'यशसोबत पाण्याखालील एक धोकादायक दृश्य केलं', कबीर पाहवा कोण आहे ते जाणून घ्या...
'टॉक्सिक' चित्रपटात 'टिकट'ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार कबीर पाहवानं ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगितलं.

By Seema Sinha
Published : September 1, 2026 at 11:42 AM IST
मुंबई : कन्नड सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटात यशच्या 'टिकट' या पात्राची बालपणीची भूमिका साकारून नऊ वर्षीय बालकलाकार कबीर पाहवानं आपली छाप पाडली आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झालंय. ऑडिशनच्या वेळी, कबीरनं त्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या ऑडिशनची आठवण सांगितली आणि आपल्या दमदार अभिनयानं दिग्दर्शिका गीतू मोहनदास आणि त्यांच्या टीमला कसे प्रभावित केले होते हे सांगितले.
कबीर सांगतो की, त्यावेळी तो फक्त सात वर्षांचा होता. ऑडिशनच्या वेळी, त्याला एका हॉलिवूड चित्रपटातील एक लांब आणि भावनिक दृश्य देण्यात आले होते. हे दृश्य एका मुलावर आधारित होते, ज्याला युद्धात फोनवरून आपल्या वडिलांच्या जखमी होण्याची आणि मृत्यूची बातमी मिळते.
कबीर पाहवा म्हणाला, "मला एका असहाय्य मुलाची भूमिका साकारायची होती, जो आपले 'वडील' मरत आहेत हे ऐकून रडतो. दिग्दर्शकाला माझा अभिनय खूप आवडला आणि त्यानंतर मला 'टॉक्सिक'मधील एक दृश्य देण्यात आले." गुरुग्रामस्थित कबीर पाहवानं यापूर्वी 'शास्त्री व्हर्सेस शास्त्री', 'ओपियम' आणि 'राख' यांसारख्या प्रकल्पांवर काम केलं आहे. मात्र, तो 'टॉक्सिक'ला आपल्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानतो. कबीर सांगितलं, "टॉक्सिक'ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे, पण माझ्या अभिनयाचं कौतुक होत आहे. प्रतिसाद खूपच चांगला आहे." 'टॉक्सिक'चा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यानं लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
तो म्हणतो, "बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की, माझ्या अभिनयानं त्यांच्या अंगावर काटा आला. काहींच्या मते मी खूप नैसर्गिक दिसत होतो, तर काहींच्या मते मी भीतीदायक दिसत होतो, पण बहुतेक लोकांना वाटलं की मी चांगलं काम केलं आहे." तो पुढं म्हणतो, "कोणतेही दृश्य करताना मला भीती वाटली नाही, मला फक्त प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या."
'टॉक्सिक'ला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळाल्यापासून त्याला चित्रपट पाहता आलेला नाही. पण तो म्हणतो की बुडण्याचे दृश्य त्याचे आवडते आहे आणि त्याचा आवडता अभिनेता, यशनं, त्या दृश्यादरम्यान त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली.
कबीरनं कठीण चित्रीकरण प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आपली सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल स्टार यश आणि दिग्दर्शक गीतू मोहनदास यांना श्रेय दिलंय. कबीर म्हणाला, "गीतू मॅडम प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेचा आग्रह धरतात. मला माझे सर्वोत्तम द्यावे लागले. त्यांच्या फक्त एवढ्याच सूचना होत्या की, सर्व काही परिपूर्ण असले पाहिजे आणि मी माझे सर्वोत्तम द्यावे."
कबीरनं चित्रपटातील आपला आवडता सीनही सांगितला. तो म्हणाला, "गाडी बुडण्याचा सीन माझा सर्वात आवडता आहे. त्यासाठी मी चार महिने पोहण्याचे क्लास घेतले. पाण्याखाली शूटिंग करणं हा माझ्यासाठी एक उत्तम अनुभव होता. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला."
यशच्या पाठिंब्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "चित्रिकरणादरम्यान यश सरांनी मला चांगल वाटावं, मी पाण्याखाली सुरक्षितपणे जाईन आणि मला काहीही होणार नाही याची त्यांनी खात्री केली. माझ्यासाठी हीटरची व्यवस्था केली होती. दोन स्पॉट बॉय आणि टीममधील इतर सदस्यांनी माझी काळजी घेतली. पाण्याखाली पोहणं खूप आव्हानात्मक होतं. डोळे उघडे ठेवणे हे आणखी एक आव्हान होतं."
कबीरनं 2023मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शास्त्री विरुद्ध शास्त्री' या कौटुंबिक नाट्यपटातून अभिनयात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यानं सात वर्षांच्या यमन शास्त्रीची भूमिका साकारली आहे. यमन त्याच्या आजी-आजोबांसोबत राहतो आणि त्याचे आई-वडील त्याला आठवड्याच्या शेवटी भेटायला येतात. जेव्हा यमनच्या वडिलांना अमेरिकेत स्थलांतरित होण्याची संधी मिळते, तेव्हा कथेला कलाटणी मिळते, पण परेश रावल यांनी साकारलेले 'गुरुजी' यमनला पाठवण्यास तयार नसतात.
कबीर म्हणतो, "या चित्रपटात काम करण्याचा अनुभव मला खूप आवडला. त्यानंतर मी ठरवले की मला अभिनयातच पुढं जायचं आहे." त्यानंतर त्यानं 'ओपियम' या अद्याप प्रदर्शित न झालेल्या पाच वेगवेगळ्या कथांच्या संकलनावर काम केले, ज्यात धर्म आणि श्रद्धेचे विषय गुंफलेले आहेत. यापैकी एका कथेत, कबीरनं मोहम्मद नावाच्या एका गरीब मुस्लिम मुलाची भूमिका साकारली आहे, जो आपल्या हिंदू मित्रासाठी शेण शोधण्याचा प्रयत्न करतो. कबीर 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'राख' या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्येही दिसला होता.
कबीरच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून त्याचं लक्ष प्रामुख्यानं 'टॉक्सिक'वर केंद्रित होतं. तो म्हणतो, "माझे काही प्रोजेक्ट्स आधीच चित्रित झाले होते आणि मी त्यांच्या प्रदर्शनाची वाट पाहत होतो. गेल्या दोन वर्षांपासून मी केवळ 'टॉक्सिक'वर लक्ष केंद्रित केले. मी या चित्रपटावर खूप काम केलं."
आता, कबीर त्याच्या 'हू आर यू, नानू?' या हॉलिवूड शॉर्ट फिल्मबद्दल खूप उत्सुक आहे, जी पूर्णपणे वाराणसीमध्ये चित्रित झाली आहे. चित्रपटाची कथा नऊ वर्षांच्या ईशाभोवती फिरते, जी तिच्या आजोबांच्या अंत्यविधीनंतर गंगा नदीच्या काठावर येते. तिथे तिला तिच्या आजोबांचे खोडकर आणि उत्साही सात वर्षांचे भूत भेटते. त्यानंतर ती मृत्यूनंतरच्या जगाच्या एका अनोख्या प्रवासाला निघते.
कबीर चित्रपटाबद्दल म्हणतो, "हा एक उत्तम चित्रपट आहे. यात मी एका दिवंगत 91 वर्षीय आजोबांच्या सात वर्षांच्या भूताची भूमिका साकारली आहे. माझे पात्र आपल्या नातीसोबत खूप मजा-मस्ती करते आणि मग संध्याकाळी अदृश्य होते."
कबीरनं आपल्या भविष्याबद्दलही खूप विचार केला आहे. तो म्हणतो की त्याला आयुष्यभर अभिनेताच राहायचे आहे. तो म्हणतो, "मी माझे मन अभिनयात ओतले आहे. मला इतर कोणत्याही व्यवसायात फारसा रस नाही. मी कदाचित दुसरे करिअर करू शकेन, पण माझी पहिली पसंती नेहमीच अभिनय असेल."
कबीरच्या आयुष्यात आणखी एक पर्याय आहे. त्यानं विचार केला आहे की, जर तो अभिनेता होऊ शकला नाही, तर तो चित्रपट निर्मिती किंवा यूट्यूब क्षेत्रात उतरू शकेल. तो म्हणतो, "जर मी अभिनेता होऊ शकलो नाही, तर मी माझे स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करेन किंवा चित्रपट निर्माता बनेन. कुणास ठाऊक? मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे चित्रपट निर्मितीशी जोडलेले राहायचं आहे."

