अॅक्शन, प्रेम, संघर्ष आणि भावनांचा मिलाफ असणाऱ्या ‘सायको रंगा’मध्ये रंगणार दिग्गज कलाकारांची मांदियाळी!
‘सायको रंगा’ मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होईल ते जाणून घ्या.

By ETV Bharat Entertainment Team
Published : September 3, 2026 at 11:23 AM IST
हैदराबाद: मराठी चित्रपटांच्या दुनियेत आशयाइतकीच चित्रपटांची हटके आणि लक्षवेधी नावंही कायमच चर्चेचा विषय ठरली आहेत. 'सैराट', 'नटरंग', 'फँड्री', 'देऊळ', 'दुनियादारी', 'वाळवी', 'झिम्मा', 'क्लब 555' यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या नावांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आता या भन्नाट नावांच्या यादीत ‘सायको रंगा’ या आगामी चित्रपटाची भर पडली आहे. नावातच एक वेगळा गूढपणा आणि उत्सुकता निर्माण करणारा हा चित्रपट 25 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं ‘सायको रंगा’ हे नाव चित्रपटाच्या कथानकाशी नेमकं कसं जोडलेलं आहे, याची उत्सुकता सध्या निर्माण झाली आहे.
‘सायको रंगा’च्या टीझर अलीकडे प्रदर्शित झाला. आता हा टीझर पाहून चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता वाढवली आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या टीझरमधून रंगाची झलक पाहायला मिळाली होती, तर नव्या टीझरमध्ये त्याच्या आयुष्याशी जोडलेल्या विविध व्यक्तिरेखांचे पदर उलगडताना दिसत आहेत. रंगाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागे कोण आहे, त्याची नाती नेमकी कशी आहेत आणि या व्यक्तिरेखांमुळं त्याच्या आयुष्याला कोणते अनपेक्षित वळण मिळते, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.
‘सायको रंगा’ची स्टार कास्ट : नव्या टीझरमध्ये सुबोध भावे, देवेंद्र चौगुले, मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते (दादू), आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे यांची झलक पाहायला मिळते. या प्रत्येक कलाकाराची व्यक्तिरेखा कथानकात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं टीझरवरून जाणवतं. मात्र, रंगाशी त्यांचे नेमके नाते काय आणि त्याचा प्रवास या व्यक्तिरेखांमुळं कसा बदलतो, याचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होणार आहे.
दिग्दर्शक आणि निर्माते देवेंद्र चौगुले यांनी व्यक्त केल्या भावना : चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते देवेंद्र चौगुले सांगतात, “सायको रंगा’मध्ये केवळ अॅक्शनचा थरार नाही, तर त्यासोबत प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारी कथा पाहायला मिळेल. चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं आपल्या व्यक्तिरेखेला स्वतंत्र रंग दिला आहे. कथानकातील प्रत्येक पात्र आणि प्रसंग हा पुढील घडामोडींशी जोडलेला आहे. अॅक्शन, प्रेम, नाती आणि संघर्ष या सगळ्यांचा सुरेख मेळ चित्रपटात साधण्यात आला आहे. ही कथा लवकरच प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे.”
देवेंद्र चौगुले लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित असलेल्या या चित्रपटाच्या सहदिग्दर्शनाची धुरा स्नेहलराज (दादू) यांनी सांभाळली आहे. नवोदित संगीतकार उत्तम चोरडे यांनी चित्रपटासाठी वेगळ्या बाजाचे संगीत दिले आहे. दमदार अॅक्शन आणि स्टंट्ससोबत प्रेमकथा, कौटुंबिक नातेसंबंध, भावनिक संघर्ष आणि संगीताचा अनुभव देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरण्याची अपेक्षा आहे.

