ETV Bharat / entertainment

कीर्तनाच्या रंगात रंगलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ची कथा, तगड्या कलाकारांच्या दमदार झलक असलेला टीझर प्रदर्शित!

‘पाच फुटाचा बच्चन’ मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट कधी रिलीज होईल याबद्दल जाणून घ्या.

Marathi movie Paach Futaacha Bachchan
मराठी चित्रपट 'पाच फुटाचा बच्चन' (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : September 1, 2026 at 5:35 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भक्तीपरंपरेत कीर्तनाला अत्यंत मानाचे स्थान असून, संतांच्या अभंग, ओव्या आणि विचारांमधून भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधनाची परंपराही पुढे आली. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या अभंगवाणीनं या परंपरेला समृद्ध केलं, तर वारकरी आणि नारदीय कीर्तनाच्या माध्यमातून ती जनमानसात रुजली. संगीत, कथाकथन, विनोद, अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख संगम असलेले कीर्तन आजही महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी घट्ट जोडलेले आहे. याच पार्श्वभूमीवर बेतलेला एक चित्रपट येऊ घातलाय ज्याचं नाव आहे 'पाच फुटाचा बच्चन’. अश्या अनोख्या शीर्षकामुळे सुरुवातीपासूनच लक्ष वेधून घेणाऱ्या या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. कीर्तनाच्या माध्यमातून एका तरुणीचा संघर्ष, तिचं व्यक्तिमत्त्व आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या नाट्यमय घटनांची झलक या टीझरमधून दिसते. दमदार कलाकारांचा सहभाग आणि वेगळ्या विषयाची मांडणी हे या चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

‘पाच फुटाचा बच्चन’चा टीझर प्रदर्शित : ‘पाच फुटाचा बच्चन’ कीर्तन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. याच परिचित विश्वाला एका वेगळ्या कथानकाची जोड देत ‘पाच फुटाचा बच्चन’ची गोष्ट आकाराला आली आहे. चित्रपटाची नायिका ही एक तरुण आणि तडफदार कीर्तनकार आहे. कोल्हापुरी ढंगातील तिची भाषा, संतांचे अभंग आणि प्रभावी वक्तृत्व यामुळं तिची कीर्तनं लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहेत. अवघी पाच फूट उंची असली तरी तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मात्र भलताच मोठा आहे. त्यामुळेच तिला प्रेमानं आणि कौतुकानं ‘पाच फुटाचा बच्चन’ अशी ओळख मिळते. या महत्त्वाच्या भूमिकेतून अभिनेत्री श्रुती मधुदीप मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीझरमध्ये तिच्या व्यक्तिरेखेचा आक्रमक, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी अंदाज पाहायला मिळतो.


मात्र ही कथा केवळ नायिकेपुरती मर्यादित नसून, तिच्यासोबत पडद्यावर दिसणाऱ्या अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांच्या व्यक्तिरेखाही तितक्याच लक्षवेधी ठरत आहेत. गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमीत, क्षितीश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे आणि विनोद वणवे यांच्या वेगळ्या लुक्स आणि भूमिकांची झलक टीझरमध्ये दिसते. सुमारे दीड मिनिटांचा हा टीझर सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाट्यमय वातावरण निर्माण करतो. कीर्तनाचा बाज, व्यक्तिरेखांमधील ताणतणाव, काही अनपेक्षित प्रसंग आणि प्रभावी संवाद यामुळं चित्रपटाच्या कथेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. या कीर्तनकार तरुणीच्या आयुष्यात नेमकं कोणतं वादळ येतं? तिच्या व्यक्तिमत्त्वाला ‘बच्चन’ हे नाव कसं मिळतं? आणि तिच्या प्रवासाला कोणतं वळण मिळतं? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळणार आहेत.



‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाबद्दल : विशेष म्हणजे ‘पाच फुटाचा बच्चन’ची कथा आधी रंगभूमीवर प्रायोगिक एकपात्री नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली होती. या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. रंगभूमीवरून मोठ्या पडद्यावर आलेल्या मराठी कलाकृतींच्या परंपरेत आता या वेगळ्या विषयाच्या कलाकृतीची भर पडली आहे. नाटकाच्या प्रभावी कथाविषयाला चित्रपटाच्या व्यापक माध्यमाची जोड मिळाल्यानं या सिनेमाकडून अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्रुती मधुदीपसोबत गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमीत, क्षितीश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे आणि विनोद वणवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कीर्तनाच्या पारंपरिक विश्वाला आधुनिक सिनेमॅटिक मांडणीची जोड देणारा 'पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. ‘पाच फुटाचा बच्चन’मधून अनोखी कहाणी, श्रुती मधुदीप साकारणार मुख्य भूमिका!
  2. Paach Futacha Bacchan Marathi Drama : पाच फुटाचा बच्चन नाटकाने रसिकांना घातली भुरळ; शुभारंभाच्या प्रयोगाला जोरदार प्रतिसाद