शिल्पा शिंदेला अटक करा, अभिनेत्री खोट्या लैंगिक छळ प्रकरणी अडकली...
शिल्पा शिंदेनं भारती सिंगसमोर निर्मात्यावर लावलेला लैंगिक छळाचा आरोप खोटा असल्याचं कबूल केलंय. तिनं आपली चूकी मानल्यानंतर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे असं अनेकजण म्हणत आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 4, 2026 at 10:51 AM IST
|Updated : June 4, 2026 at 1:18 PM IST
हैदराबाद : अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या अलीकडील विधानावरून वाद वाढत आहे. भारती सिंगच्या पॉडकास्टवर तिनं सांगितलं की, 'भाभीजी घर पर हैं'चे निर्माते संजय कोहली यांच्या विरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल तिनं केली होती. आता या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर आणखी चर्चा होत आहे. शिल्पा अडचणीत आली आहे. याशिवाय 'ये रिश्ता क्या कहलाता है' स्टार हिना खाननं शिल्पाच्या कृतीला लज्जास्पद असल्याचं म्हटलंय. आता पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेनेही शिल्पाच्या अटकेची मागणी केली आहे.
शिल्पा शिंदेनं केली कबूल चूकी : अलीकडील वक्तव्यांनंतर शिल्पा शिंदेवर सोशल मीडियावर तीव्र टीका केली जात आहे. दिल्लीस्थित एका स्वयंसेवी संस्थेनं (NGO) मुंबई पोलिसांना टॅग करून तिच्या अटकेची मागणी करणारे ट्विट केलंय. या संस्थेचं नाव 'एनसीएमइंडिया कौन्सिल फॉर मेन अफेअर्स' (NCMINDIA Council for Men Affairs) आहे. या ट्विटमध्ये असं म्हटलं गेलं आहे, 'प्रिय मुंबई पोलीस, निर्मात्याविरुद्ध लैंगिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल शिल्पा शिंदेला अटक करा.' याशिवाय स्वयंसेवी संस्थेनं शिल्पाची एक व्हिडिओ क्लिपसुद्धा पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये शिल्पा म्हणते, "मी माझ्या निर्मात्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तडजोडीनंतर मी त्यातून बाहेर पडले. यानंतर कोणत्याही निर्मात्यानं त्यांना पाठिंबा दिला नाही. मी त्या आधारावर गुन्हा दाखल केला, कारण एफआयआर दाखल करण्यासाठी अश्लील गोष्टी लिहायला पोलीस मला थेट सांगत होते. माझी पार्श्वभूमी कायद्याची आहे. त्यावेळी, ते मराठीत असल्यामुळं माझ्या मैत्रीनीही मला सांगितलं की, तुला कळतंय का तू काय करत आहात? मी म्हणाले, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मी शो सोडला. ते महाभारतासारखं होतं, ते अगदी तसंच होतं. मी आज यातून सांगत आहे की ते खोटं होतं."
Dear @MumbaiPolice please arrest Shilpa Shinde for lodging a false sexual harassment case against her producer. pic.twitter.com/JZCJY6XZLA
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) June 2, 2026
शिल्पावर झाली टीका : भारती विचारते, "तू काय बोलत आहेस?" शिल्पा उत्तर देते, "हो, मी आज पहिल्यांदाच हे कबूल करत आहे, खरंच. मग आम्ही समझोता केला, आणि माझी तीन महिन्यांची देय असलेली रक्कम देण्यात आली. त्या दिवसापासून आम्ही माध्यमांमध्ये एकमेकांबद्दल बोलणार नाही, असा एक करार झाला होता. सध्या शिल्पावर अनेकजण टीका करत आहे. बहुतेक जण हे कृत्य खूप वाईट असल्याचं म्हणत आहे. याशिवाय इतर महिलांनी असे करू नये यासाठी अभिनेत्रीला तुरुंगात टाकले पाहिजे याबद्दल देखील अनेकजण मागणी करत आहेत.

