कोल्हापूरची चित्रपटप्रेमींनी जपली 93 वर्षे जुनी आठवण, भारतातील पहिला युद्धपट 'कुरुक्षेत्र' चित्रपटाचा यशस्वी शो
सरदार बाळासाहेब यादव यांच्या 75व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कोल्हापूर चित्रपटप्रेमींना 1933 सालच्या दुर्मिळ चित्रपट 'कुरुक्षेत्र'चा विशेष खेळ दाखविण्यात आला.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 23, 2026 at 10:31 AM IST
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीचे जनक कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या सहवासातून घडलेल्या सरदार बाळासाहेब यादव यांच्या 75व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शहरातील पद्मा टॉकीज येथे 1933 सालच्या दुर्मिळ चित्रपट 'कुरुक्षेत्र'चा विशेष खेळ यशस्वीपणे संपन्न झाला. हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापुरच्या वतीनं आयोजित या मोफत प्रयोगाला शहरभरातील सिनेरसिक, इतिहासप्रेमी, कलावंत आणि तरुणवर्गानं उपस्थिती लावली होती. 135 मिनिटांच्या या भव्य चित्रपटातून प्रेक्षकांना 93 वर्षांपूर्वीचे कोल्हापूर प्रत्यक्ष डोळ्यांसमोर आणले आणि टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला.
पहिल्या युद्धपटानं जागवली सिनेमाची मजा : भारतीय चित्रपटसृष्टीला आकार देणाऱ्या बाबुराव पेंटर यांनी 1917मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. या कंपनीतून 1919च्या 'सैरंध्री' चित्रपटात बाळासाहेब यादव यांनी भीमाची भूमिका साकारून राष्ट्रीय ख्याती मिळवली. 1932मध्ये कंपनी बंद झाल्यावर त्यांनी स्वतः 'छत्रपती सिनेटोन' कंपनी उभी करून महाभारताच्या कुरुक्षेत्र युद्धावर आधारित हा पहिला युद्धपट बनवला. दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद आर. के. चिंचलीकर यांचे, गीते कवि बालतनय यांची, तर भूर्जी खाँसाहेब यांचे संगीत असे वैशिष्ट्य असलेल्या या चित्रपटात 17 गाणी आहेत. माधवराव जोशी, दत्तोबा भोसले, झुंजारराव पोवार यांसारख्या तत्कालीन कलाकारांच्या भूमिका ठळक होत्या. मराठी आणि हिंदी असे द्विभाषिक चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोल्हापूर शहर आणि परिसरात झाल्यानं, आजच्या प्रेक्षकांना तत्कालीन ठिकाणे पाहण्याची मौल्यवान संधी मिळाली.

'ही' ठिकाणे चित्रपटात मिळाली पाहायला : "चित्रपटामध्ये कोल्हापूर शहरातील न्यू पॅलेस, पंचगंगा नदी घाट, रंकाळा संध्यामठ, लक्षतीर्थ वसाहत या ठिकाणचे मोकळे मैदान, जयंती नाला (पूर्वीची जयंती नदी) अशी अनेक ठिकाणे आम्हा कोल्हापूरकरांना पाहायला मिळाली," असे कोल्हापूरकर म्हणून चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या भारत महारुगडे यांनी सांगितले. तब्बल 93 वर्षांपूर्वी ही ठिकाणे कशी दिसत होती याचा अंदाज या चित्रपटातील काही दृष्ट्यांच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना घेता आला. प्रेक्षकांनी चित्रपटातील भव्य युद्धदृश्ये आणि गाणी यावर जोरदार दाद दिली.


तीन वर्षांच्या अथक पाठपुराव्याचे फळ : कोल्हापूरचे माजी महापौर कै. नानासाहेब यादव यांनी जपलेली या चित्रपटाची मूळ प्रिंट 1990 सुमारास ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या विनंतीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली होती. हेरिटेज सोसायटीचे सचिव यशोधन जोशी यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी संग्रहालयाशी संपर्क साधला. तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आज फळ मिळाले. चित्रपटाच्या प्रयोगाला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर संपल्यावर यशोधन जोशी म्हणाले, "हा कार्यक्रम कोल्हापूरच्या चित्रपट इतिहासाला नवजीवन देणारा आहे. भारतातील पहिला युद्धपट असलेला कुरुक्षेत्र हा चित्रपट म्हणजे कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो कोल्हापूरकरांसमोर आणण्याचे आमचे यामागचे उद्दिष्ट होते. अशा उपक्रमांसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत."
कोल्हापूरकरांचे आभार यादव कुटुंबीय
सरदार बाळासाहेब यादव यांच्या कुटुंबीयांनी देखील या चित्रपटाच्या प्रयोगाला उपस्थिती लावली होती. "यादव कुटुंब चित्रपट क्षेत्रातील इतिहास जपण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. आम्हा यादव कुटुंबीयांचा देखील भाग्यच म्हणावा लागेल की हा चित्रपट आम्हाला मोठ्या स्क्रीनवर पाहता आला त्यामुळे कोल्हापूरकरांचे मी आभार मानतो." असे बाळासाहेब यादव यांचे नातू धैर्यशील यादव यांनी सांगितले.

पूर्वी 1990 मध्ये धैर्यशीलराव इंगळे यांनी पद्मा टॉकीजमध्ये हाच शो घेतला होता. आज त्यांचे पुत्र ऋतुराज धैर्यशीलराव इंगळे यांनी पुन्हा चित्रस्पष्ट विनामूल्य उपलब्ध करून कोल्हापूरचा सिनेमाई वारसा जपण्याची कटिबद्धता दाखवली. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या प्रयोगानंतर उत्साहाचे वातावरण पसरले असून, हेरिटेज सोसायटीने शहराच्या सांस्कृतिक वारसाम जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूर पुन्हा एकदा 'चित्रनगरी' म्हणून नक्कीच स्मरणात राहील.

