'डॉ हेगडेवार युगप्रवर्तक कधी झाले?' हेगडेवार यांच्यावरील नाटकाला 45 लाखाच्या सरकारी निधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी फक्त 10 लाख हेडगेवारांच्या नाटकाला 45 लाख, यातून सरकारला छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा हेडगेवार मोठे आहेत, हेच अधोरेखित करायचे आहे का?

Published : July 4, 2026 at 7:34 PM IST
|Updated : July 4, 2026 at 9:00 PM IST
पुणे - राज्य सरकारच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या महानाटकाच्या 6 प्रयोगांसाठी तब्बल 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी आक्षेप घेत डॉ हेगडेवार युगप्रवर्तक कधी झाले, असा सवाल करुन सरकारने हा निधी रद्द करावा अशी मागणी केली आहे.
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
यावेळी विकास लवांडे म्हणाले की, महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी असं म्हणतात की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते. त्यांनी 2 जुलै रोजी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक शासन निर्णय जारी केला. त्यानुसार 'युगप्रवर्तक डॉ हेडगेवार' या नाटकाच्या सहा प्रयोगांसाठी तब्बल 45 लाख रुपयांची आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येक प्रयोगासाठी तब्बल 7.5 लाख रुपयांची तरतूद शासकीय तिजोरीतून करण्यात आली आहे.
इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 'युगप्रवर्तक' म्हटले जाते. मग डॉक्टर हेडगेवार हे युगप्रवर्तक कधीपासून झाले? दुसरीकडे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी फक्त १० लाख रुपये आणि डॉ हेडगेवारांच्या एका नाटकाला 45 लाख रुपये देण्यात आले यातून सरकारला छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा हेडगेवार मोठे आहेत, हेच अधोरेखित करायचे आहे का, आमची मागणी आहे की शासनाने हा निर्णय मागे घ्यावा असं यावेळी त्यांनी सांगितलं.

