मराठी चित्रपट 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' होणार 'या' दिवशी रिलीज, वाचा सविस्तर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटाचा थरार चित्रपटरसिकांना जानेवारीमध्ये अनुभवायला मिळणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 5, 2026 at 1:24 PM IST
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकविलक्षण जीवन चरित्राचे विविध पैलू आजवर अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पहिल्या छत्रपतींचं स्थान आबालवृद्धांच्या काळजात आहे. शौर्य, दूरदृष्टी, मुत्सद्दी वृत्ती, रयतेविषयी कळकळ, व्यवस्थापन कौशल्य, गनिमीकावा, प्रसंगावधान आदी असंख्य गुणविशेषांंचं वैभव ल्यायलेला युगपुरुषाच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्याच्या हेतूने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने 'शिवाष्टका'चा पण केला. यातलं सहावं पुष्प 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्पाल अर्पण करणार आहे. पुरंदराच्या तहानंतर आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात हजर रहावं लागल्याचा अपमान शिवरायांनी स्वराज्यासाठी सहन केला. पण आग्र्यात घडलेल्या प्रसंगांच्या मालिकेनंतर दिसलं ते प्रखर शिवचैतन्य. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सुखरुप स्वराज्यात दाखल झालेलं शिवछत्रपतींची कामगिरी आजही देशविदेशातल्या इतिहासाच्या अभ्यासकांना तोंडात बोटं घालायला लावते. 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' मध्ये शिवभक्त चित्रपटरसिकांना यातला थरार अनुभवता येणार आहे.
कधी प्रदर्शित होणार?: हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'शिवराज अष्टकातील सहावे पुष्प, 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' अध्यायातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन. 30 जानेवारी 2026 जगभरातील चित्रपटगृहात.' आधी हा चित्रपट 19 फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर रिलीज करण्यात येणार होता. मात्र आता हा चित्रपट प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनं दिग्पाल लांजेकर यांनी केलंय. दरम्यान या चित्रपटाचा आधी टीझर रिलीज केला गेला होता. हा टीझर देखील अनेकांना आवडला होता.
'रणपति शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटाबद्दल : या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाचे सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा,आलोक शर्मा (मुगाफी) हे आहेत. या चित्रपटाचे पॅनोरमा स्टुडिओज (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे. दरम्यान या चित्रपटामध्ये टीझरमध्ये औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंग दाखविण्यात आला होता. हा प्रसंग अतिशय दमदार आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या शिवाष्टकातल्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' मध्ये मात्र अभिजीत श्वेतचंद्र हा गुणी कलावंत शिवरायांच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचं आव्हान पेलताना दिसणार आहे.
'रणपति शिवराय स्वारी आग्रा'मध्ये काय असणार : 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' चित्रपटाची कहाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील धाडसी आग्रा पर्वावर आधारित असून यात रोमांचक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा एक मराठी ऐतिहासिक चित्रपट आहे. चित्रपटात रणनीतिक बुद्धिमत्ता, राजकीय फसवणुकीविरुद्धचा त्यांचा संघर्ष आणि मुघलांच्या कैदेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आलेल्या तीव्र आव्हानांबद्दल दाखवण्यात येणार आहे. चित्रपटामध्ये साथीदारांची निष्ठा आणि स्वराज्य घडवणाऱ्या शौर्याचे दर्शन आणि भारतीय इतिहासातील सर्वात अविस्मरणीय सुटकेच्या प्रसंग दाखवला जाईल.
हेही वाचा :

