Exclusive Interview: 'झांसी की रानी’ने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं - उल्का गुप्ता!
'केरला स्टोरी 2'नंतर 'झांसी की रानी’ फेम उल्का गुप्ताचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'रजनी की बारात' आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 29, 2026 at 1:43 PM IST
मुंबई : उल्का गुप्ता ही हिंदी दूरदर्शनविश्वातील अत्यंत गुणी आणि प्रभावी अभिनेत्री मानली जाते. तिनं लहान वयात अभिनयाला सुरुवात केली आणि अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिची सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे 'एक वीर स्त्रीकी कहानी - 'झांसी की रानी' मधील मनिकर्णिका अर्थात बाल झाशीची राणी. या भूमिकेसाठी तिनं घोडेस्वारी, तलवारबाजी आणि संस्कृतचे प्रशिक्षण घेतले होते, त्यामुळं तिच्या अभिनयाला वेगळीच उंची मिळाली. ‘झांसी की रानी’मधील तिच्या दमदार अभिनयामुळं उल्का घराघरात लोकप्रिय झाली आणि तिला विशेष ओळख मिळाली. याशिवाय तिन 'सात फेरे', 'देवों के देव… महादेव', 'शक्तीपीठ के भैरव', 'ध्रुव तारा' आणि 'मै हूँ साथ तेरे' अशा मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या. चित्रपटसृष्टीतही तिची छाप दिसून येते, 'आंध्रा पोरी', 'रुधर्मदेवी' , 'सिम्बा' ,मिस्टर कबाड़ी' आणि मराठी चित्रपट 'ओढ - द' अट्रॅक्शन' यामध्ये ती झळकली आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला 'रजनी की बारात' प्रदर्शित होतोय आणि त्यानिमित्ताने उल्का गुप्ता ने आमचे वार्ताहर कीर्तिकुमार कदमबरोबर गप्पा मारल्या.
ईटीव्ही भारत: अभिनयाची आवड तुम्हाला अगदी लहानपणापासून होती का? शाळेत असताना नाटकं वगैरे करायचात का?
उल्का : हो, अभिनयाची आवड मला अगदी लहानपणापासूनच होती. माझे वडील स्वतः अभिनेते आहेत. त्यांना पाहतच मी मोठी झाले. त्यामुळं अभिनयविश्वाशी माझं नातं खूप लहान वयातच जुळलं. फक्त अभिनेता व्हायचं एवढंच नव्हतं, तर एक सक्सेसफुल अभिनेत्री व्हायचं होतं. त्या कलेचं जगणं मी घरात रोज अनुभवत होते. चित्रपटसृष्टीचं आयुष्य किती संघर्षमय असतं, हेही मी जवळून पाहिलं आहे. इथे महिन्याच्या पहिल्या तारखेला ठरलेला पगार येत नसतो. माझे वडील दिवसभर शूटिंग करायचे, रात्री स्क्रिप्ट लिहायचे आणि वेळ मिळेल तेव्हा अभिनयाचे वर्ग घ्यायचे. त्यांनी घरीच अभिनय आणि नाट्य कार्यशाळा सुरू केल्या होत्या. बाबांनी आम्हालाही अभिनयाचं प्रशिक्षण दिलं. आमचं अभिनयाचं शिक्षण घरातूनच सुरू झालं. तेव्हाच मला जाणवलं की अभिनय हीच माझी खरी आवड आहे. माझा पहिला ब्रेकही ऑडिशनमधूनच मिळाला. ‘बा बहू और बेबी’ या मालिकेसाठी ऑडिशन्स सुरू होत्या. बाबांना त्याची माहिती मिळाली आणि त्यांनी मला तिथे नेलं. मी ऑडिशन दिलं. जेडी मजिठिया सरांना माझे एक्सप्रेशन्स आवडले आणि त्यांनी मला पहिली संधी दिली. त्या मालिकेनंतर जाहिराती, इतर मालिका अशा अनेक संधी मिळत गेल्या. पुढं ‘झाशी की रानी’ मिळाली. सुरुवातीला माझी निवड फक्त 20 भागांसाठी झाली होती. पण मालिकेला आणि माझ्या भूमिकेला प्रेक्षकांकडून इतकं भरभरून प्रेम मिळालं की, ती भूमिका वाढत गेली, आणि मी तब्बल दीड वर्ष त्या मालिकेसोबत जोडली गेले.

ईटीव्ही भारत: खरंतर हा तुमच्या अभिनयक्षमतेला सलाम होता....
उल्का : हो, खरंच. मला वाटतं ‘झांसी की रानी’नं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. माझ्या नशिबाला त्या मालिकेनं एक वेगळीच दिशा दिली.
मी त्या काळात दोन तेलुगू चित्रपट करत होते. दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला 'रजनी की बारात' या चित्रपटाची संधी मिळाली. त्या दरम्यान मी एक लघुपटही केला होता. त्या लघुपटाचे दिग्दर्शक विद्याधर हे महाराष्ट्रीयन होते. आमच्यात मराठीत संवाद झाला. तेव्हा त्यांनी मला विचारलं, “तू इतकं छान मराठी कसं बोलतेस?” आमचं बोलणं झाल्यानंतर कदाचित त्यांच्या मनात माझ्याविषयी चांगली भावना निर्माण झाली असेल आणि त्यांनीच या भूमिकेसाठी माझं नाव सुचवलं असावं. त्यानंतर माझ्या निर्मात्यांचा मला फोन आला. त्यांनी मला या चित्रपटाविषयी सांगितलं आणि म्हणाल्या, “उल्का, या भूमिकेसाठी तू अगदी योग्य वाटतेस.” त्यांना एवढंच माहीत होतं की मी ‘झाशी की रानी’मध्ये काम केलं आहे, आणि त्या भूमिकेमुळं मी या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देऊ शकेन, असा त्यांचा विश्वास होता. विशेष म्हणजे, मी स्वतः मैथिली–बिहारी कुटुंबातील असल्यामुळं या भूमिकेशी माझं एक वेगळंच नातं जुळून आलं. त्यामुळं या व्यक्तिरेखेशी मी अधिक सहजपणे जोडली गेले.

ईटीव्ही भारत: 'द केरला स्टोरी' हा अतिशय प्रभावी आणि विचार करायला लावणारा चित्रपट आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी तुम्हाला कशी मिळाली? त्यावेळी प्रतिक्रिया कशा होत्या?
उल्का : सर, 2025मध्ये मी तीन चित्रपट केले. त्यापैकी एक ‘रजनी की बारात’ आणि एक तेलुगू चित्रपट होता. दुसऱ्या एका तेलुगू चित्रपटाचं काम सुरू असतानाच मला अचानक फोन आला. 'द केरला स्टोरी'च्या पार्ट 2मधील एका विशिष्ट भूमिकेसाठी विचारण्यात आलं. ते एका मल्याळी अभिनेत्रीच्या शोधात होते. अनेक शोध घेऊनही त्यांना योग्य अभिनेत्री मिळत नव्हती. ज्या अभिनेत्रीची निवड झाली होती, तिच्या कामाबद्दल ते पूर्णपणे समाधानी नव्हते.
'द केरला स्टोरी 2'मध्ये भूमिका मिळण्याचं श्रेय मी पूर्णपणे कास्टिंग डायरेक्टर मुक्केश छाब्रा सरांना देते. त्यांच्या ऑफिसमध्ये मी असंख्य ऑडिशन्स दिल्या होत्या. इतक्या की त्यांची गणतीही नाही. पण त्यावेळी मला कधीच वाटलं नव्हतं की त्यातून माझ्यासाठी काही घडेल. आणि मग एक दिवस अचानक मुकेश सरांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं, “उल्का, 'द केरला स्टोरी'साठी तुझी निवड झाली आहे, तू ही भूमिका करशील का?” हे ऐकताच मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला.
नंतर मी त्यांना भेटायला गेले. तेव्हा मी विचारलं,“ऑडिशन कधी आणि कुठे द्यायचं?” त्यावर ते म्हणाले, “ऑडिशनची गरज नाही. विपुल सरांनी तुझं आधीचं एक ऑडिशन पाहिलं आहे आणि त्यावरूनच त्यांनी तुला निवडलं आहे.” ते ऑडिशन एका वेगळ्या भूमिकेसाठी होतं. त्यात खूप तीव्र संवाद, राग, आरडा ओरडा आणि धमकीचा सूर होता. माझा तो परफॉर्मन्स पाहूनच त्यांनी मला या भूमिकेसाठी पसंत केलं.
माझ्या आयुष्यात मी खूप ऑडिशन्स दिल्या, पण या भूमिकेसाठी ऑडिशन न देता निवड होणं, ही माझ्यासाठी देवाची कृपा होती. या इंडस्ट्रीत नेमकं काय, कधी आणि कसं घडेल, हे कुणी सांगू शकत नाही. शेवटी सगळं नशिबावर आणि योग्य वेळ येण्यावर अवलंबून असतं.

ईटीव्ही भारत: तुमचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते? प्रेक्षकांना पुढं तुम्हाला कुठं पाहायला मिळणार?
उल्का : सध्या काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. त्यापैकी एका अतिशय मोठ्या आणि दर्जेदार चित्रपटात माझी छोटी पण महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांचा 'ईठा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि त्याचा मीही एक भाग आहे.

