'ट्रायंगल' मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट, वाचा सविस्तर
'ट्रायंगल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नवीन अभिनेत्याचा चेहरा पाहायला मिळेल.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 21, 2026 at 5:18 PM IST
मुंबई - हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत, मात्र मराठी चित्रपसृष्टीत स्पाय थ्रिलर चित्रपट कधी रिलीज झाले नाहीत. 'ट्रायंगल' हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट ठरणार असून, अर्जून करे हा नवीन चेहरा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. देशभक्ती, निष्ठा आणि धाडसाची अनोखी गोष्ट आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. वैष्णवी फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'ट्रायंगल' या चित्रपटाची निर्मिती विकी सूर्यवंशी आणि सुखदेव आढाव यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शन विकी सूर्यवंशी यांनी केलंय. या चित्रपटात राजकीय आणि गुप्तधार्मिक जगतातील गुंतागुंत मांडण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली इंडियन ओशन सिक्युरिटी सिस्टिम डॉक्युमेंट्स चोरी करण्याचा प्रयत्न परदेशी संस्था करतात आणि सुरू होतो एक आंतरराष्ट्रीय खेळ. वेगवान कथा, उत्कृष्ट अॅक्शन सीक्वेन्स हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. तांत्रिक बाजूंवरही हा चित्रपट खिळवून ठेवणारा आहे.
'ट्रायंगल' मराठी स्पाय थ्रिलर चित्रपट : 'ट्रायंगल' चित्रपटात अर्जून करे, पूनम कापसे, ऋत्विक रास्ते, अलोक बसके, आरती पुरी, शरद लाडगे, भक्ती साधू अशी दमदार स्टारकास्ट आहे. कुणाल कांबळे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं कथानक मुंबई, गोव्यासह ठिकठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. स्पाय थ्रिलर हा प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पर्वणी ठरणार आहे. याशिवाय उत्तम कथेमुळं प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन या चित्रपटात होईल. मराठी चित्रपटांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न 'ट्रायंगल' या पहिल्या स्पाय थ्रिलर चित्रपटातून करण्यात आला आहे.
चित्रपट कधी होऊ शकतो रिलीज : दरम्यान 'ट्रायंगल' चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाटत आहेत. हा चित्रपट मार्च 2026मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख ही काही दिवसात समोर येणार आहे. आता या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अॅक्शन देखील पाहायला मिळणार आहे. 'ट्रायंगल'च्या टीमनं चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे.

