Exclusive Interview: शैला टीके कुलकर्णी - दमदार ॲक्शनप्रधान भूमिकेत अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांसमोर येण्याची इच्छा आहे!
शैला टीके कुलकर्णी यांनी 'दृश्य अदृश्य' या चित्रपटासाठी काम केलं आहे. या चित्रपटाबद्दल त्यांनी विशेष गोष्टी शेअर केल्या आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 28, 2026 at 5:28 PM IST
|Updated : June 29, 2026 at 9:50 AM IST
मुंबई : भारतातील पहिल्या महिला ॲक्शन दिग्दर्शक म्हणून शैला टीके कुलकर्णी यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी ॲक्शन दिग्दर्शन करत आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली आहे. ब्लॅक बेल्टधारक असलेल्या शैला यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धाडसी कसरतींचे विशेष प्रशिक्षण घेतले असून जगातील नामांकित स्टंट कंपन्यांसोबतही काम केलं आहे. उंच इमारतींवरून झेप घेणं, अग्नीशी संबंधित धाडसी प्रसंग, वाहनांचा पाठलाग, शस्त्रांसह लढाई आणि कलरीपयट्टू या प्राचीन भारतीय युद्धकलेतील त्यांचे प्रभुत्व विशेष उल्लेखनीय आहे. आव्हानात्मक प्रसंगांना वास्तवदर्शी आणि प्रभावी रूप देणे ही त्यांची खासियत मानली जाते. स्त्रीही ॲक्शन दिग्दर्शनासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी होऊ शकते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे. भविष्यात मराठीतही भव्य आणि जागतिक दर्जाचा ॲक्शनपट साकारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्याचबरोबर दमदार ॲक्शनप्रधान भूमिकेत अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांसमोर येण्याची त्यांची इच्छा आहे.
ईटीव्ही भारत : ॲक्शन दिग्दर्शनातील तुमच्या प्रवासाविषयी सांगा.
शैला टीके कुलकर्णी : माझा मुख्यतः ॲक्शन दिग्दर्शक म्हणून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवास सुरू आहे. 2021मध्ये तामिळमधील 'गोलमाल' या चित्रपटापासून माझी सुरुवात झाली. त्यानंतर मेहेर, इंद्रजाल, विकी अशा चित्रपटांसह आतापर्यंत सहा दक्षिण भारतीय आणि दोन मराठी चित्रपटांसाठी मी ॲक्शन दिग्दर्शन केलं आहे.
स्त्री ॲक्शन दिग्दर्शक म्हटलं की, सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसत नाही. विशेष म्हणजे भारतातील एकमेव महिला ॲक्शन दिग्दर्शक म्हणून लोकांच्या मनात काहीशी साशंकता असते. मात्र माझं काम पाहिल्यानंतर त्यांचं मत पूर्णपणे बदलते. तेव्हाच माझ्या मेहनतीचे खरे समाधान मिळते.
मी स्वतः ब्लॅक बेल्टधारक असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील थेट धाडसी कसरतींचे नेतृत्व केले आहे. जगातील नामांकित स्टंट कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली असून त्यांच्याकडून मी विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. अभिनयाचाही अनुभव असल्यामुळं या सर्व अनुभवांचा उपयोग करून नवनवीन ॲक्शन प्रसंग उभे करण्याचा आनंद मला मिळतो. आज मी या क्षेत्रात पहिली महिला असले तरी भविष्यात अनेक मुलींनी या क्षेत्रात यावं, हीच माझी मनापासून इच्छा आहे.

ईटीव्ही भारत : तुमची खासियत नेमकी कोणत्या प्रकारच्या ॲक्शनमध्ये आहे?
शैला टीके कुलकर्णी : ॲक्शन म्हणजे केवळ मारामारी, लाथाबुक्क्या किंवा झटापट एवढेच नसते. प्रत्येक दृश्याची गरज वेगळी असते. कधी वाहनांचा पाठलाग, कधी उंच उड्या, कधी इमारतींवरून झेप घेणे, कधी शस्त्रांसह लढाई, तर कधी अग्नीशी संबंधित प्रसंग असतात. ऐतिहासिक किंवा पौराणिक कथांमध्ये तलवारी, भाले अशा शस्त्रांचा वापर आवश्यक ठरतो. आधुनिक कथांमध्ये मुक्त शैलीतील लढती, वाहनांचे अपघात, दुचाकीवरील साहसी प्रसंग किंवा आगीशी संबंधित दृश्ये असतात. त्यामुळं ॲक्शनचे क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. चित्रपटाची कथा आणि त्या विशिष्ट प्रसंगाची गरज लक्षात घेऊन त्याची रचना आणि मांडणी केली जाते.
ईटीव्ही भारत : तुम्ही स्वतःही अत्यंत धोकादायक कसरती करता. त्याविषयी सांगा.
शैला टीके कुलकर्णी : मी हार्नेसशिवाय उंचावरून झेप घेण्याचे साहसी प्रयोग केले आहेत. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात मी सातव्या मजल्यावरून सुरक्षित झेप घेतली होती. अशा प्रकारच्या कसरतींसाठी विशेष प्रशिक्षण, आधुनिक सुरक्षा साधने आणि काटेकोर खबरदारी आवश्यक असते. त्याशिवाय शरीराला नियंत्रित पद्धतीनं आग लावून केलं जाणारे प्रयोग, एअर रॅम, आर्बर स्टंट, तसेच मार्शल आर्ट्समधील विविध तंत्रांचा वापर मी करते. मी कलरीपयट्टू या प्राचीन भारतीय युद्धकलेचेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळं शस्त्रांसह लढाई असो किंवा कोणतेही साहसी दृश्य, त्याची परिणामकारक मांडणी करणे मला सहज शक्य होते.

ईटीव्ही भारत : अभिनयाऐवजी या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
शैला टीके कुलकर्णी : खरं सांगायचं तर ॲक्शन दिग्दर्शक होण्याचा माझा कधीच ठरवून केलेला विचार नव्हता. काही गोष्टी नियतीने आधीच ठरवलेल्या असतात. माझ्या कारकिर्दीची सुरुवात एका नृत्यविषयक वास्तववादी स्पर्धेची विजेती म्हणून झाली. त्यानंतर 'सीआयडी'सह अनेक कार्यक्रमांचे नृत्यदिग्दर्शन केलं. वझीर चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत छोटेखानी भूमिका साकारली. काही हिंदी मालिकांमध्येही अभिनय केला.
यानंतर मला आंतरराष्ट्रीय दबंग स्टंट स्पेक्टॅक्युलर या कार्यक्रमासाठी निवडण्यात आले. अभिनयाबरोबरच प्रत्यक्ष धाडसी कसरती करू शकणारा भारतीय चेहरा आयोजक शोधत होते. माझी मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी आणि अभिनयाचा अनुभव यामुळे माझी निवड झाली. त्या अनुभवानं माझ्यासाठी अनेक नवे मार्ग खुले झाले.
माझे संपूर्ण कुटुंबच मार्शल आर्ट्सशी संबंधित असल्यामुळं लहानपणापासूनच या प्रशिक्षणाची सवय होती. एकदा दुबईमध्ये सुट्टीदरम्यान मी एक ॲक्शन व्हिडीओ चित्रित करून समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला. तो एका दक्षिण भारतीय दिग्दर्शकानं पाहिला आणि त्यांच्या चित्रपटासाठी ॲक्शन दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. सुरुवातीला हा प्रॅन्क असावा असे वाटलं, परंतु मॉरिशसमध्ये प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर माझा ॲक्शन दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला. त्या एका संधीचं पुढं अनेक चित्रपटांमध्ये रूपांतर झालं.
ईटीव्ही भारत : मराठी चित्रपटांतील तुमच्या कामाबद्दल सांगा.
शैला टीके कुलकर्णी : 'दृश्य अदृश्य' आणि विकी या दोन मराठी चित्रपटांसाठी मी ॲक्शन दिग्दर्शन केलं आहे. 'दृश्य अदृश्य'मध्ये आव्हान असे होते की मोठ्या प्रमाणात ॲक्शन नव्हती, मात्र एका छोट्याशा हॉटेलच्या खोलीत घडणारा संघर्ष अत्यंत प्रभावी पद्धतीनं सादर करायचा होता. एका हवालदाराच्या हल्ल्यातून नायिका स्वतःची सुटका कशी करते, हा संपूर्ण प्रसंग मर्यादित जागेत उभा करावा लागला. कलाकारांची ॲक्शनची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं. त्यामुळं अंतिम परिणामाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे.
ईटीव्ही भारत : भविष्यात कोणत्या प्रकारच्या भूमिका किंवा चित्रपट करण्याची इच्छा आहे?
शैला टीके कुलकर्णी : ॲक्शन दिग्दर्शक म्हणून तर काम करत राहायचेच आहे, पण अभिनेत्री म्हणूनही एखाद्या दमदार ॲक्शनपटात प्रमुख भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे. पोलिस अधिकारी, गुप्तचर अधिकारी किंवा राष्ट्रासाठी लढणाऱ्या धाडसी व्यक्तीरेखा मला साकारायला आवडतील. मराठी चित्रपटांमध्येही भव्य, रोमांचकारी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा ॲक्शनपट निर्माण व्हावा आणि त्यातून प्रेक्षकांना एका नव्या प्रकारचा अनुभव देता यावा, ही माझी मनापासूनची इच्छा आहे.

