अभिनेत्री प्रीती झिंटाला मोठा दिलासा, जबाबदारी झटकू पाहणा-या गुगल, एक्स आणि मेटाला हायकोर्टानं सुनावलं
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि इंटरनेटवरून प्रीती झिंटाशी संबंधित आक्षेपार्ह कंटेट हटवण्याबाबतचे मनाई आदेश जारी करत असल्याचं हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं.

Published : July 6, 2026 at 7:56 PM IST
|Updated : July 6, 2026 at 8:18 PM IST
मुंबई - सोशल मीडियावरून एआय-निर्मित डीपफेक फोटो आणि मॉर्फ केलेला मजकूर हटवण्याची मागणी करणाऱ्या प्रीती झिंटाला हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. प्रत्येकाला त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीनं जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्याच्या मर्जीविरोधात त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरफायदा इतरांनी घेणं योग्य नाही, असं स्पष्ट करत एकेकाळची आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाशी संबंधित आक्षेपार्ह सामग्री हटवण्याचे आणि त्याबाबत संबंधितांना तो पुन्हा अपलोड न करण्याबाबत मनाई आदेश लवकरच जारी करू असं सोमवारी हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
जबाबदारी झटकणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना हायकोर्टानं सुनावलं - यासंदर्भात गुगल, एक्स, मेटा(फेसबुक) या दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी आपण पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं कोर्टात सांगितलं. मात्र जो काही आक्षेपार्ह कंटेट अपलोड झालाय तो वापरकर्त्यांकडून अपलोड झालाय. त्याकरता आपण जबाबादर नसून त्यासाठीच्या कारवाईसही पात्र नसल्याची भूमिका त्यांनी कोर्टापुढे मांडली. तसंच जर कोर्टानं मनाई आदेश जारी केले तर विशिष्ट कंटेंट हटवता येईल असंही मान्य केलं. याशिवाय काही पब्लिकेशन्स आणि वापरकर्ते यांच्याबाबतही याचिकेतून आक्षेप नोंदवण्यात आला होता. जो ग्राह्य धरत एखाद्याच्या परवागीशिवाय त्याच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणं योग्य नसल्याचं स्पष्ट करत संबंधितांना लवकरच मनाई आदेश जारी करु असं स्पष्ट केलंय. प्रीतीनं दाखल केलेल्या या याचिकेनुसार, तिचं नाव आणि चेहरा यांचा वापर विविध वस्तूंच्या जाहिराती, प्रमोशन आणि इतर काही ठिकाणी कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय केला जातोय. या प्रकारांमुळे आपली लोकप्रियता आणि खासगी जीवनमानावर परिणाम होऊन आपल्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा दावा प्रीतीनं आपल्या याचिकेतून केलाय. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
काय आहे प्रकरण - एआयच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडिओ, मॉर्फ्ड छायाचित्रे प्रीती झिंटाच्या नावानं तयार करण्यात आलेत. तसंच चॅटबॉट-शैलीतील संवाद व अन्य सामग्री तिच्या कोणत्याही परवानगीशिवाय तयार करून विविध सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप या याचिकेतून प्रीती झिंटा यांनी केलाय. संबंधित संकेतस्थळांना अशी सर्व सामग्री तातडीनं हटवण्याचे आदेश द्यावेत तसंच भविष्यात आपल्या परवानगीशिवाय या संबंधित कोणतीही एआय-निर्मित किंवा मॉर्फ्ड सामग्री प्रसिद्ध करण्यास त्यांना कायमस्वरूपी मनाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
हेही वाचा...

