ETV Bharat / entertainment

'तलास' चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न...

'या गो बायांनो हळद घेऊनशी...' गाण्याचा प्रकाशन सोहळा हा मोठ्या जल्लोषात पार पडला आहे. या गाण्यात गौतमी पाटीलनं धमाकेदार डान्स केला आहे.

Ya Ga Bayono Halad Gheunshi song
'या गो बायांनो हळद घेऊनशी' गाणं (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 28, 2026 at 1:44 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.'तलास' हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची कल्पना शीर्षकावरून अजिबात येत नाही. याउलट चित्रपटाचे शीर्षक उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे. नुकतेच या चित्रपटातील 'या गो बायांनो हळद घेऊनशी...' गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली 'तलास'या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'तलास'मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे.

'या गो बायांनो हळद घेऊनशी...' गाण्याचा प्रकाशन सोहळा : उदय गणपत जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, कथा आणि पटकथालेखनही त्यांचे आहे. संवादलेखनाची जबाबदारी रुपाली कुटे यांनी सांभाळली आहे. गीतकार विजय गाडेकर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. दादर क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात 'तलास' चित्रपटामधील 'या गो बायांनो हळद घेऊनशी...' गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं हे ग्लॅमरस आणि जल्लोषमय गीत प्रकाशित करण्यात आले. 'या गो बायांनो हळद घेऊनशी...' याचे गीतकार-संगीतकार विजय गाडेकर आहे. या गाण्यावर गौतमी पाटीलनं नृत्य केले असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केलंय. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणे गायलं आहे.

'तलास' चित्रपटामधील स्टारकास्ट : या चित्रपटात चिन्मयी सुमित, प्रणव रावराणे, पूजा जैस्वाल, गणेश यादव, रेखा राणे, राहुल पाटील, निलेश भेरे, वेदांत खोत, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत. डिओपी सचिन लोखंडे यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. कलादिग्दर्शन अनिल केदार, वेशभूषा धनश्री सालेकर, रंगभूषा सुनील सावंत, छायाचित्रण पंकज पटेल, पोस्ट प्रॉडकशन संमित स्टूडियो, संकलन सुबोध नारकर, ध्वनीआरेखन विशाल राणे, कार्यकारी निर्माता सदानंद टेंबुलकर, निर्मिती व्यवस्थापक संदीप मोरे, डीआय कलरिस्ट भूषण दळवी अशी श्रेयनामावली आहे.