ETV Bharat / health-and-lifestyle

चांदीपुरा विषाणूचा तपास अधिक तीव्र होणार, गुजरात आणि राजस्थानमध्ये 'राष्ट्रीय संयुक्त प्रादुर्भाव प्रतिसाद पथक'!

अलीकडच्या काळातील या चांदीपुरा विषाणूबाबतची देशातील सर्वात व्यापक वैज्ञानिक तपासणीही सुरू केली आहे. द

Chandipura Virus
चांदीपुरा विषाणूचा तपास अधिक तीव्र होणार! (File Photo - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 5, 2026 at 5:19 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली: चांदीपुरा विषाणूच्या (CHPV) वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं गुजरात आणि राजस्थानमध्ये 'राष्ट्रीय संयुक्त प्रादुर्भाव प्रतिसाद पथक' (NJORT) तैनात केलं आहे. तसंच, अलीकडच्या काळातील या विषाणूबाबतची देशातील सर्वात व्यापक वैज्ञानिक तपासणीही सुरू केली आहे. दरम्यान, चांदीपुरा हा विषाणू कसा पसरत आहे, त्यात काही जनुकीय बदल झाले आहेत का आणि बाधित समुदायांमध्ये संसर्गाची व्याप्ती किती आहे? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं हा या निर्णयाचा उद्देश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं बुधवारी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

तपासणी पूर्ण केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाला शिफारस : राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग (DAHD) येथील तज्ज्ञांचा समावेश असलेले हे पथक संबंधित दोन राज्य सरकारांशी निकटचं सहकार्य करेल. या सहकार्याद्वारे उद्रेकाचा तपास, महामारीविषयक मूल्यांकन, वैद्यकीय व्यवस्थापन, प्रयोगशाळा समन्वय, रोगवाहक सर्वेक्षण आणि सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना अधिक बळकट केल्या जातील. प्रतिसादाचे समन्वय साधण्यासाठी आणि क्षेत्रीय कामकाजाला सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नियंत्रण कक्षा'ला देखील कार्यान्वित करण्यात आलं आहे. हे पथक प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेईल आणि क्षेत्रीय तपासणी पूर्ण केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाला शिफारसी सादर करेल, असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

अनेक संस्थांकडून समन्वयानं काम : हे पथक एका मोठ्या देशव्यापी संशोधन प्रकल्पाच्या वेळीच होत आहे, ज्यामध्ये आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी (चेन्नई), आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेक्टर कंट्रोल रिसर्च (पुदुचेरी), आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (पुणे), आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्री-क्लिनिकल रिसर्च (हैदराबाद), आणि आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी एपिडेमियोलॉजी अँड डिसीज इन्फॉर्मेटिक्स (बंगळूरू) यांसारख्या अनेक अग्रगण्य संस्थांचा समावेश आहे. या संस्था विषाणूच्या साथीच्या रोगाचा अभ्यास (एपिडेमियोलॉजी) आणि त्याचे नैदानिक ​​वर्तन (क्लिनिकल बिहेविअर) उलगडण्यासाठी गुजरात आरोग्य विभागासोबत निकटच्या समन्वयानं काम करत आहेत.

रुग्णांवर बारकाईनं लक्ष : सौम्य तापापासून ते जीवघेण्या ठरू शकणाऱ्या 'अॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम' पर्यंतच्या चांदीपुरा विषाणू संसर्गाचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्यासाठी या तपासकामांमध्ये साथरोगशास्त्र, विषाणूशास्त्र, कीटकशास्त्र, पशुवैद्यकीय विज्ञान आणि प्रयोगशाळा निदान या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सहभाग घेतला जात आहे. "या निष्कर्षांमुळं पुराव्यांवर आधारित सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आखण्यास आणि भविष्यातील साथीच्या रोगांच्या उद्रेकाविरुद्धची तयारी सुधारण्यास मदत होईल," असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. अधिक कठोर देखरेखीचा एक भाग म्हणून, आरोग्य यंत्रणा बाधित जिल्ह्यांमध्ये तीव्र तापाचा आजार आणि 'एईएस'ची लक्षणे असलेल्या रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्याचवेळी, लक्षणे न आढळणाऱ्या (असिम्प्टोमॅटिक) संसर्गाचा अंदाज घेण्यासाठी आणि विषाणूच्या प्रसाराची नेमकी व्याप्ती समजून घेण्यासाठी समुदाय-स्तरावर 'सेरोसर्व्हे' केलं जात आहेत. कारण या बाबींविषयीची माहिती अद्याप अपुरी आहे.

सावधगिरीचा इशारा : सुरू असलेल्या तपासणीचा एक मुख्य उद्देश म्हणजे चांदीपुरा विषाणूच्या प्रादुर्भावाचं नेमकं चक्र शोधून काढणं आहे. जरी 'सँडफ्लाइज' चांदीपुरा विषाणूचे वेक्टर्स असल्याचं म्हटलं जात असलं, तरी डास, गोचिड, माइट्स किंवा इतर संधिपाद प्राणी देखील या संसर्गाच्या प्रसारणात काही भूमिका बजावतात का, याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. बाधित जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या मोठ्या संख्येनं कीटकांच्या नमुन्यांची सध्या प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी कोणताही घाईचा निष्कर्ष काढण्याविरुद्ध सावधगिरीचा इशारा दिला आहे आणि यावर जोर दिला आहे की, वैज्ञानिक तपास पूर्ण होईपर्यंत सध्याच्या प्रादुर्भावासाठी जबाबदार असलेल्या विशिष्ट कीटकाची ओळख पटू शकत नाही. प्रतिसादात्मक उपाययोजनांचा महत्त्वपूर्ण विस्तार करत, पाळीव प्राणी या विषाणूचे स्रोत (रिझर्व्होअर्स) ठरू शकतात का? हे तपासण्यासाठी त्यांच्यावरही देखरेख ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

रक्त व दुधाचे नमुने : प्रयोगशाळेतील तपासणीसाठी गायी, म्हशी आणि शेळ्यांचे रक्त व दुधाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. चांदीपुरा विषाणू आणि इतर रोगजनकांसाठी प्राण्यांच्या रक्ताचे सुमारे 70 नमुने तपासले गेले आहेत. तरीही, चाचणी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्याच्या तपासामध्ये गुजरातमध्ये 2024 मध्ये झालेल्या चांदीपुरा विषाणूच्या उद्रेकादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीचाही आधार घेतला जात आहे. त्या उद्रेकादरम्यान संशोधकांनी वाळू-माशा यांसारख्या अनेक वाहक कीटकांचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली होती. परंतु त्यापैकी एकाही नमुन्यात चंदीपुरा विषाणूची लागण आढळली नाही. त्यामुळं, या आजाराचा प्रसार करणाऱ्या नेमक्या वाहक कीटकाबाबत शास्त्रज्ञांना कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही.

हेही वाचा :

  1. पावसाळ्यात लहान मुलांना कोणते आजार बळावतात? पोषण आहार आणि लसीकरण किती महत्त्वाचे? जाणून घ्या...
  2. पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा धोका! काय आहेत लक्षणे? महाराष्ट्रातील परिस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना!
  3. भारतात दुहेरी आजारांचे आव्हान असतानाच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय; मलेरिया आणि काला-आजारचं प्रमाण घटलं, तरी असंसर्गजन्य रोगांमध्ये वाढ!