रणवीर सिंगवरील बंदीबाबत मनोज बाजपेयीची प्रतिक्रिया झाली व्हायरल, वाचा सविस्तर
मनोज बाजपेयीनं फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं रणवीर सिंगवर घातलेल्या बंदीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी आपलं मत व्यक्त केलंय.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 27, 2026 at 10:28 AM IST
हैदराबाद: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं (FWICE) फरहान अख्तरच्या 'डॉन 3' चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळं रणवीर सिंगवर बंदी घातल्याची बातमी समोर आली होती. रणवीरनं या चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यानंतर फरहान अख्तरनं कामगार संघटनेकडं याप्रकरणी संपर्क साधला होता. या मुद्द्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. आता मनोज बाजपेयी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान मनोज बाजपेयी यांनी सांगितलं की, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, इंडस्ट्रीतील प्रत्येकजण हे सोशल मीडियावर वाचत आहे आणि आमच्याकडे याविषयी कुठलीही माहिती नाही. पण मी एक सहकारी आणि चित्रपटसृष्टीतील सदस्य म्हणून एवढं सांगू शकतो की, हे प्रकरण लवकरच सुटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे." यापूर्वी संजय गुप्ता यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी 'एक्स'वर लिहिलं होतं, "जेव्हा एखादा 'ए-लिस्ट' हिरो शूटिंग करतो, त्यावेळी सेटवर 300 हून अधिक कामगार काम करत असतात. त्यांच्यावर बंदी घालून, तुम्ही केवळ त्यांनाच नाही, तर बाकी सर्वांचं देखील उत्पन्न रोखत आहात. यात काय अर्थ आहे?'
'डॉन 3' वाद : दरम्यान 'डॉन 3' वादाबद्दल फरहान अख्तरनं एप्रिलमध्ये एफडब्ल्यूआयसीई (FWICE)शी संपर्क साधल्यानंतर, एफडब्ल्यूआयसीईनं रणवीरविरुद्ध असहकाराचा आदेश जारी केला होता. या संस्थेकडून रणवीरला अनेक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र यावर अभिनेत्यानं उत्तर दिलं नाही. यानंतर FWICEचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रणवीर चित्रपटातून बाहेर पडला होता. तसेच त्यानं त्यांच्या सर्व नोटिसांकडे दुर्लक्ष केलं होतं, असा आरोप झाल्यानंतर FWICEनं कारवाई केली होती.
रणवीरला तीन नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या : अशोक यांनी सांगितलं की, "आम्हाला तक्रार मिळताच, आम्ही लवकरच तक्रार नोंदवली. यानंतर, आम्ही रणवीर सिंगला आमच्याशी बोलण्यासाठी आमंत्रित करत तीन नोटिसा बजावल्या. मात्र त्यानं यावर काहीही उत्तर दिले नाही. यानंतर आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली." आम्ही घोषणा करताच, आम्हाला रणवीर सिंगकडून एक संदेश मिळाला, ज्यात त्यानं म्हटलं होतं की हे प्रकरण आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही आणि त्याच्या कराराच्या समस्या मांडण्यासाठी ही संस्था योग्य व्यासपीठ नाही. तसेच, गेल्या वर्षी फरहाननं FWICEकडे धाव घेतली होती. या प्रकरणात त्याला 45 कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचा सांगण्यात आलं होतं. फरहाननं ऑगस्ट 2023 मध्ये 'डॉन 3'ची घोषणा केली होती, ज्यात त्यानं म्हटलं होतं की रणवीर नवीन डॉन असेल. रणवीरच्या आधी या चित्रपटामधील ही भूमिका अमिताभ बच्चन आणि त्यानंतर शाहरुख खान यांनी साकारली होती. त्यांचे हे चित्रपट हिट ठरले होते.

