'द केरल स्टोरी 2 - गोज बियॉन्ड'च्या निर्मात्यांना बसला मोठा धक्का, न्यायालयाच्या स्थगितीनंतर चित्रपटाच्या रिलीजवर आलं संकट
'द केरल स्टोरी 2 - गोज बियॉन्ड' हा चित्रपट आता चांगलाचं वादात अडकला आहे. केरळ उच्च न्यायालयानं चित्रपटाच्या प्रदर्शनाला 15 दिवसांसाठी स्थगिती दिली.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 26, 2026 at 4:33 PM IST
हैदराबाद: 'द केरल स्टोरी 2 - गोज बियॉन्ड'च्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी, निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयानं सुनावणी केली आणि त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला 15 दिवसांसाठी स्थगिती दिली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांवर जातीय विभाजन भडकवण्याचा आणि राज्याचे नकारात्मक चित्रण करण्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्ड (सीबीएफसी) प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत कडक आदेश दिले. न्यायालयानं तोंडी टिप्पणी केली की, प्रथमदर्शनी असे दिसते की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)नं प्रमाणपत्र देण्यात योग्य ती काळजी आणि विवेक वापरला नाही. न्यायालयानं थेट सेन्सॉर बोर्डाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून चित्रपटाचे पुनर्मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत.
'केरल स्टोरी 2' अडचणीत : केरळ उच्च न्यायालयानं वादग्रस्त चित्रपट 'केरल स्टोरी 2'च्या प्रदर्शनावर 15 दिवसांची अंतरिम स्थगिती जारी केल्यानंतर, हा चित्रपट आणखी जास्त चर्चेत आला आहे. तसेच श्रीदेवी नंबूदिरी आणि फ्रेडी व्ही. फ्रान्सिस यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये चित्रपटाच्या शीर्षक आणि कथानकावर गंभीर आक्षेप घेतला. याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की, चित्रपटाचे शीर्षक आणि कथानक जागतिक स्तरावर राज्याची प्रतिमा खराब करते. याशिवाय राज्याच्या सांप्रदायिक सौहार्दाला बाधा पोहोचवू शकतो अशी भीती यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. न्यायमूर्ती थॉमस यांनी याबद्दल काही गोष्टी खऱ्या मानून सविस्तर चर्चा पूर्ण होईपर्यंत चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाऊ नये असा निर्णय दिला आहे.
Kerala High Court stays the release of The Kerala Story 2: Goes Beyond for 15 days. The film will not be released tomorrow. pic.twitter.com/EOZIWscLif
— ANI (@ANI) February 26, 2026
सेन्सॉर बोर्डाला दोन आठवड्यांचा अल्टीमेटम : चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यावरून खूप गोंधळ उडाला. याशिवाय न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला की, सौहार्दाचे प्रतीक असलेल्या या राज्याला सांप्रदायिक रंग का दिला जात आहे. न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं निर्मात्यांकडून प्री-स्क्रीनिंगची मागणी केली, मात्र त्यांनी नकार दिला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, चित्रपटाचे मूल्यांकन करण्यासाठी टीझरचा वापर करता येणार नाही, कारण त्याला सीबीएफसीकडून आधीच यू/ए प्रमाणपत्र मिळाले आहे. याशिवाय निर्मात्यांनी याचिकाकर्त्यांच्या अधिकारक्षेत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता 'द केरल स्टोरी 2 - गोज बियॉन्ड'च्या निर्मात्यांसाठी हा निर्णय खूप मोठा धक्का मानला जात आहे. या चित्रपटाबाबत काय निर्णय होईल यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा :

