वडील-मुलीच्या नात्यातील संघर्ष, स्वप्नं आणि आशेचा प्रवास उलगडणारा 'भाटा'!
भटक्या जमातीच्या जीवनातील कटू वास्तव 'भाटा' या चित्रपटामध्ये पाहायला प्रेक्षकांना भेटणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 5, 2026 at 5:19 PM IST
हैदराबाद : मराठी चित्रपटसृष्टीनं नेहमीच आशयप्रधान आणि वास्तववादी कथांना प्राधान्य दिले आहे. मोठ्या बजेटपेक्षा दमदार कथा आणि प्रभावी मांडणी हेच मराठी चित्रपटांचे खरे वैशिष्ट्य ठरले असून, 'Content is King' ही संकल्पना मराठी सिनेमानं सातत्यानं सिद्ध केली आहे. अशाच एका संवेदनशील विषयाला स्पर्श करणारा 'भाटा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'भाटा' म्हणजे दगड फोडल्यानंतर उरलेले तुकडे किंवा खडकाळ, ओसाड भूभाग—आणि हा अर्थच चित्रपटातील बेलदार समाजाच्या कठोर, संघर्षमय जीवनाचे प्रतीक बनतो.
भटक्या जमातीच्या जीवनातील कटू वास्तव : 'भाटा' हा चित्रपट बेलदार या भटक्या जमातीच्या जीवनातील कटू वास्तव उलगडतो. दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजासाठी आयुष्य म्हणजे अखंड कष्ट आणि संघर्ष. अशाच परिस्थितीत जगणारा राणा आपल्या मुलीला शिक्षण देऊन तिचे भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहतो. परंतु समाजातील विषमता, आर्थिक अडचणी आणि परंपरांचे ओझे यांच्याशी झुंज देत तो हे स्वप्न पूर्ण करू शकेल का? एका वडिलांच्या निर्धाराची, त्यागाची आणि मुलीवरील अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवणार आहे.

'भाटा' चित्रपटाबद्दल : या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, लातूर) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. येत्या 28 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. व्ही. डी. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह प्रस्तुत, अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. निर्मित 'भाटा' या चित्रपटाचे निर्माते सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण आहेत. रिजवान शेख, नितेश पराडकर आणि सुनील कातकर यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन भरतराज नारायण यादव यांनी केले असून अक्षय सुतार हे सहदिग्दर्शक आहेत. कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची असून पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांनी लिहिले आहेत. गीतकार आणि संगीतकार म्हणून श्रेयस आंगणे यांनी दुहेरी जबाबदारी पार पाडली आहे, तर छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे.
'भाटा' चित्रपटातील स्टारकास्ट : चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रशांत मोहिते, अभिनेत्री रुपाली जाधव, प्रेमा किरण तसेच बालकलाकार तनिष्का जाधव यांच्या प्रभावी भूमिका पाहायला मिळणार आहेत. राणाचा संघर्ष आणि त्याच्या स्वप्नांची कहाणी अनुभवण्यासाठी निर्मात्यांनी 'भाटा' 28 ऑगस्टपासून चित्रपटगृहात पाहावा असे आवाहन प्रेक्षकांना केलं आहे.

