'श्रेयस तळपदे आणि नसीरुद्दीन शाह यांची मुख्य भूमिका असलेल्या 'इकबाल' चित्रपटाचा नेहमीच अभिमान वाटतो' - सुभाष घई
'श्रेयस तळपदे आणि नसीरुद्दीन शाह अभिनीत 'इकबाल' चित्रपटाबद्दल सुभाष घई यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 27, 2026 at 12:13 PM IST
हैदराबाद : चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी बुधवारी आपल्या 'इकबाल' या चित्रपटाची आठवण काढली. 2005 मधील हा क्रीडा-विषयक चित्रपट त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या प्रवासातील विशेष आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित या चित्रपटाचं पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना घई यांनी लिहिलं, 'इकबाल मुक्ता आर्ट्सद्वारे निर्मित असा चित्रपट, ज्याचा मला नेहमीच अभिमान वाटेल. मोठ्या स्टार्सचा समावेश नसलेला आणि कमी बजेटचा असूनही, उत्कृष्ट कथेमुळं हा चित्रपट एक 'क्लासिक हिट' ठरला आणि त्यानं 2005चा राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला. या अविस्मरणीय चित्रपटासाठी श्रेयस तळपदे, नागेश कुकुनूर आणि राहुल पुरी यांचे अभिनंदन. 'मुक्ता'मध्ये आम्ही अशा प्रकारचे चित्रपट बनवण्याची आमची आवड जोपासत आहोत, सध्या आमचा 'मान्या' हा चित्रपट निर्मितीच्या टप्प्यावर आहे. कृपया वाट पाहा.'
'इकबाल' चित्रपटाबद्दल : सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्ट्स' बॅनरखाली निर्मित 'इकबाल' चित्रपटात श्रेयस तळपदेनं मुख्य भूमिका साकारली होती, तर त्याच्याबरोबर नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड आणि श्वेता बसू प्रसाद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट एका लहान गावातील कर्णबधिर तरुणाची कथा सांगतो, जो क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहतो आणि आपल्या मार्गातील अडथळ्यांवर मात करतो. या चित्रपटाला 2005 मधील 'इतर सामाजिक विषयांवरील सर्वोत्तम चित्रपटा'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
श्रेयस तळपदेचा पहिला हिंदी 'इकबाल' चित्रपट : 'इकबाल' चित्रपटातील श्रेयस तळपदेचा अभिनय हा अनेकांना आवडला होता. या चित्रपटासाठी त्याचं विशेष कौतुक देखील करण्यात आलं होतं. या चित्रपटानंतर श्रेयस तळपदेला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. अभिनेत्याचा 'इकबाल' हा पहिला हिंदी चित्रपट होता. नसीरुद्दीन शाह यांना त्यांच्या भूमिकेसाठी 'सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्या'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दरम्यान 'इकबाल'चे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं आहे त्यांनी यापूर्वी 'हैदराबाद ब्लूज'सारखे चित्रपट बनवले होते. या चित्रपटामधील गाणं 'आशाएं' खूप गाजलं होतं. हे गाणं दिवंगत गायक केके आणि सलीम मर्चेंट यांनी गायलं होतं. या गाण्याला संगीत सलीम-सुलेमान यांनी दिलं.

