ETV Bharat / health-and-lifestyle
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता 30 मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची मुभा
1 एप्रिलपासून आयआरसीटीसीने नवीन रेल्वे नियम लागू केले आहेत. आता तुम्ही 30 मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलू शकता ते कसं ते पाहूया....

Published : April 7, 2026 at 8:29 PM IST
Irctc new boarding rule: आपल्यापैकी बरेच लोक लांबचा प्रवास करण्यासाठी रेल्वेचा प्रवास निवडतात. कमी खर्चात आरामदायी प्रवास मिळत असल्यामुळे ते रेल्वे प्रवासात रस दाखवतात. मात्र, रेल्वेने प्रवास करण्यासाठी काही दिवसांपूर्वी किंवा महिण्यापूर्वी तिकीट बुक करावी लागते. मात्र, कधीकधी वाहतूक कोंडीमुळे तसंच वैयक्तिक कारणांमुळे आपण ठरलेल्या वेळी संबंधित रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकत नाही. परिणामी आपली ट्रेन चुकण्याची शक्यता असते. अशा समस्या टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने अलीकडेच प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन नियम आणला आहे. यामुळे आता ट्रेन सुरू होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी आपलं चढण्याचं स्टेशन बदलू शकता.
📢 Big update for Railway passengers!
— Southern Railway (@GMSRailway) April 1, 2026
You can now change your boarding point up to 30 minutes before your train departs — a brand new facility effective from 1st April 2026!
Swipe to know more 👉 and save this post for your next journey! 🔖🚆#SouthernRailway #IndianRailways… pic.twitter.com/ytvoAynUBe
अलीकडेच, भारतीय रेल्वेने बोर्डिंग पॉईंटच्या बाबतीत आणलेली ही नवीन सुविधा प्रवाशांसाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, ट्रेन सुटण्याची चिंता न करता, तुम्ही बोर्डिंग पॉईंट बदलून दुसऱ्या स्टेशनवर जाऊन त्या समस्येतून सहज बाहेर पडू शकता. कारण, आयआरसीटीसीच्या (IRCTC) नवीन बोर्डिंग पॉईंट नियमानुसार, तुम्ही प्रवासाच्या अर्धा तास आधीसुद्धा बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. यापूर्वी, केवळ 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी होती. परंतु, आता ही सुविधा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर झाली आहे. भारतीय रेल्वेने आणलेला हा नवीन बोर्डिंग पॉईंट नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू झाला आहे.
दुसऱ्या चार्टमध्ये तपशील: पूर्वी, बोर्डिंग स्टेशन फक्त 24 तास आधीच बदलता येत असे. बदललेल्या बोर्डिंग स्टेशनचा तपशील पहिल्या आरक्षण तक्त्यामध्येच दिला जात असे. परंतु सुधारित बोर्डिंग पॉईंट नियमांनुसार, बोर्डिंग रेल्वे स्टेशनचे नाव आता पहिल्या तक्त्यामध्ये दिसणार नाही. हे लक्षात ठेवावे की, बोर्डिंग स्टेशनचा तपशील फक्त दुसऱ्या आरक्षण तक्त्यामध्ये दिसेल, जो गाडी सुटण्याच्या थोड्या वेळापूर्वी तयार केला जातो.
तुम्हाला हे नियम माहित असले पाहिजेत
- जेव्हा तुम्ही रेल्वे प्रवासाचे नियोजन करता, आणि काही विशिष्ट परिस्थितींमुळे तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलावं लागते, तेव्हा काही विशिष्ट नियमांचे पालन करावे लागते.
- तुमच्याकडे कन्फर्म केलेले किंवा आरएसी तिकीट असेल तरच या सुविधेचा वापर करता येईल.
- हे लक्षात घ्यावे की हा नवीन नियम प्रतीक्षा यादीतील रेल्वे तिकिटांना लागू होत नाही.
- तुम्ही प्रत्येक तिकिटावर तुमचे बोर्डिंग स्टेशन फक्त एकदाच बदलू शकता.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुसरा चार्ट तयार होण्यापूर्वीच विनंती केली पाहिजे.
बोर्डिंग स्टेशन बदलण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
- भारतीय रेल्वेने लागू केलेला नवीन बोर्डिंग पॉईंट नियम प्रवाशांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे.
- जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक केलं असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या IRCTC खात्यात लॉग इन करणं आवश्यक आहे.
- त्यामध्ये तुम्हाला माय अकाउंट, माय ट्रान्झॅक्शन्स आणि बुक्ड तिकीट हिस्ट्री येथे जावं लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे ते तिकीट निवडावे लागेल ज्याचे बोर्डिंग स्टेशन तुम्हाला बदलायचे आहे.
- त्यानंतर 'चेंज बोर्डिंग पॉईंट' हा पर्याय निवडा. मग एक विंडो उघडेल.
- यात ट्रेन ज्या स्टेशनवरून प्रवास करायचा त्याचा स्टेशनचा तपशील आहे. तुमच्या ट्रेनच्या मार्गावरील जे स्टेशन तुम्हाला सोयीचे वाटेल, ते तुम्ही गाडीत चढण्यासाठी निवडावे.
- त्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल. तुम्ही अशाप्रकारे सहजपणे तुमचं बोर्डिंग पॉईंट बदलू शकता.
- तुमच्याकडे तिकीट असल्यास, तुम्ही जवळच्या रेल्वे काउंटरवर जाऊनही हे काम पूर्ण करू शकता. कृपया लक्षात घ्या की यासाठी तुम्हाला ट्रेनच्या तिकिटासोबत ओळखपत्राची आवश्यकता असेल.

