ETV Bharat / entertainment

Exclusive Interview: रामगोपाल वर्मा - माझा रीमेक्सच्या कल्पनेलाच विरोध आहे!

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचा ‘रंगीला’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता दिग्दर्शकानं या चित्रपटाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.

Ram gopal varma
रामगोपाल वर्मा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : November 27, 2025 at 9:51 AM IST

|

Updated : November 27, 2025 at 11:16 AM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - रामगोपाल वर्मा हे भारतीय चित्रसृष्टीतील एक वेगळ्या धाटणीचे, धाडसी आणि प्रयोगशील दिग्दर्शक मानले जातात. 'शिवा' या प्रभावी पदार्पणानंतर त्यांनी 'रंगीला', 'सत्या', 'कंपनी', 'सरकार', 'भूत', 'फॅक्टरी' यांसारख्या कल्ट चित्रपटांनी भारतीय सिनेमाला नवी दिशा दिली. 'गँगस्टर' ड्रामा, 'रिअ‍ॅलिझम', डॉक्युमेंटरी-शैलीचं सिनेमॅटिक ट्रीटमेंट आणि असामान्य कॅमेरा अँगल्स ही त्यांची खासियत मानली जाते. भयपटांना त्यांनी दिलेला वास्तववादी टोन आणि शहरी गुन्हेगारीला त्यांनी दाखवलेली काव्यात्मक गडद छटा आजही अभ्यासली जाते. संगीत, तणाव आणि शांततेचा अनोखा समतोल साधत त्यांनी अनेक पिढ्यांतील फिल्ममेकर्सना प्रेरणा दिली. आपली शैली, विचार आणि प्रयोगशीलता न बदलता त्यांनी सातत्यानं नवे विषय, नवे दृष्टिकोन आणि तांत्रिक नवोन्मेष शोधत स्वतःची एक ठसठशीत ओळख निर्माण केलेली आहे. रामगोपाल वर्मा यांचा अत्यंत गाजलेला, १९९५ साली प्रदर्शित झालेला 'रंगीला', ज्यात आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत, आता पुनःप्रदर्शित होत आहे. त्या निमित्तानं रामगोपाल वर्मा यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदमसोबत वार्तालाप केला त्यातील काही अंश.....

ईटीव्ही भारत: ‘रंगीला’च्या पुनर्प्रदर्शनामागील प्रेरणा नेमकी कोणती?
रामगोपाल वर्मा : काही चित्रपट असतात, ज्यांचे भाग्यच वेगळे असते. रिलीजच्या क्षणी त्यांनी जे साध्य केले ते एका बाजूला, परंतु कालांतरानं ते लोकांच्या हृदयात अधिकच गडदपणे रुजत जातात. ‘रंगीला’ हा तसा सुवासिक वारसा असलेला चित्रपट. त्यातील पात्रांची हसरी, खऱ्या आयुष्याशी जुळणारी उभारी, रोजच्या आयुष्याच्या लयीत मिसळणारी कथा आणि त्या काळात सिनेमासृष्टीला नवा सूर देणारे संगीत व त्याची मंत्रमुग्ध करणारी दृश्यरचना या सर्वांनी मिळून निर्मात्यांच्या मनात हा चित्रपट नव्या पिढीसमोर पुन्हा एकदा खुला करण्याची तीव्र इच्छा निर्माण केली असणार. म्हणूनच ‘रंगीला’ पुन्हा रिलीज होतोय.

ईटीव्ही भारत: आपल्या पूर्वीच्या चित्रपटांबद्दलचं भावबंध आजही तितकंच आत्मीय आहे का?
रामगोपाल वर्मा: प्रत्येक चित्रपट मनाला भिडतोच असं नाही. पण ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कंपनी’ हे माझ्यासाठी केवळ प्रकल्प किंवा कामगिरी नव्हेत, हे माझ्या दिग्दर्शकीय प्रवासातील अतिशय महत्त्वाचे मैलाचे दगड आहेत. या तिन्ही चित्रपटांशी जोडलेलं नातं आजही मनाच्या अतिशय कोवळ्या कोपऱ्यात धडधडत राहतं. काळ गेला, परिस्थिती बदलल्या, पण या चित्रपटांची ऊब आजही कमी झालेली नाही.

ईटीव्ही भारत: जर आजच्या पिढीसाठी ‘रंगीला’ पुन्हा बनवायचा ठरलं, तर कोणते कलाकार योग्य ठरतील?
रामगोपाल वर्मा: प्रामाणिक सांगायचं झालं तर ‘रंगीला’चं पुनर्निर्माण ही कल्पनाच मनाला पटत नाही. कारण हा असा चित्रपट आहे, ज्याच्या संवादांनी, गाण्यांनी आणि त्या तिन्ही प्रमुख पात्रांच्या जादूनं लोकांच्या स्मरणात अढळ स्थान निर्माण केलं आहे. कितीही वर्षं उलटली तरी लोकांच्या हृदयात त्याचं मूळ स्वरूप जसंच्या तसं टिकून आहे. नवीन चेहरे आणले तर त्या जादूची नाजूक गाठ सुटेल, आणि प्रेक्षकही ते स्वीकारणार नाहीत. ‘रंगीला’चे सौंदर्य त्याच्या मूळ रूपातच अनंत आहे.

Rangeela Movie
‘रंगीला’ चित्रपट (Poster)

ईटीव्ही भारत: म्हणजेच या चित्रपटाचं खरं सौंदर्य त्याच्या मूळ रूपातच आहे?
रामगोपाल वर्मा: होय, अगदी तंतोतंत तसंच. काही कला स्वरूपं बदलली तर त्यांचं आकर्षण हरवतं, ‘रंगीला’ त्याच पंक्तीतील.

ईटीव्ही भारत: तुम्हाला तुमचे जुने चित्रपट रीमेक करण्याची इच्छा होत नाही का? याशिवाय तुम्ही रीमेकपासून दूरच राहता?
रामगोपाल वर्मा: नाही. आतापर्यंत कधी असं वाटलंच नाही. होय, जवळजवळ पूर्णपणे. माझा रीमेक्सच्या कल्पनेलाच विरोध आहे. मला वाटतं प्रत्येक चित्रपटाचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं, त्याला पुन्हा उचलून वेगळ्या चौकटीत बसवणं योग्य नाही. नवीन गोष्टी निर्माण करणं हाच माझा स्वभाव आहे.


ईटीव्ही भारत: या चित्रपटात अभिनेता राजेश जोशीनं महत्वाची भूमिका साकारली होती. त्याच्याबद्दल काही आठवणी सांगाल?
रामगोपाल वर्मा: त्याच्याबाबत जे घडलं ते फारच दुर्दैवी. 'सत्या'च्या अर्ध्या वाटेवर नियतीनं त्याला हिरावून घेतलं. रंगीलाच्या यशात त्याचा वाटा किती मोठा आहे हे सांगताना मी एका विलक्षण योगायोगाचा उल्लेख करेन.

प्री-क्लायमॅक्समध्ये उर्मिला आणि जॅकी मुन्नाबाबत चौकशी करण्यासाठी जेव्हा राजेशकडे येतात, तो प्रसंग आधी पटकथेत नव्हताच. रिहर्सलमध्ये त्यानं अचानक आपल्या भूमिकेला एक अनपेक्षित, नाट्यमय छटा दिली. मला ते तर्कशून्य वाटलं, पण युनिटमधील प्रत्येकजण त्याच्या या स्फोटक अभिनयाने थक्क झाले. आणि मग त्या नाट्यमयतेने शेवटच्या दहा मिनिटांना इतकं भावनिक वजन दिलं की रहमानच्या संगीतासोबत त्यानं चित्रपटाला अजरामर उंचीवर नेलं. हा अपघात नव्हता—ही राजेशच्या प्रतिभेने निर्माण केलेली नियतीची सुंदर खोड होती.

ईटीव्ही भारत: अलीकडे तुम्ही फारसे चित्रपट बनविताना दिसत नाहीत. त्यामागचं कारण काय?
रामगोपाल वर्मा: एका टप्प्यानंतर मला स्वतःकडे पुन्हा निरखून पाहण्याची गरज वाटली. मी जणू माझ्याच चौकटीभोवती फिरत आहे, स्वतःला पुनःपुन्हा तसंच घडवतो आहे, अशी जाणीव झाली. सर्जनशीलतेला नवा श्वास देण्यासाठी थोडी शांतता, आत्मपरीक्षण आणि अंतर्मुख प्रवास आवश्यक असतो. त्या शोधात मी थोडा मागे सरकलो, स्वतःला नव्याने घडवण्यासाठी, आणि नव्या प्रेरणेचा जन्म होण्यासाठी.

ईटीव्ही भारत: तुम्ही बॉलिवूडमध्ये नवा प्रवाह आणला, विशेषतः 'गँगस्टर' शैलीला ग्लॅमर दिलं. या प्रवाहामागचा विचार काय होता?
रामगोपाल वर्मा: कुठलाही मोठा आराखडा किंवा नियोजन नव्हतं. हे सर्व जणू आतून आलेल्या एका सहज प्रवाहासारखं घडलं. मला फक्त त्या काळच्या मर्यादा तोडून काहीतरी अनोखं तयार करायचं होतं. वास्तवात दडलेल्या कहाण्यांना नवं रूप देताना त्या स्वतःच आकार घेत गेल्या. गँगस्टर शैलीला ग्लॅमर मिळणं, किंवा तिचं वेगळं रूप साकार होणं हे सर्व त्या अंतःप्रेरणेचं फलित होतं.

ईटीव्ही भारत: हॉरर शैलीतही तुम्ही वेगळे प्रयोग केले. तुमचा आगामी चित्रपट ‘पोलीस स्टेशन में भूत’बद्दल अधिक सांगाल का?
रामगोपाल वर्मा: हा चित्रपट एका निर्भीड एन्काउंटर स्पेशॅलिस्टची कथा सांगतो. तो एका कुख्यात गुन्हेगाराचा एन्काउंटर करतो, पण कथा तेथे संपत नाही. तोच गुन्हेगार भूत बनून परततो, आणि या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनात एक अंधारमय, रहस्यमय सावली पसरवतो. या प्रवासात थरार, तपास, अपराध, आणि अलौकिक स्पर्श अशा अनेक स्तरांवर कथा उलगडत जाते. हा विषय मुळात एक प्रकारचा ‘मास्टर डिटेक्टिव्ह थ्रिलर’ आहे, फक्त त्यात भुताची दारुण छाया साथ देत राहते.

ईटीव्ही भारत: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य मनोरंजन उद्योगांमधील अंतर आता जवळजवळ नाहीसंसं झालंय. तुमचं मत?
रामगोपाल वर्मा: हे निश्चितच भारतीय सिनेमासाठी सुवर्णक्षणासारखं आहे. ‘कांतारा’सारखी कर्नाटकातील लोककथा, किंवा ‘केजीएफ २’ सारखी प्रादेशिक भूमीवर उभी असलेली भव्य गाथा, या सगळ्यांचा संपूर्ण देशानं उत्साहानं स्वीकार केला. आज प्रांतीयतेची बंधनं मोडली आहेत. भारतातील विविध भाषांतून, विविध संस्कृतींमधून नवे दृष्टिकोन, नवे दिग्दर्शक आणि नवे सौंदर्यशास्त्र उभं राहतंय. भारतीय सिनेमा आज अधिक विविध, अधिक व्यापक आणि आश्चर्यकारक ऊर्जेनं धडधडणारा झाला आहे.

ईटीव्ही भारत: नव्या दिग्दर्शकांना काही मार्गदर्शन कराल?
रामगोपाल वर्मा: प्रामाणिकपणे सांगायचं तर मी स्वतः कधी सल्ले घेत नाही, त्यामुळं इतरांना द्यायचा प्रश्नच येत नाही. सिनेमा हा अत्यंत वैयक्तिक प्रवास आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला त्याची दृष्टि, त्याची संवेदना आणि त्याचं अंतर्मन दिशा दाखवतं. इतरांचं मत, नियम किंवा मार्गदर्शन हे सर्व दुय्यम ठरतं. आपल्या सर्जनशीलतेवर प्रामाणिक विश्वास ठेवणं हाच एकमेव मंत्र.

ईटीव्ही भारत: तरुण पिढीनं ३० वर्षं जुना रंगीला का पाहावा?
रामगोपाल वर्मा: प्रत्येक प्रेक्षकाला एखादा चित्रपट आवडण्यासाठी स्वतःचे खास कारण असते. काहींना एखादं गीत, काहींना दृश्यांची ताजगी मोहून टाकेल, तर काहींना त्या काळाची निरागसता आणि चमक आपल्याकडे खेचेल. 'रंगीला' हे फक्त एक प्रेमकथानाटक नाही, तो एक काळ, एक धडधड, एक रंगांची जादू आहे. त्या जादूतला एखादा रंग आजच्या तरुणालाही आपलासा वाटेलच, इतकी त्याची सहजता आणि सौंदर्य आजही तितकंच जिवंत आहे.

Last Updated : November 27, 2025 at 11:16 AM IST