ETV Bharat / entertainment

मराठी रंगभूमीचं प्रयोगशील पर्व हरपलं; ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन

अनेक कलावंतांचं करियर घडवणाऱ्या बाई म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यगुरू विजया मेहता यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं भारतीय नाट्यविश्वाची मोठी हानी झाली.

Vijaya Mehta Passes Away in Mumbai
ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यगुरू विजया मेहता (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 1, 2026 at 6:59 AM IST

|

Updated : July 1, 2026 at 11:59 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, प्रयोगशील दृष्टी आणि जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यगुरू विजया मेहता यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं भारतीय नाट्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी नाटकातील एक सुवर्णपर्व संपलं आहे. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमी, चित्रपट आणि अभिनय प्रशिक्षण या क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. मराठी रंगभूमीवरचे अनेक कलाकार घडवणाऱ्या 'बाई' काळाच्या पडद्याआड गेल्यानं रंगभूमीवर मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेत्री आणि नाट्यगुरू विजया मेहता यांचं निधन झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल माध्यमावर शोक व्यक्त केला आहे.

रंगभूमीवरील कलाकार घडवणाऱ्या बाई : 1934 मध्ये जन्मलेल्या विजया मेहता यांचं मूळ नाव विजया जयवंत होतं. अत्यंत शिस्तप्रिय, परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या आणि कलाकारांवर आईसारखी माया करणाऱ्या दिग्दर्शिका म्हणून त्यांची ओळख होती. तालमीदरम्यान त्या कलाकारांकडून सर्वोत्तम काम करून घेत असत. त्यामुळे अनेकांना त्या कडक वाटत, पण त्यांच्या या शिस्तीमुळेच अनेक कलाकार घडले. या सर्वांच्या अभिनयावर विजया मेहता यांच्या प्रशिक्षणाचा आणि नाट्यदृष्टीचा ठसा उमटलेला दिसून येतो.

रंगायतन या प्रयोगशील नाट्यसंस्थेची स्थापना : 1960 च्या दशकात त्यांनी रंगायतन या प्रयोगशील नाट्यसंस्थेची स्थापना डॉ श्रीराम लागू, अरविंद देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांच्या सहकार्यानं केली. या संस्थेनं मराठी रंगभूमीवर प्रयोगशील नाटकांची चळवळ उभी केली. 'शांतता! कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाइंडर', 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण', 'वाडा चिरेबंदी' यांसारख्या गाजलेल्या नाटकांच्या सादरीकरणामध्ये त्यांच्या दिग्दर्शनशैलीचा प्रभाव दिसून आला. अजब न्याय वर्तुळाचा, एक शून्य बाजीराव, एका घरात होती, जास्वंदी, पुरुष, बॅरिस्टर, मला उत्तर हवंय, मादी, वाडा चिरेबंदी, हयवदन ही अजून काही त्यांची गाजलेली नाटके.

चित्रपटसृष्टीतही उमटवला आपला वेगळा ठसा : चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. पार्टी, कलयुग, पेस्तनजी, रावसाहेब, क्वेस्ट, रायडिंग द बस विथ माय सिस्टर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयानं आणि दिग्दर्शनानं समीक्षकांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.

ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्या सून : वैयक्तिक आयुष्यात त्या ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्या सून होत्या. त्यानंतर त्यांनी इंग्रजी आणि गुजराती रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेते फारुख मेहता यांच्याशी दुसरा विवाह केला. या दोघांनीही भारतीय रंगभूमीच्या समृद्धीत मोलाची भर घातली. विजया मेहता यांनी नाटक हे समाजाशी संवाद साधणारं प्रभावी माध्यम असल्याचं आपल्या कार्यातून सिद्ध केलं. त्यांनी घडवलेले कलाकार, त्यांची प्रयोगशील दृष्टी आणि त्यांनी निर्माण केलेली समृद्ध नाट्यपरंपरा हीच त्यांची खरी ओळख राहील. मराठी रंगभूमीवरील त्यांचं योगदान अजरामर राहील. त्यांच्या स्मृतीला 'ईटीव्ही भारत'कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

हेही वाचा :

  1. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक के. भाग्यराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन...
  2. शिक्षक चळवळीचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी आमदार प्रा. बी टी देशमुख यांचं निधन
  3. वादग्रस्त आणि यशस्वी व्यक्तिमत्त्वाची 'एक्झिट', निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं निधन
Last Updated : July 1, 2026 at 11:59 AM IST