फरहान अख्तरचं 'या' चित्रपटानंतर चमकलं नशीब, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या चित्रपटसृष्टीतल्या 'हरहुन्ररी'ची कहाणी...
फरहान अख्तर 9 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आता या विशेष प्रसंगी त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 9, 2026 at 11:17 AM IST
|Updated : January 9, 2026 at 11:43 AM IST
मुंबई - फरहान अख्तर याची ओळख चित्रपटसृष्टीतला हरहुन्नरी कलावंत अशी करुन दिली जाते. दिग्दर्शक, अभिनेता, गायक अशा अनेक जबाबदाऱ्या त्याने खुबीने निभावल्या आहेत. जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा असलेला फरहान खऱ्या अर्थाने एक 'कम्लिट पॅकेज' आहे. चित्रपटसृष्टीतल्या आजवरच्या प्रवासात त्याने हे सिद्धही करुन दाखवलं आहे. आज, 9 जानेवारी रोजी फरहान अख्तर आपला 52वा वाढदिवस साजरा करत आहे. आता त्याला अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. फरहानने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 27व्या वर्षी केली. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
फरहान अख्तरचा वाढदिवस : फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे वडील जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलं आहे. त्यांच्या यशामुळं फरहान अख्तरनं देखील वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत आपलं करिअर बनविण्याचं स्वप्न पाहिलं. फरहान लहानपणापासूनचं चित्रपटमय वातावरणात वाढलेला होता. त्यामुळं त्याला चित्रपटसृष्टीमधील काम शिकण्यासाठी वेळ लागला नाही. त्याने 2001मध्ये 'दिल चाहता है' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अशी तिहेरी भूमिका त्याने वठवली. आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खानच्या या त्रिकूटाचा हा चित्रपट तरुणाईने उचलून धरला. यानंतर त्यानं 2004मध्ये हृतिक रोशन अभिनीत 'लक्ष्य' चित्रपट दिग्दर्शित केला. ध्येय नसलेल्या तरुणाचा ध्येयाला वाहून घेण्यापर्यंतचा प्रवास सांगणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चनची महत्त्वाची भूमिका होती.
'या' चित्रपटानंतर मिळाली प्रसिद्धी : यानंतर फरहाननं शाहरुख खानबरोबर 2006मध्ये 'डॉन' चित्रपट बनवला होता. हा चित्रपट त्याचा हिट ठरला. या चित्रपटानंतर दिग्दर्शकानं आपलं नाव चित्रपटसृष्टीत मोठं केलं. 'डॉन' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शाहरुख खान, प्रियांका चोप्रा आणि ईशा कोप्पीकर हे स्टार्स दिसले होते. तसेच 'रॉक ऑन', 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' आणि 'भाग मिल्खा भाग' आदी चित्रपटांमधून त्याने आपल्याला अभिनयाचंही अंग असल्याचं दाखवून दिलं. बहीण झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या 'जिन्दगी न मिलेगी दोबारा' मध्ये ह्रतिक रोशन, आणि अभय देवोलबरोबर फरहानच्या अभिनयाचंही कौतुक झालं. त्याने दिग्दर्शक म्हणून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय त्यानं त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. 2008 साली 'रॉकऑन' साठी निर्मता म्हणून त्याने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं. 2025 हे वर्ष सरता सरता '120 बहादुर' हा चित्रपट आला होता. रेजांग ला युद्धात मेजर शैतान सिंह भाटी यांच्या नेतृत्वाखाली 5000 चीनी सैनिकांचा शौर्याने सामना करणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या 120 जवानांच्या अतुल पराक्रमाची कथा या चित्रपटात पहायला मिळाली.
वैयक्तिक आयुष्य : फरहान अख्तरनं 2000मध्ये अधुना भाबानीशी लग्न केलं होतं. दिग्दर्शनात हात आजमावण्याच्या काळात तो अधुनाला भेटला, तिच्या प्रेमात पडला. मात्र फरहानचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्याचा 2016मध्ये घटस्फोट झाला. यानंतर त्यानं शिबानी दांडेकरशी 19 फेब्रुवारी 2022मध्ये खंडाळा येथील फार्महाऊसवर लग्न केलं. या लग्नामध्ये कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
हेही वाचा :

