ETV Bharat / entertainment

Exclusive Interview: तापसी पन्नू - 'गांधारी’मधील माझी व्यक्तिरेखा मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे!

तापसी पन्नू सध्या तिच्या ‘गांधारी’मुळं चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती एका वेगळ्या शैलीमध्ये प्रेक्षकांना दिसेल.

exclusive interview  taapsee pannu
तापसी पन्नूची विशेष मुलाखत (Photo: Special arrangement)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : August 26, 2026 at 1:28 PM IST

7 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचा आपल्या दमदार अभिनयानं आणि वैविध्यपूर्ण भूमिकांनी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. ‘पिंक’मधील निर्भीड मीनल अरोरा असो, ‘नाम शबाना’मधील शबाना असो किंवा ‘थप्पड’मधील अमृता, तापसीने प्रत्येक भूमिका प्रभावीपणे साकारली आहे.

‘मनमर्जियां’, ‘रश्मी रॉकेट’, ‘हसीन दिलरुबा’, ‘लूप लपेटा’ आणि ‘डंकी’ यांसारख्या चित्रपटांतून तिच्या अभिनयाची विविध रूपे प्रेक्षकांसमोर आली. विशेषतः सशक्त आणि स्वतंत्र विचारांच्या स्त्री व्यक्तिरेखा साकारण्यात तापसीचा हातखंडा आहे. आता ‘गांधारी’ या आगामी चित्रपटात ती एका दृष्टीहीन महिलेची भूमिका साकारत असून, या व्यक्तिरेखेत अ‍ॅक्शनचा दमदार पैलूही पाहायला मिळणार आहे. ‘गांधारी’च्या माध्यमातून केवळ अ‍ॅक्शन हिरोईन नव्हे, तर परिस्थितीशी दोन हात करणारी एक कणखर स्त्री प्रेक्षकांसमोर आणण्याचा तिचा प्रयत्न आहे. ‘गांधारी’, तिची व्यक्तिरेखा, भूमिकेची तयारी आणि या चित्रपटातून मांडला जाणारा स्त्रीशक्तीचा विचार याबाबत तापसी पन्नूशी आमचे वार्ताहार कीर्तिकुमार कदम यांनी साधलेला हा खास संवाद.

Gandhari  movie
'गांधारी’ चित्रपट (Photo: Special arrangement)

ईटीव्ही मराठी : तापसी, ‘गांधारी’चा ट्रेलर अतिशय प्रभावी आहे. या चित्रपटात तुम्ही एका दृष्टीहीन व्यक्तीची भूमिका साकारत असून ती एक अ‍ॅक्शन हिरो म्हणूनही समोर येते. दृष्टीहीन व्यक्तीची भूमिका साकारताना संवेदनशीलता जपणे अत्यंत महत्त्वाचे असते. या भूमिकेसाठी तुम्ही नेमकी कशी तयारी केली?

तापसी पन्नू : या भूमिकेची तयारी करताना आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दृष्टीहीन व्यक्तीच्या अनुभवाचा आदर करणे आणि ती व्यक्तिरेखा पडद्यावर अतिनाट्यमय पद्धतीनं सादर होणार नाही, याची काळजी घेणे. त्यासाठी आम्ही एका दृष्टीहीन व्यक्तीला मदतीसाठी आमच्यासोबत घेतले होते. त्यांनी मला त्यांच्या हालचाली, शरीराची ठेवण, आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेण्याची पद्धत, दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी आणि त्यांच्या अनुभवातील बारकावे समजून घेण्यास मदत केली.

Gandhari  movie
'गांधारी’ चित्रपट (पोस्टर)

अभिनेत्यानं एखादी व्यक्तिरेखा साकारताना आपल्या कल्पनेतून काही गोष्टी जोडणे स्वाभाविक आहे, मात्र अशा भूमिकेत आपण वास्तवापासून दूर जाऊ नये, याची विशेष काळजी घ्यावी लागते. दृष्टीहीन व्यक्तीची भूमिका करताना केवळ डोळ्यांवर किंवा शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विचार करणे गरजेचे होते. त्यामुळं आम्हाला मिळालेले मार्गदर्शन खूप मौल्यवान ठरले. त्यांच्या अनुभवातून मला या व्यक्तिरेखेकडे अधिक संवेदनशीलतेनं पाहता आले आणि ती पडद्यावर शक्य तितकी नैसर्गिकपणे साकारण्याचा प्रयत्न केला.

ईटीव्ही मराठी : अनेक वर्षांनंतर तुम्ही पुन्हा अ‍ॅक्शनकडे वळत आहात. ‘गांधारी’ची कथा स्वीकारण्यामागे नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वाधिक भावली?
तापसी पन्नू : खरं सांगायचं तर, मला पुन्हा अ‍ॅक्शन करायची खूप इच्छा होती. ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’नंतर बरीच वर्षे मी अ‍ॅक्शन केली नव्हती. त्यामुळं आता जर अ‍ॅक्शन करायची असेल, तर ती केवळ अ‍ॅक्शन करण्यासाठी नसावी, तर त्यात काहीतरी नवीन आणि वेगळे असावे, अशी माझी इच्छा होती. गेल्या काही वर्षांपासून कनिका ढिल्लन आणि मी सातत्यानं एकत्र काम करत आहोत. त्यामुळं माझ्या मनात काय सुरू आहे, मला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत, याची तिला चांगलीच कल्पना असते.

मला पुन्हा अ‍ॅक्शन करायची आहे, पण त्याचबरोबर प्रेक्षकांनी मला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या रूपात पाहावे, असेही मला वाटत होते. हे कनिकाला माहीत होते. त्यामुळं एक दिवस तिनं मला ‘गांधारी’ची कल्पना सांगितली. खरं तर, कनिका मला सहसा संपूर्ण कथा सांगत नाही. ती आधी फक्त 'वन लायनर' म्हणजेच कथेचा गाभा सांगते आणि माझी प्रतिक्रिया पाहते! त्यामुळं ‘गांधारी’ची सुरुवातही तशीच झाली. मात्र त्या एका वाक्यातच मला जाणवलं की, या कथेत काहीतरी वेगळे आहे आणि हे मला नक्कीच करायचे आहे.

ईटीव्ही मराठी : म्हणजे संपूर्ण कथा ऐकण्यापूर्वीच तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो?
तापसी पन्नू : (हसत) हो, अगदी! कनिका आधी मला फक्त एका वाक्यात कथा सांगते आणि त्यावर मला हो किंवा नाही म्हणावे लागते. अर्थात, एखाद्या चित्रपटासाठी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण कथा आणि व्यक्तिरेखा समजून घेणे महत्त्वाचे असते, पण आमच्यात एकमेकांवर इतका विश्वास आहे की तिच्या एका वाक्यातूनही मला कथेची दिशा समजते.

‘गांधारी’साठी माझा सर्वात मोठा आकर्षणाचा मुद्दा हा होता की ही व्यक्तिरेखा मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन आहे, थरार आहे; पण त्यामागे केवळ स्टंट्स किंवा मारामारी नाही. या व्यक्तिरेखेच्या भावना आणि तिच्या आयुष्यात निर्माण झालेली परिस्थिती यातून अ‍ॅक्शन पुढे येते. त्यामुळे हा माझ्यासाठी नेहमीच्या अ‍ॅक्शन चित्रपटांपेक्षा खूप वेगळा अनुभव आहे.

या व्यक्तिरेखेला कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळालेले नाही. ती कोणत्याही गुप्त मोहिमेवर पाठवलेली प्रशिक्षित एजंट नाही, तिच्याकडे कोणतीही लार्जर-दॅन-लाईफ क्षमता नाही किंवा तिला मार्शल आर्ट्सचे विशेष कौशल्य अवगत नाही. तिच्याकडे असलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे तिच्या भावना आणि तिच्या मुलीबद्दल असलेले प्रेम. तिची एकमेव ओळख म्हणजे ती एक 'आई' आहे.

आणि जेव्हा एका आईला आपल्या मुलीवर संकट आलेले दिसते, मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही, तेव्हा ती आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी किती टोकापर्यंत जाऊ शकते, याची कल्पना ‘गांधारी’मधून मांडली आहे. तिच्या भावनांमधूनच तिची ताकद निर्माण होते आणि त्याच भावनांमधून अ‍ॅक्शन आणि थरारही निर्माण होतो. एक अभिनेत्री म्हणून मला अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारायची होती. त्यामुळं मला वाटलं की, पुन्हा अ‍ॅक्शन करण्याची हीच योग्य वेळ आहे.

ईटीव्ही मराठी : म्हणजे आई आपल्या अपत्यासाठी कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकते, हा या कथेचा महत्त्वाचा भाग आहे का?
तापसी पन्नू : हो, मला वाटते तोच या कथेचा भावनिक केंद्रबिंदू आहे. एका आईसाठी तिचे मूल हे तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे असते. जेव्हा तिच्या मुलीवर संकट येते आणि तिला असे जाणवते की, तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही, तेव्हा तिच्यातील आई तिला स्वतःच्या पद्धतीने लढण्याची ताकद देते. त्या क्षणी ती कोण आहे, तिच्याकडे किती साधने आहेत किंवा तिला काय प्रशिक्षण मिळाले आहे, यापेक्षा आपल्या मुलीला परत मिळवण्याची तिची इच्छा अधिक शक्तिशाली ठरते.

मला या कथेची हीच गोष्ट खूप भावली. कारण ‘गांधारी’मधील अ‍ॅक्शन हे व्यक्तिरेखेचे कौशल्य दाखवण्यासाठी नाही, तर तिच्या भावनांची तीव्रता दाखवण्यासाठी आहे. तिचा राग, तिची असहायता, तिची भीती, तिचे दुःख आणि मुलीला वाचवण्याची तिची धडपड या सगळ्यांतून अ‍ॅक्शन निर्माण होते. त्यामुळे प्रेक्षकांना तिचा संघर्ष केवळ अ‍ॅक्शनच्या रूपात दिसणार नाही, तर एका आईच्या भावनिक प्रवासाच्या रूपातही जाणवेल.

माझ्यासाठीही ही भूमिका खूप आव्हानात्मक होती, कारण अ‍ॅक्शन करताना शारीरिक तयारी तर करावीच लागते, पण त्याच वेळी प्रत्येक कृतीमागची भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणेही आवश्यक होते. त्यामुळे ‘गांधारी’मधील अ‍ॅक्शन माझ्यासाठी एक वेगळा आणि भावनिक अनुभव आहे.

ईटीव्ही मराठी : कनिका ढिल्लनबरोबर तुमची मैत्री आणि व्यावसायिक नाते खूपच खास आहे. तुमच्या दोघींच्या नात्याचा तुमच्या कामावर कसा परिणाम होतो?
तापसी पन्नू : आमच्या नात्याचा पाया म्हणजे आमचा एकमेकांवर असलेला विश्वास. गेल्या काही वर्षांत आम्ही एकत्र अनेक प्रोजेक्ट्स केले आहेत आणि त्यामुळं एकमेकींच्या काम करण्याच्या पद्धतीची आम्हाला चांगलीच ओळख झाली आहे. मला काहीतरी नवीन करायचे असेल किंवा एखादी वेगळी कल्पना मनात आली असेल, तर मी ती कनिकाबरोबर शेअर करते.

मी अनेकदा तिला वास्तविक आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या, कधी कधी अगदी विचित्र आणि अविश्वसनीय वाटणाऱ्या बातम्याही पाठवते. कधी कधी पहाटे पाच वाजताही! (हसत) मला एखादी बातमी वाचून वाटते की, ‘यातून काहीतरी भन्नाट कथा तयार होऊ शकते,’ आणि मग मी ती तिला पाठवते. कदाचित त्यातून तिच्या डोक्यात एखादी कल्पना निर्माण होईल आणि पुन्हा आम्हाला एकत्र काम करता येईल, अशी माझी इच्छा असते.

आमच्यात एकमेकांबद्दल इतका विश्वास आहे की, ती एखादी भूमिका माझ्यासाठी लिहिताना तिला विश्वास असतो की, मी ती भूमिका साकारू शकेन. त्याचप्रमाणे मला विश्वास असतो की ती एखादी कल्पना घेऊन त्याचे उत्तम कथेत रूपांतर करू शकते. मला वाटते, आमच्या या मैत्रीचा आणि परस्पर विश्वासाचा परिणाम आमच्या कामावरही दिसतो. त्यामुळं आमची केमिस्ट्री पडद्यावरही नैसर्गिकपणे उमटते.

ईटीव्ही मराठी : छाया कदम यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
तापसी पन्नू : मी छाया कदम यांची खूप मोठी चाहती आहे! त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करताना माझी अवस्था अक्षरशः एखाद्या 'फॅन' सारखी झाली होती. एखाद्या सहकलाकारासोबत पहिल्यांदा काम करताना आपण व्यावसायिकपणे वागतो, पण त्यांचे काम मी आधीपासून पाहिले होते आणि मला ते इतके आवडले होते की, त्यांच्यासमोर गेल्यावर मला माझा उत्साह लपवता आला नाही. एका फॅन प्रमाणे मला त्यांच्यासोबत एक सेल्फी काढायची होती!

‘लापता लेडीज’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’मध्ये त्यांचे काम पाहून मी अक्षरशः भारावून गेले होते. त्या भूमिका त्यांनी ज्या पद्धतीनं साकारल्या, त्यातून त्यांच्यातील ताकद आणि सहज अभिनय दिसून आला. त्यांना पाहिल्यानंतर मी माझ्या दोन-तीन दिग्दर्शकांनाही सांगितलं होतं की, “कृपया त्यांना तुमच्या चित्रपटात घ्या. भूमिका कोणतीही असो, पण त्यांना नक्की घ्या.” मला त्यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती.

मला वाटते, एखाद्या अभिनेत्याला एखाद्या सहकलाकारासोबत काम करण्याची इतकी मनापासून इच्छा असणे ही खूप सुंदर गोष्ट आहे. आणि जेव्हा ती इच्छा किंवा 'मॅनिफेस्टेशन' प्रत्यक्षात पूर्ण होते, तेव्हा त्याचा आनंद आणखी वेगळा असतो.

ईटीव्ही मराठी : आणि जेव्हा ‘गांधारी’मध्ये त्या तुमच्यासोबत असल्याचं समजलं, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
तापसी पन्नू : गंमत म्हणजे त्यांची या चित्रपटात निवड झाली आहे, हे मला सुरुवातीला माहीतच नव्हते. जेव्हा त्या या चित्रपटाचा भाग असल्याचं मला कळलं, तेव्हा मला अक्षरशः खूप आनंद झाला. माझ्यासाठी तो खूप खास क्षण होता, कारण ज्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची मी इतकी इच्छा व्यक्त केली होती, त्या अखेर माझ्याबरोबर काम करणार होत्या. त्या क्षणी मला खरंच वाटले की, हेच तर ‘मॅनिफेस्टेशन’ आहे! आपण एखादी गोष्ट मनापासून इच्छा करून बोलतो आणि नंतर ती प्रत्यक्षात घडते, तेव्हा तो अनुभव खूप सुंदर असतो. मी अनेकदा दिग्दर्शकांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि अचानक ‘गांधारी’च्या निमित्तानं मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायलाही मिळाले. त्या अतिशय ताकदीच्या अभिनेत्री आहेत आणि त्यांचा पडद्यावरील वावर खूप प्रभावी आहे. त्यामुळं ‘गांधारी’मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय आहे.

ईटीव्ही मराठी : ‘गांधारी’मधून प्रेक्षकांना तापसी पन्नूचा कोणता नवा पैलू पाहायला मिळणार आहे?
तापसी पन्नू : मला वाटते, ‘गांधारी’मध्ये प्रेक्षकांना माझा एक वेगळाच पैलू पाहायला मिळेल. या चित्रपटात अ‍ॅक्शन आहे, थरार आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाच्या आहेत त्या व्यक्तिरेखेच्या भावना. एका आईच्या मनात निर्माण होणारा संघर्ष, मुलीसाठी असलेले तिचे प्रेम, तिची असहायता, राग, भीती आणि आपल्या मुलीला परत मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तिची तयारी या सगळ्या भावना या कथेत आहेत.

माझ्यासाठी ‘गांधारी’ ही केवळ अ‍ॅक्शन भूमिका नाही. एका आईच्या भावनांमधून निर्माण होणारा अ‍ॅक्शन आणि थरार साकारण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं या चित्रपटातील प्रत्येक अ‍ॅक्शन सीक्वेन्समागे एक भावना आहे आणि त्या भावनेशी प्रेक्षक जोडले जातील, अशी मला आशा आहे.

मी आजवर केलेल्या कामांपेक्षा ही व्यक्तिरेखा आणि तिचा प्रवास निश्चितच वेगळा आहे. त्यामुळं प्रेक्षकांनी मला या नव्या रूपात पाहावे, या भूमिकेचा अनुभव घ्यावा आणि ‘गांधारी’च्या भावनिक प्रवासाशी स्वतःला जोडून घ्यावे, एवढीच माझी इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि भावनिक अ‍ॅक्शन-थ्रिलर अनुभव देईल. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 3 सप्टेंबर रोजी रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. विनेश फोगट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र, सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया - Vinesh Phogat
  2. 'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या रिलीजपूर्वी तापसी पन्नूनं दिली 'हसीन दिलरुबा 3'ची हिंट - Haseen Dillruba
  3. इंजिनीअरिंग सुरू असताना मॉडेलिंग करण्याचा केला निर्णय, आता बनली बॉलिवूडची 'हसीन दिलरुबा' - taapsee pannu