख वाटते." परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले की, ज्या दिवशी बांगलादेशची जनता 'जुलै क्रांती'चा दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्याच दिवशी भारतीय भूमीवर शेख हसीना यांनी केलेला हा संवाद बांगलादेशच्या सार्वभौमत्वाचा अवमान आणि जुलै क्रांतीतील हुतात्म्यांचा घोर अपमान करणारा आहे.
माफियासदृश कारवायांना बांगलादेशच्या राजकारणात कधीही स्थान मिळणार नाही : जुलै-ऑगस्ट 2024 दरम्यान फॅसिस्ट राजवटीने लहान मुलांसह निष्पाप नागरिकांची केलेली भीषण हत्यासत्र यांसारख्या संयुक्त राष्ट्रांनी (UN) स्थापित केलेल्या तथ्यांचा इन्कार करणे, हा फरार आणि दोषी ठरलेल्या सामूहिक हत्या करणाऱ्या हसीना व त्यांच्या गुन्हेगारी टोळीचा इतिहासाची दिशा बदलण्याचा एक व्यर्थ प्रयत्न आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, "बांगलादेशच्या जनतेने यापूर्वीही अशा निंदनीय प्रयत्नांना नाकारले आहे आणि आजही ते तसेच करत आहेत." जुलै क्रांतीच्या आदर्शांचा पुनरुच्चार करताना मंत्रालयाने जाहीर केले की, बांगलादेशची जनता या गोष्टीवर ठाम आहे की, देश पुन्हा कधीही फॅसिझमच्या अंधाऱ्या दिवसांकडे वळणार नाही आणि कधीही दुसऱ्या देशाच्या अधीन (client state) होणार नाही. "दोषी ठरलेल्या सामूहिक हत्या करणाऱ्या हसीना आणि त्यांच्या माफियासदृश कारवायांना बांगलादेशच्या राजकारणात कधीही स्थान मिळणार नाही." निवेदनात पुढे म्हटले आहे की, "बांगलादेश भारतासोबत चांगले, परस्पर फायदेशीर आणि भविष्याचा वेध घेणारे संबंध राखू इच्छितो, जे संबंध समानता, परस्पर आदर, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेवर आधारित असतील.
चांगले द्विपक्षीय संबंध विकसित होण्याच्या प्रक्रियेला बाधा : दुर्दैवाची बाब म्हणजे 2013 च्या प्रत्यार्पण करारांतर्गत दोषी गुन्हेगार हसीना यांना बांगलादेशच्या स्वाधीन करण्याबाबत भारत सरकारला वारंवार विनंती करूनही अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही." त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, "याउलट, तिला कोणत्याही कारणास्तव प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने बोलण्याची संधी देणे हे आमच्या लोकांच्या भावना दुखावणारे आहे आणि त्यामुळे बांगलादेश आणि भारत यांच्यातील चांगले द्विपक्षीय संबंध विकसित होण्याच्या प्रक्रियेला बाधा पोहोचते." बुधवारी सकाळी बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, अटक, कारावास किंवा जीवाला असलेला धोका यांसारख्या कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे.
माझा डिसेंबरमध्ये परतण्याचा मानस : बांगलादेश सोडल्यानंतर नवी दिल्लीतून घेतलेल्या पहिल्या आभासी (व्हर्च्युअल) पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधानांनी यावर भर दिला की, त्यांचे समर्थक आणि देशबांधव अडचणींचा सामना करत असताना त्या परदेशात राहू शकत नाहीत. त्या म्हणाल्या, "माझे नशीब काहीही असो, मी माझ्या लोकांकडे परतणार आहे. माझे प्रिय देशबांधव संकटात असताना मी दूर राहू शकत नाही. माझा डिसेंबरमध्ये परतण्याचा मानस आहे."
हेही वाचाः
ट्रम्प टॅरिफविरोधात 25 अमेरिकन राज्यांचा खटला; महाराष्ट्रातील 'या' मोठ्या उद्योगांना मिळणार दिलासा?
पेरूमध्ये पर्यटक विमान कोसळून 13 जणांचा मृत्यू; प्रवासी वारसा स्थळांना भेट देण्यासाठी निघाले होते

