ETV Bharat / entertainment

'क्वीन 2' वर कोर्टाची टांगती तलवार; कंगना रणौतच्या चित्रपटाविरोधात 250 कोटींचा दावा

कंगना रणौत हिचा 'क्वीन 2' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा वाद मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे.

Queen 2
'क्वीन 2' वर कोर्टाची टांगती तलवार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 7, 2026 at 8:49 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : अभिनेत्री तथा भाजपा खासदार कंगना रणौत हिने काही दिवसांपूर्वीच आपण 'क्वीन 2' चं शूट पूर्ण केल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. त्यानंतर सुरू झालेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. 2014 मधील सुपरहिट सिनेमा क्वीनचे निर्माते 'फँटम स्टुडिओज्'नं क्वीन 2 चे निर्माते 'जिओस्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'ला याप्रकरणी मंगळवारी (7 जुलै) कोर्टात खेचलं आहे. आता लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.


काय आहे प्रकरण? : सिनेमाचा दुसरा भाग बनवताना आपल्याला विश्वासात न घेताच तो तयार करण्यात आल्याचा दावा फँटमनं आपल्या याचिकेतून केला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती मागत 250 कोटींच्या नुकसानभरपाईची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. फँटमच्या दाव्यानुसार 2014 मध्ये जेव्हा क्वीनची निर्मिती करण्यात आली होती, तेव्हाच त्यांच्यात आणि जिओस्टारमध्ये करार झाला होता की, भविष्यात या सिनेमाचा सिक्वेल किंवा प्रिक्वेल बनवायचा झाल्यास तो या दोन्ही कंपन्या 50 टक्के भागीदारीत मिळून बनवतील. त्यानुसार या सिनेमासाठी फँटमनं कोणतीही परवानगी दिलेली नाही.

मात्र, जिओस्टारनं कंगनासोबत एकट्यानंच या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं चित्रिकरण पूर्ण करत करारनामा मोडल्याचा आरोप केला आहे. या सिनेमाची कुणकुण लागताच मे 2025 पासून आम्ही सतत जिओस्टार यांच्याशी बाबात वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आता आपल्याला नुकसानभरपाई मिळायलाच हवी अशी त्यांची याचिकेतील प्रमुख मागणी आहे.

जिओस्टारनं सर्व आरोप फेटाळले : दरम्यान, जिओस्टारनं हे सारे आरोप फेटाळून लावत 'क्वीन 2' हा पहिल्या सिनेमाचा दुसरा भाग नसून तो एक स्वतंत्र सिनेमा आहे. त्याचं कथानक हे पूर्णपणे नवं असून त्याचा पहिल्या भागाशी काहीही संबंध नाही. 'क्वीन' हा शब्द इंग्रजी भाषेचा अविभाज्य भाग असून त्यावर कुणाचाही कॉपीराईट नाही. त्यामुळे स्वामित्व कायद्यानुसार त्यावर कुणीही आपला दावा करू शकत नाही. अशा स्थितीत लवकरच या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणं अपेक्षित आहे.



'क्वीन'साठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार : क्वीन (Queen) हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला एक सुपरहिट चित्रपट आहे. चित्रपटाची मुख्य कथा राणी (कंगना रणौत) नावाच्या एका दिल्लीतील सर्वसामान्य मुलीच्या जीवनावर आधारित आहे. तिचा होणारा नवरा तिच्या साधेपणाला कंटाळून ऐनवेळी लग्नाला नकार देतो. यानंतर, राणी एकटीच त्यांनी ठरवलेल्या हनिमून डेस्टिनेशन पॅरिस आणि ॲमस्टरडॅमला निघून जाते. तिथं ती नवीन मित्रांना भेटते, नवीन जगाचे अनुभव घेते. तिचा हा प्रवासा तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास भरतो. ज्यामुळे ती एक स्वावलंबी मुलगी बनून भारतात परतते. कंगनाचं बदललेलं रूप आणि नंतर पश्चाताप झालेला तिचा होणारा नवरा तिच्या आयुष्यात परतू पाहतो मात्र कंगना त्याला नकार देऊन पुढचं आयुष्य जगण्यास सज्ज होते. अन्विता दत्त यांनी लिहिलेल्या या कथेवर विकस बहल यांच्या कमालीच्या दिग्दर्शनावर क्वीन हा सिनेमा उभा राहिला होता. या सिनेमासह कंगनालाही तिच्या जबरदस्त अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा

  1. 'रिव्हॉल्व्हर राणी'मधील किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतनं वीर दासला दुखापत केल्याचा दावा सत्य ? अभिनेत्यानं केला खुलासा
  2. कंगना रणौत स्टारर 'भारत भाग्य विधाता'मधील मोशन पोस्टर रिलीज...
  3. कंगना रणौत विकास बहलबरोबर 'क्वीन'च्या सीक्वेलवर करणार काम...