'वेलकम टू द जंगल'मधून ग्लॅमरसर्स दिशा पटानीचा कॉमेडीचा पहिलाच प्रयत्न!
'वेलकम टू द जंगल' या चित्रपटामध्ये ग्लॅमरसर्स दिशा पटानी ही कॉमेडी करताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 25, 2026 at 3:08 PM IST
हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय आणि फिट अभिनेत्रींपैकी एक असलेली दिशा पटानी सध्या तिच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटामुळं चर्चेत आहे. ॲक्शन, ग्लॅमर आणि नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाणारी दिशा या चित्रपटात प्रथमच मोठ्या प्रमाणावर विनोदी भूमिकेत दिसणार आहे. आमचे वार्ताहर कीर्तिकुमार कदम यांना पहिल्यांदाच कॉमेडी चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगताना दिशा म्हणाली की, विनोदी अभिनय करणे हे खरोखरच आव्हानात्मक असते. मात्र चित्रपटाच्या सेटवरचे वातावरण अतिशय आनंददायी होते. सहकलाकार आणि संपूर्ण टीममुळं तिला प्रत्येक दृश्य साकारताना सहजता वाटली. दिग्दर्शक अहमद खान यांनीही प्रत्येक टप्प्यावर तिला उत्तम मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्याचे ती सांगते. या चित्रपटाकडे आकर्षित होण्यामागील कारण विचारले असता दिशानं स्पष्ट केले की, या चित्रपटातील तिची भूमिका, कथा, चित्रपटातील ग्लॅमर आणि विशेषतः भव्य स्टारकास्ट यामुळं तिनं हा प्रकल्प स्वीकारला. 'वेलकम टू द जंगल'मध्ये तीसेक लोकप्रिय कलाकार एकत्र झळकणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे.
दिशाच्या तंदुरुस्तीचे रहस्य : फिटनेस आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिशाच्या तंदुरुस्तीचे रहस्य जाणून घेण्याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. याबाबत ती सांगते की, नियमित व्यायाम हेच तिच्या फिटनेसचे गुपित आहे. वजन उचलण्याचा व्यायाम, कार्डिओ, धावणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्य राखणे यावर ती भर देते. तिच्या मेहनतीचा परिणाम तिच्या व्यक्तिमत्त्वात आणि पडद्यावरील उपस्थितीत स्पष्टपणे दिसून येतो.
'वेलकम टू द जंगल'ची स्टारकास्ट : दिशाची सोशल मीडियावरही जबरदस्त लोकप्रियता आहे. इंस्टाग्रामवर तिचे कोट्यवधी फॉलोअर्स असून ती फिटनेस व्हिडिओ, फॅशन फोटोशूट्स, प्रवासातील क्षण आणि चित्रपटांशी संबंधित अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यामुळं ती केवळ अभिनेत्रीच नव्हे तर तरुणाईसाठी एक स्टाईल आणि फिटनेस आयकॉन बनली आहे. दरम्यान 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 26 जून 2026 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार असणार आहे. याशिवाय चित्रपटामध्ये सुनील शेट्टी अर्शद वारसी, रविना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, राजपाल यादव, तुषार कपूर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि दलेर मेहंदी हे स्टार्स असणार आहे.

