ETV Bharat / health-and-lifestyle
कोटक महिंद्रा प्राइम-टाटा मेमोरिअल भागीदारी: नवी मुंबईत अत्याधुनिक कर्करोग उपचार
कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडनं टाटा मेमोरिअलच्या एसीटीआरईसीसोबत भागीदारी केलीय. यामुळं नवी मुंबईत प्रगत एसडीएक्स ब्रेद होल्ड सिस्टमद्वारे कर्करोग उपचार अधिक अचूक आणि सुरक्षित होणार आहे.

Published : December 11, 2025 at 5:49 PM IST
मुंबई : कर्करोग उपचारांना अधिक सुलभ आणि प्रगत बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड (केएमपीएल) नं टाटा मेमोरिअल सेंटरच्या अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरईसी) सोबत भागीदारी केली आहे. या सहयोगांतर्गत नवी मुंबईतील खारघर येथील एसीटीआरईसीच्या प्रोटोन थेरपी सेंटरमध्ये एसडीएक्स व्हॉल्युन्टरी ब्रेद होल्ड सिस्टम इन्स्टॉल करण्यात येणार आहे. या सिस्टमचं उद्घाटन सूजर राजाप्पन (अध्यक्ष, केएमपीएल) आणि मुरलीधरन एस. (व्यवसाय प्रमुख, केएमपीएल) यांच्या हस्तं करण्यात आलं.
एसडीएक्स सिस्टम हे प्रगत तंत्रज्ञान आहे, जे रुग्णांना उपचारादरम्यान श्वास रोखून धरण्यास मार्गदर्शन करतं. हे विशेषतः फुप्फुसाचा, यकृताचा, स्वादुपिंडाचा आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या मोशन-सेंसिटिव्ह कर्करोगांवर उपचार करताना अत्यंत उपयुक्त ठरतं. श्वासोच्छ्वासामुळं ट्यूमर 3 सेमीपर्यंत हलू शकतो, ज्यामुळं अचूक रेडिएशन देणे कठीण होतं. या सिस्टममुळं रेडिएशन फक्त ट्यूमरवरच जाते, ज्यामुळं निरोगी अवयवांचं संरक्षण होतं आणि उपचाराची यशस्विता वाढते. याशिवाय, एसीटीआरईसी आता प्रोटोन-आधारित एसबीआरटी (स्टेरिओटॅक्टिक बॉडी रेडिएशन थेरपी) देऊ शकतं, जी उच्च डोस आणि अत्यंत अचूक उपचार पद्धती आहे. यामुळं रुग्णांच्या जगण्याच्या शक्यतांमध्ये वाढ होते आणि दुष्परिणाम कमी होतात.
प्रोटोन थेरपी ही कर्करोगावरील सर्वात प्रगत उपचार पद्धतींपैकी एक आहे. हे सहकार्य सर्वाधिक गरज असलेल्या रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध करून देते. एसीटीआरईसी दरवर्षी 35,000 हून अधिक रुग्णांवर उपचार करतं, त्यापैकी बहुतांश आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील असतात. या अपग्रेडमुळं मोशन-व्हॅनेज्ड रेडिएशन थेरपी अधिक सुरक्षित आणि प्रभावी होईल.
डॉ. राहुल कृष्णर्ती, प्रोफेसर, रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, टीएमसी, मुंबई यांनी सांगितलं, “एसडीएक्स सिस्टम मोशन-मॅनेज्ड रेडिएशनसाठी गेम-चेंजर आहे. यकृत आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगात श्वासामुळं ट्यूमरचं स्थान बदलतं, ज्यामुळं उपचार आव्हानात्मक होतो. या अपग्रेडमुळं आम्ही आता प्रोटोन-आधारित एसबीआरटी देऊ शकतो, ज्यामुळं जगण्याची शक्यता वाढते आणि त्रास कमी होतो.”
एसीटीआरईसीचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, “एसडीएक्स सिस्टम हे एसीटीआरईसीच्या प्रोटोन थेरपी सेटअपशी सुसंगत असलेले एकमेव तंत्रज्ञान आहे. हे मोशन-सेंसिटिव्ह कर्करोगांवर सुरक्षित उपचार करण्यासाठी आवश्यक आहे. रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाच्या तंत्रज्ञान अपग्रेडसाठी माझ्या सुभेच्छा आहेत. कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचे या सामाजिक कार्यासाठी आभार मानतो, असं ते म्हणाले”.
हा उपक्रम केएमपीएलच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत येतो, ज्यामध्ये दर्जेदार आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा अपग्रेड आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाला प्राधान्य आहे. शाहरूख तोडीवाला, (व्यवस्थापकीय संचालक,केएमपीएल) म्हणाले, “सर्वाधिक गरज असलेल्या व्यक्तींना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळावी, असा आमचा विश्वास आहे. या सहयोगाने एसीटीआरईसीला प्रत्येक रुग्णाला उत्कृष्ट कर्करोग उपचार देण्यास मदत होईल.”

