ETV Bharat / entertainment

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी आणि महेश काळे दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींना आणि महेश काळे यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

kailash satyarthi and Mahesh Kale
कैलाश सत्यार्थींना आणि महेश काळे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 25, 2026 at 5:28 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना प्रतिष्ठित 2026च्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पुण्यातील एका भावपूर्ण समारंभात प्रदान केला गेला. याशिवाय यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक महेश काळे यांना ‘संगीत सेवे’साठी प्रतिष्ठेचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ‘26’ प्रदान करण्यात आला. दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर परिवाराच्या समृद्ध परंपरेशी जोडलेला हा सन्मान, काळे यांच्या प्रवासातील एक महत्त्वाचाटप्पा ठरला आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम : दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 84व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात एक शांत भावनिक स्पर्श होता. संगीताच्या स्वरांत, विरामांत आणि शब्दांमधल्या शांततेत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची उपस्थिती जाणवत होती. भव्यतेत नाही, तर सौंदर्यात. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स यांच्या वतीनं, सकाळ समूहाच्या सहकार्यानं आयोजित या समारंभात समाजावर ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. ही परंपरा आताही पुढं नेण्यात आली आहे. यावेळी उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, बैजू मंगेशकर आणि रवींद्र जोशी यांची उपस्थिती कार्यक्रमाला एक वेगळीच उंची देऊन गेली.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव : मुख्य पुरस्काराबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच नृत्यासाठी शमा भाटे, रंगभूमी आणि चित्रपटासाठी सुबोध भावे, आणि चित्रपटासाठी प्राजक्ता माळी यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारितेसाठी सुशील कुलकर्णी, साहित्य क्षेत्रासाठी अच्युत गोडबोले, तर डॉ. धनंजय केळकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत यांना समाजसेवेबद्दल गौरवण्यात आले. रंगभूमी आणि चित्रपटातील उल्लेखनीय योगदानासाठी मोहन आगाशे यांना ‘विशेष पुरस्कार’ देण्यात आला. ‘मोहन वाघ उत्कृष्ट नाट्यनिर्मिती पुरस्कार’ जिगीषा अष्टविनायक यांच्या ‘भूमिका’ या नाटकाला प्रदान करण्यात आला. या नाटकात सचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका असून, निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच शुक्रवार, 24 एप्रिल 2025 रोजी, गणेश कला क्रीडा मंदिर येथे पार पडलेला हा समारंभ मिलिंद कुलकर्णी यांच्या सूत्रसंचालनानं आणि सुप्रिया चिटणीस यांच्या निवेदनानं सुसज्ज झाला आणि शेवटी एक अशी संध्याकाळ देऊन गेला, जी संपली नाही, तर मनात कायमची राहिली.

हेही वाचा :

  1. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या अस्थिंचे गंगेत विसर्जन...
  2. भारतीय पार्श्वगायिका आशा भोसले यांनी 'या' पाकिस्तानी चित्रपटासाठी गाणी गायली...
  3. कोल्हापुरातील कारेकरांच्या घरात गेलं आशाताईंचं बालपण, आठवणींना उजाळा