ETV Bharat / health-and-lifestyle

महिलांमधील यकृताच्या आजाराच्या लक्षणांकडं अनेकदा दुर्लक्ष का केलं जातं?, जाणून घ्या कारणे

महिलांमधील यकृताच्या (liver) आजाराच्या लक्षणांकडं अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. कारण लक्षणे खूपच अस्पष्ट असतात. यामुळं योग्य वेळी आजाराचं निदान करणं कठीण होतं.

liver Disease in Women
महिलांमधील यकृताच्या आजार (GETTY IMAGES)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 30, 2026 at 5:45 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : लोक अनेकदा यकृताच्या (liver) आजाराचा संबंध अति मद्यपान, हिपॅटायटीस किंवा जास्त वजनाशी जोडतात. तसेच, बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, महिलांमधील यकृताच्या आजाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळं, या लक्षणांकडं अनेकदा दुर्लक्ष होतं किंवा त्यांचं चुकीचं निदान केलं जातं. हार्मोन्स, गर्भधारणा आणि शारीरिक फरकांसारख्या घटकांमुळं, महिलांना यकृताच्या विशिष्ट समस्या होण्याची शक्यता जास्त असते. त्यांचे वेळेवर निदान होणं आवश्यक आहे.

महिलांमध्ये यकृताचा आजार अनेकदा निदान न होता का राहतो? : नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, महिलांमधील यकृताच्या आजाराचं निदान अनेकदा होत नाही. कारण सुरुवातीची लक्षणे सौम्य असतात आणि अनेकदा त्यांना सामान्य थकवा, तणाव, हार्मोनल बदल किंवा इतर आरोग्य समस्या समजण्याची चूक केली जाते. थकवा, पोट फुगणं, मळमळ आणि मनःस्थितीत होणारे बदल ही यकृताच्या नुकसानीची सामान्य लक्षणे आहेत. तरीही अनेकदा त्यांना तणाव, हार्मोनल चढउतार किंवा पचनाच्या समस्या म्हणून समजले जाते.

महिलांना पुरुषांपेक्षा जास्त धोका? : याव्यतिरिक्त, सामान्य यकृत कार्य चाचण्या महिलांमधील सुरुवातीच्या टप्प्यातील आजार नेहमीच शोधू शकत नाहीत. त्यामुळे निदानास विलंब होतो. दुसरी समस्या म्हणजे यकृताचा आजार प्रामुख्याने पुरुषांनाच होतो हा गैरसमज आहे. कारण अनेकदा मद्यपानामुळं पुरुषांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. तेसच, अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, मद्य, अंमली पदार्थ आणि चयापचय विकारांमुळं यकृताचं नुकसान होण्याचा धोका महिलांना पुरुषांपेक्षा जास्त असतो.

यकृताच्या आरोग्यावर परिणाम का होतो? : गर्भधारणा, पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) आणि रजोनिवृत्तीचा यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो. कारण स्त्री संप्रेरकांमध्ये (जसं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन) होणारे अचानक किंवा दीर्घकालीन बदल शरीराच्या चयापचय, इन्सुलिन आणि चरबीच्या साठवणुकीवर थेट परिणाम करतात.

गर्भधारणेशी संबंधित यकृताचे दुर्मिळ आजार : गर्भधारणेमुळं शरीरावर चयापचयाचा मोठा ताण येतो. हार्मोनल चढउतारामुळं यकृताच्या कार्यावर ताण येऊ शकतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी पित्त आम्लाच्या प्रवाहात बदल घडवते. त्यामुळं गर्भधारणेदरम्यान कधीकधी यकृतांतर्गत पित्तसंचय (इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅसिस) होतो. तीव्र चयापचय ताणामुळं गर्भधारणेशी संबंधित यकृताचे दुर्मिळ आजार होऊ शकतात, जसे की गर्भधारणेतील तीव्र फॅटी लिव्हर (AFLP) किंवा HELLP सिंड्रोम. या काळात आधीपासून असलेल्या यकृताच्या आजारांवर तज्ञांकडून बारकाईने देखरेख ठेवणं आवश्यक आहे.

पीसीओएस आणि यकृताचे आजार : बऱ्याच लोकांना माहित आहे की, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) मुळं चयापचय आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. परंतु फार कमी लोकांना हे माहित आहे की, यामुळं यकृताचे आजारदेखील होऊ शकतात. इन्सुलिन प्रतिरोध आणि चयापचयाच्या समस्यांमुळं, पीसीओएस असलेल्या महिलांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होण्याचा धोका जास्त असतो. खरं तर, पीसीओएस असलेल्या 70 टक्क्यांपर्यंत महिलांमध्ये फॅटी लिव्हर विकसित होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सिरोसिस आणि यकृत निकामी होण्याचा दीर्घकालीन धोका वाढतो.

यकृताच्या समस्यांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो : सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, पीसीओएसमुळं हार्मोन्सचे असंतुलन होते. यामध्ये पुरुष हार्मोन्स (अँड्रोजेन्स) वाढलेले असतात. चयापचय क्रियेत व्यापक बिघाड झालेला असतो. पीसीओएसमध्ये इन्सुलिनची पातळी वाढलेली असणं सामान्य आहे. त्यामुळे यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होते. या संचयामुळं यकृताच्या समस्यांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

रजोनिवृत्ती आणि यकृताचे आरोग्य : उच्च टेस्टोस्टेरॉनमुळं लिपिड व्यवस्थापनात अडथळा येतो. पोटावरील चरबी वाढते. रजोनिवृत्तीमुळं संरक्षक इस्ट्रोजेनची पातळी कायमस्वरूपी कमी होते, ज्यामुळं शरीराच्या रचनेत आणि चयापचय दरात बदल होतात. इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळं चरबीचा साठा नितंब आणि मांड्यांमधून पोटाच्या खोलवरच्या भागात पसरतो. इस्ट्रोजेनची कमी पातळी इन्सुलिन प्रतिरोध, उच्च कोलेस्ट्रॉल आणि टाईप 2 मधुमेहाचा धोकादेखील वाढवते. तरुण स्त्रियांच्या तुलनेत रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांना फॅटी लिव्हर डिसीज होण्याचा किंवा तो वाढण्याचा धोका लक्षणीयरीत्या जास्त असतो.

याचा अर्थ असा की, यकृताच्या कार्याला आधार देण्याव्यतिरिक्त, इस्ट्रोजेन चरबीच्या चयापचयाचे आणि दाह (सूज) नियंत्रित करण्यास देखील मदत करते. रजोनिवृत्तीनंतर, इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, ज्यामुळं महिलांमध्ये खालील गोष्टी होण्याची शक्यता वाढते:

1) फॅटी लिव्हर रोग

2) यकृत फायब्रोसिस (यकृत ऊतींचे व्रण)

3) यकृताच्या एन्झाइम्सची वाढलेली पातळी, जी यकृताच्या नुकसानीचे संकेत देऊ शकते.

याचा अर्थ असा की, यकृताचा आजार असलेल्या रजोनिवृत्त महिलांमध्ये, कोणतेही मोठे धोक्याचे घटक नसले तरीही, सिरोसिससारख्या गंभीर गुंतागुंती अधिक वेगाने विकसित होऊ शकतात.

यकृताचा आजार असलेल्या महिलांमध्ये कोणती लक्षणे? : जैविक फरकांव्यतिरिक्त, महिलांमधील यकृताच्या आजाराची लक्षणे अनेकदा पुरुषांपेक्षा वेगळी असतात, ज्यामुळं लवकर निदान करणं अधिक कठीण होतं. मुख्य फरकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

1) कमी दिसणारी कावीळ : महिलांना त्वचा पिवळी पडण्याऐवजी सुरुवातीचे लक्षण म्हणून खाज सुटण्याचा अनुभव येऊ शकतो.

2) अत्यधिक थकवा : महिलांना अनेकदा खूप जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होतो. या थकव्याला चुकून ताण किंवा ॲनिमिया समजले जाऊ शकते.

3) ऑटोइम्यून यकृत रोगांचा उच्च धोका : महिलांना प्रायमरी बिलियरी कोलंगायटीस (PBC) आणि ऑटोइम्यून हेपेटायटीस सारख्या आजारांचा धोका जास्त असतो. त्यांचे निदान चुकून थायरॉईड किंवा संधिवाताचे विकार म्हणून केले जाऊ शकते.

4) मद्य आणि अमली पदार्थांना भिन्न प्रतिसाद : महिलांचे यकृत अंमली पदार्थ आणि मद्याचे चयापचय वेगळ्या पद्धतीने करते. त्यामुळं कमी प्रमाणात सेवन केल्यावरही त्यांच्या यकृताला हानी पोहोचण्याचा धोका जास्त असतो.

लवकर निदान आणि जागरूकता महत्त्वाची : यकृताचा आजार अनेक वर्षे लक्षात न येता राहू शकतो. त्यामुळं कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी लवकर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं यकृत निरोगी ठेवण्यासाठी, महिला खालील गोष्टी करू शकतात...

1) तुमचे धोक्याचे घटक जाणून घ्या : जर तुम्हाला पीसीओएस (PCOS) असेल किंवा गर्भधारणेदरम्यान यकृताच्या समस्यांचा इतिहास असेल, तर यकृताच्या तपासणीबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.

2) लक्षणांकडं दुर्लक्ष करू नका : सततचा थकवा, खाज सुटणे, पोट फुगणे किंवा आजारी वाटणे यांसारख्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये.

3) नियमित तपासणी : यकृताच्या आजाराचं लवकर निदान होण्यासाठी रक्त तपासणी, अल्ट्रासाऊंड आणि फायब्रोस्कॅन (यकृताच्या कडकपणाची तपासणी करणारी एक बिन-आक्रमक चाचणी) नियमितपणे केल्या पाहिजेत.

4) निरोगी जीवनशैली : निरोगी जीवनशैली निवडणे खूप महत्त्वाचे आहे, यामध्ये योग्य आहार सवयींपासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.