ETV Bharat / health-and-lifestyle
सततच्या खोकल्याकडं दुर्लक्ष नको; गंभीर आजाराचे असू शकतात संकेत, डॉक्टरांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
सतत किंवा वारंवार होणाऱ्या खोकल्याकडं (cough) दुर्लक्ष करू नका. तीन आठवड्यांहून अधिक खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Published : September 1, 2026 at 8:07 PM IST
हैदराबाद : खोकला (cough) हे आपल्या देशातील सर्वाधिक आढळणाऱ्या लक्षणांपैकी एक असून, तो अनेकदा विषाणूजन्य संसर्ग, ॲलर्जी किंवा हवामानातील बदलांमुळं होतो. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) वैद्यकीय सल्ल्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये खोकल्याची तक्रार सामान्यपणे आढळते. एका भारतीय अभ्यासानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देणाऱ्या सुमारे 30 ते 41 टक्के रुग्णांमध्ये खोकला हे प्रमुख लक्षण असल्याचं दिसून आलंय. मात्र, खोकला दीर्घकाळ टिकत असेल, वारंवार होत असेल किंवा त्याच्या स्वरूपात बदल होत असेल, तर त्याचं मूळ कारण जाणून न घेता स्वतःहून औषधोपचार करणं टाळावं.
वारंवार होणाऱ्या खोकल्याकडं दुर्लक्ष करू नये : जयपूर येथील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन विभागाचे संचालक आणि जनरल फिजिशियन डॉ. सुशील कालरा यांनी सतत किंवा वारंवार होणाऱ्या खोकल्याकडं केवळ सामान्य विषाणूजन्य संसर्ग किंवा हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दिलाय. खोकल्याचं स्वरूप बदलल्यास किंवा तो दीर्घकाळ कायम राहिल्यास, त्यामागील मूळ कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. स्वतःहून औषधोपचार करणं किंवा अयोग्य औषधांचा वारंवार वापर करणं धोकादायक ठरू शकतं.
खोकल्यामागे कोणती कारणं? : डॉ. सुशील कालरा यांच्या मते, अनेक रुग्ण खोकल्यावरील सिरप किंवा अँटिबायोटिक्स स्वतःहून घेतात, मात्र त्यातून अपेक्षित आराम मिळत नाही. दीर्घकाळ टिकणाऱ्या खोकल्यामागे दमा, ॲलर्जी, सायनसच्या समस्या, ॲसिड रिफ्लक्स, फुफ्फुसांचे जुनाट आजार, क्षयरोग आणि काही प्रकरणांत फुफ्फुसांचा कर्करोग यांसारखी कारणे असू शकतात.
प्रमुख लक्षणांकडं लक्ष देणं आवश्यक : डॉ. सुशील कालरा सांगतात की, खोकल्याचा कालावधी आणि त्यासोबत दिसणारी इतर लक्षणं हे महत्त्वाचे निर्देशक आहेत. खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहत असेल, वारंवार होत असेल किंवा त्याची तीव्रता वाढत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे. खोकल्यासोबत रक्त येणं, अनपेक्षित वजन कमी होणं, सतत ताप राहणं, श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं, रात्री घाम येणं आणि सतत थकवा जाणवणं ही गंभीर इशारे देणारी लक्षणे असू शकतात.
प्रत्येक खोकल्यासाठी अँटिबायोटिक्सची गरज नसते : श्वसनमार्गाशी संबंधित अनेक संसर्ग हे विषाणूंमुळं होतात. त्यामुळं प्रत्येक खोकल्यासाठी अँटिबायोटिक्सची आवश्यकता असतेच असं नाही. सतत खोकला येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासून धूम्रपानाची सवय, धूळ-धूर किंवा इतर हानिकारक पदार्थांचा संपर्क, सध्या सुरू असलेली औषधे आणि इतर लक्षणांची माहिती घेतात. त्यानंतर आवश्यकतेनुसार छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी, फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेची चाचणी किंवा इतर तपासण्यांची शिफारस केली जाऊ शकते.
हेही वाचा -

