छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेल्या आदरापोटी ‘राजा शिवाजी’साठी कलाकारांनी केला मानधनाचा त्याग!
रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील अनेक मोठ्या कलाकारांनी शिवाजी महाराजांबद्दलच्या आदरापोटी मानधन घेतलं नाही.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 6, 2026 at 4:58 PM IST
|Updated : May 6, 2026 at 5:21 PM IST
हैदराबाद : रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ‘राजा शिवाजी’ भव्य ऐतिहासिक चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक कोटींची उड्डाणे करीत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याला अभिवादन करणाऱ्या या चित्रपटाबाबत रितेश देशमुख यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती उघड केली असून, सर्व कलाकारांनी कोणतेही मानधन न घेता या चित्रपटासाठी योगदान दिल्याचं त्यांनी सांगितलंय. “महाराजांच्या इतिहासाला आणि जीवनगाथेला एका चित्रपटात सामावणे अशक्य आहे. त्यामुळं ऐतिहासिक सत्याशी तडजोड न करता हा चित्रपट साकारण्याचा आमचा प्रयत्न होता. या चित्रपटासाठी मी सुमारे साडेतीन वर्षे लेखनावर मेहनत घेतली. मोठमोठ्या कलाकारांनी या चित्रपटात कोणतेही मानधन न घेता काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वांनी निःस्वार्थपणे योगदान दिलं,” असे रितेश देशमुख यांनी नमूद केलं.
'राजा शिवाजी'मधील स्टार : या चित्रपटात सलमान खान यांनी शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाला यांची भूमिका साकारत विशेष उपस्थिती दर्शवली आहे. अभिषेक बच्चन यांनी संभाजी शहाजी भोसले, तर संजय दत्त यांनी अफजल खान यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय दिग्गज कलाकारांचा भव्य ताफा या चित्रपटात पाहायला मिळतो. जसे की विद्या बालन यांनी आदिल शहा यांची पत्नी बडी बेगम, महेश मांजरेकर यांनी लखुजी जाधव, सचिन खेडेकर यांनी दादोजी कोंडदेव, बोमन इराणी यांनी पीर बाबा, भाग्यश्री यांनी जिजाबाई, फरदीन खान यानं शहाजहाँ, जितेंद्र जोशी यांनी पंत, अमोल गुप्ते यांनी आदिल शहा आणि जेनेलिया देशमुख यांनी महाराजांची पत्नी सईबाई यांच्या भूमिका निभावल्या आहेत. या सर्वांनी निःस्वार्थपणे आर्थिक मोबदल्याशिवाय काम केलं आहे.



‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल : रितेश देशमुख हिंदी आणि मराठी चित्रपटांत अनेक वर्षे कार्यरत आहे तसेच त्याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळं त्याची सर्व स्तरावर ओळखी, दोस्ती आहेत. त्यांची पत्नी जेनेलिया देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवून हिंदी आणि मराठी चित्रपटांतून झळकली आहे. जेव्हा कलाकारांनी त्यांची या चित्रपटामागची जिद्द आणि निष्ठा बघितली, तेव्हा त्यांनाही या सिनेमाचा भाग होणे गरजेचे वाटले. रितेश देशमुखशी असलेली हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची जिव्हाळ्याची मैत्री या प्रकल्पाशी जोडून ठेवणारा घटक ठरला. अशा निःस्वार्थ वृत्तीमुळं चित्रपटाला एक वेगळीच उंची आणि प्रामाणिकपणा लाभला आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट 1 मे 2026 रोजी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शित झाला असून, इतिहासाची गौरवगाथा भव्यतेनं सादर करतो.

