संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी यांच्या घरी झालं दोन चिमुकल्याचं आगमन...
लग्नाच्या 10 वर्षांनंतर संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी जुळ्या मुलांचे पालक झाले, प्रसूती पाहून भोजपुरी अभिनेत्री भावूक झाली.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 4, 2026 at 5:09 PM IST
हैदराबाद : अनेक वर्षांपासून आपल्या चाहत्यांबरोबर आपले वैयक्तिक संघर्ष आणि गर्भधारणेचा प्रवास शेअर केल्यानंतर, संभावना सेठनं 4 जून रोजी ही आनंदाची बातमी जाहीर केली. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जुळ्या मुलांना जन्म दिल्याचं सांगितलं आहे. यावर्षी एप्रिलमध्ये, संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांनी सरोगसीद्वारे लवकरच पालक होणार असल्याची घोषणा केली होती. गुरुवारी या जोडप्यानं सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचं स्वागत केलं. जुळ्या मुलांच्या आगमनाचा आनंद साजरा करणाऱ्या पोस्टमध्ये रुग्णालयातील प्रसूतीच्या दृश्याची एक झलकही दाखविण्यात आली आहे.
संभावना सेठच्या घरी दोन चिमुकल्याचं आगमन : प्रसूतीदरम्यान संभावना भावूक झाल्याची दिसली, तर तिचा पती अविनाश तिला आधार देताना दिसत होता. एका फोटोमध्ये, हे जोडपे त्यांच्या जुळ्या मुलांबरोबर पोझ देताना दिसत आहे. हा भावनिक क्षण शेअर करताना, या जोडप्यानं पोस्टला कॅप्शन दिलं, "या वर्षी महादिवाळी लवकर आली आहे. लक्ष्मी आणि गणेश दोघेही घरी आले आहेत. आमची मन कृतज्ञतेनं भरून गेलं आहेत. हर हर महादेव.' या पोस्टनंतर, संभावना आणि अविनाश यांच्यावर सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेता गोविंदाची पत्नी, सुनीता आहुजानं कमेंट करून या जोडप्याचं अभिनंदन केलंय. गौहर खाननं लिहिलं, 'अहा, अल्लाह तुम्हा दोघांना आणि मुलांना सदैव आशीर्वाद देवो. मला खूप आनंद झाला आहे, आणि अल्लाह त्यांना सदैव सुरक्षित आणि आनंदी ठेवो. आमीन.' अक्षरा सिंग, उर्फी जावेद आणि पाखी हेगडे यांसारख्या कलाकारांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
संभावना सेठबद्दल : गेल्या अनेक वर्षांपासून, संभावना सेठ आई होण्याची तिची इच्छा आणि या प्रवासात तिला आलेल्या आव्हानांबद्दल उघडपणे बोलत आली आहे. तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्लॉग्सच्या माध्यमातून, तिनं अनेकदा या प्रवासातील चढ-उतारांबद्दल मनमोकळेपणानं सांगितलंय. संभावनानं तिच्या करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटांमधील डान्स नंबर्सनं केली, यानंतर ती 'बिग बॉस 2'मधील तिच्या कामगिरीमुळं प्रसिद्धीझोतात आली. ती 'दिल जीतेगी देसी गर्ल', 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 4', 'वेलकम - बाजी मेहमान नवाजी की' आणि 'बिग बॉस हल्ला बोल' यांसारख्या रिॲलिटी शोमध्येही दिसली आहे.

