ETV Bharat / entertainment

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रजत बेदी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचा लवकरच ‘बंधू’ चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rajat Bedi
रजत बेदी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : August 31, 2026 at 5:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : मराठी चित्रपटांमध्ये अनेक हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार हे काम करत आहेत. दरम्यान आणखी एक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहे. हिंदीपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करणारा अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमामध्ये झळकणार आहे. रजत बेदी हे आगामी मराठी 'बंधू' चित्रपटामध्ये काम करणार असल्याचं समोर आलंय. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचे पुत्र आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार आणि दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रवास करण्यासाठी सज्ज आहे.

रजत बेदी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण : मधुमती’, ‘सत्यकाम’,‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘एक चादर मैली सी’, देवदास’, यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखनातून राजिंदर सिंह बेदी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. याशिवाय नरेंद्र बेदी यांनीही ‘बंधन’, ‘खोटे सिक्के’,‘जवानी दिवानी’ ‘बेनाम’, ‘रफू चक्कर’ आणि ‘सनम तेरी कसम’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. रजत बेदी आता मराठी सिनेसृष्टीत धमाकेदार पदार्पण करणार असून त्याचे चाहते देखील यामुळं खूप खुश आहेत.

‘बंधू’ चित्रपटात दिसणार रजत बेदी : चित्रपटसृष्टीची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या बेदी कुटुंबाच्या पुढच्या पिढीचा मराठी चित्रपटसृष्टीतील एक नवा प्रवास ठरणार आहे. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याननं ‘बंधू’ हा चित्रपट 20 नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, कुलदीप सुनील ओझा आणि जुही देसाई यांनी केली आहेत.

रजत बेदीचा प्रवास : तसेच रजत बेदीबद्दल सांगायचं झालं तर त्यानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. यानंतर त्यानं 1994मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा’ जिंकली. यानंतर ‘2001: दो हजार एक’ या चित्रपटातून त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याला ‘कोई मिल गया’ मधील भूमिकेमुळं खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यानं ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘जोडी नंबर 1’, , ‘रक्त’, ‘अक्सर’, ‘पार्टनर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानं हिंदीशिवाय तमिळ,कन्नड, तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांसाठी काम केलंय. तसेच अलीकडेच त्यानं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' काम केलं आहे.

रजत बेदीनं व्यक्त केल्या भावना : मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणाबद्दल रजत बेदीनं सांगितलं,‘बेदी कुटुंबासाठी भारतीय सिनेसृष्टी ही फक्त एक इंडस्ट्री नाही, तर आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माझ्या वडिलांपासून आणि आजोबांपासून मिळालेला हा वारसा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता मराठी चित्रपटाद्वारे या प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. मराठी सिनेमा त्याच्या आशयासाठी आणि दर्जेदार कथांसाठी ओळखला जातो. त्यामुळं या चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी खूप विशेष आहे. प्रेक्षक माझ्या या नव्या भूमिकेचं आणि या चित्रपटाचं नक्कीच प्रेमानं स्वागत करतील, अशी मला अपेक्षा आहे.’

हेही वाचा :

  1. दिल्ली उच्च न्यायालयानं समीर वानखेडे यांना दिला मोठा धक्का, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दलची मानहानीची याचिका फेटाळली
  2. YEARENDER 2025 : 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'सह या वर्षातील 10 सर्वात लोकप्रिय वेब-सीरीजची संपूर्ण यादी पाहा...
  3. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'साठी आर्यन खानला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार