समर्थ पॅनल'द्वारे मराठी चित्रपट क्षेत्राचा होईल कायापालट, विरोधक केवळ स्वार्थी हेतूनं आणि प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करत आहे - मेघराज राजेभोसले
'समर्थ पॅनल'द्वारे मराठी चित्रपट क्षेत्राचा कायापालट होईल असं मेघराज राजेभोसले यांनी म्हटलं. याशिवाय त्यांनी विरोधक स्वार्थी हेतूने आणि प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करत असल्याचाही खुलासा केला.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 3, 2026 at 5:36 PM IST
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी, 7 जून रोजी पार पडत आहे. या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये लढत होत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि 'समर्थ पॅनल'चे प्रमुख मेघराज राजेभोसले यांनी त्यांच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळले असून गेल्या 10 वर्षांत महामंडळात एकही रुपयाचा गैरव्यवहार झालेला नाही असं सांगितलं. सर्व ऑडीट रिपोर्ट्स पूर्णपणे तयार आणि पारदर्शक आहेत. विरोधक केवळ स्वार्थी हेतूने आणि प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करत आहे असं यावेळी मेघराज राजे भोसले यांनी सांगितलं.
समर्थ पॅनलची पत्रकार परिषद : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. तसेच त्यांनीही आपलं मत व्यक्त केली.
मेघराज राजे भोसले यांनी दिली प्रतिक्रिया : मेघराज राजे भोसले यांनी म्हटलं की, समर्थ पॅनलचे ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि संकलक विजय खोचीकर हे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 14 उमेदवारांनाही सभासदांचा मोठा पाठिंबा लाभत असून तेही मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, संगीतकार, तंत्रज्ञ, कामगार आणि इतर सर्व घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे तसेच संपूर्ण मराठी चित्रपट उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हा समर्थ पॅनलचा प्रमुख उद्देश आहे. महामंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न केले होते, मात्र त्यास प्रतिस्पर्धी गटाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही असं यावेळी ते म्हणाले.
10 वर्षांत महामंडळात एकही रुपयाचा गैरव्यवहार झाला नाही : महामंडळाच्या निवडणुकीत होत असलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की गेल्या 10 वर्षांत महामंडळात एकही रुपयाचा गैरव्यवहार झालेला नाही. सर्व ऑडीट रिपोर्ट्स पूर्णपणे तयार आणि पारदर्शक आहेत. विरोधक केवळ स्वार्थी हेतूने आणि प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करत आहेत. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिलेली जागा कोणाच्या वैयक्तिक नावावर नसून, ती अधिकृतपणे 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्याच नावावर आहे. त्याचे सर्व कायदेशीर करार आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत. स्वाक्षरीचे अधिकार अध्यक्ष म्हणून मेघराज राजेभोसले आणि संजय ठुबे यांच्याकडे आहेत, यात कोणताही संशयास्पद व्यवहार नाही. विरोधकांना स्वतःचा पराभव स्पष्ट दिसत असल्यानं, विरोधक पळवाट शोधत आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

