ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी' सीझन सहा होणार 'या' दिवशी प्रसारित, रितेश देशमुख करणार सूत्रसंचालन...

रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस मराठी' सीझन सहा हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परत येत आहे.

Bigg Boss Marathi 6
'बिग बॉस मराठी' सहा (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 6, 2026 at 2:35 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य आणि चर्चेत असलेला रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस मराठी' पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देशाचा लाडका सुपरस्टार, आपले लाडके 'भाऊ' रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा नवा सीझन घेऊन येत आहेत. 'बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत…' हा दमदार आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार आहे. यंदा 'बिग बॉस मराठी'चं घर नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह सादर होत असून, 'दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!' या रोमांचक थीमसह नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी ते पूर्णपणे तयार आहे. 100 हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, तब्बल 100 दिवस चालणाऱ्या या प्रवासात अतरंगी स्वभावांचे बहुरंग, नात्यांचे बदलते पदर, प्रेम-मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'सीझन सहाबद्दल अपडेट : बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. या शोमध्ये हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख याही पर्वात सूत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मागील सीझनमध्ये रितेशनं कधी मित्र, कधी मार्गदर्शक बनून सदस्यांना आरसा दाखवला, परखड मत व्यक्त केली आणि खोटेपणाचे मुखवटे उतरवले. हे सगळं यंदाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅगसह रितेश देशमुख यंदा देखील खेळ अधिक रंगतदार करणार आहे. हा शो 11 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉस सुरू होण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात या सीझनमधील स्पर्धकांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

रितेश देशमुख करणार सदस्यांचं स्वागत : प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असताना, यंदा कुठले स्पर्धक या शोमध्ये येईल, याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. सहाव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. यावेळी शोमध्ये फॉरमॅट न बदलता कंटेंट अधिक धारदार असणार आहे. यावेळीही 'बिग बॉस मराठी'च्या घरात अतरंगी स्पर्धक एका छताखाली राहणार आहेत. यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना असेल. 13000 चौरस फूट भव्य जागेत विविध क्षेत्रातील 16हून लोकप्रिय व्यक्ती शोचा भाग असणार आहेत. आता पुन्हा एकदा रितेश देशमुख बिग बॉसच्या घरात नवीन सदस्यांचे स्वागत करण्याचा सज्ज आहे. यावेळी कुठला सदस्य प्रेक्षकांची मन जिंकेल हे पाहाणं रंजक असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाण करणार लवकरच लग्न, लग्नाची पत्रिका आली समोर...
  2. 'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकरनं केला चाहत्यांना प्रश्न, होणाऱ्या पतीसह फोटो व्हायरल...
  3. 'बिग बॉस मराठी 5' फेम निक्की तांबोळीनं वर्षा उसगावकरबद्दल केलं वक्तव्य, आली चर्तेत