श्रीराम-लक्ष्मणाच्या अथांग प्रेमाची साक्ष देणारा नवा कौटुंबिक पट - 'बंधू’!
श्रीराम-लक्ष्मणाच्या अथांग प्रेमाची साक्ष देणारा नवा कौटुंबिक चित्रपट 'बंधू’ हा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 27, 2026 at 3:44 PM IST
हैदराबाद : भावा-भावांचं नातं हे फक्त रक्ताचं नसतं, तर ते विश्वासाचं, त्यागाचं आणि प्रत्येक संकटात एकमेकांची सावली बनण्याचं असतं. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यातील निष्ठा आणि प्रेमाची आठवण करून देणारी अशीच एक भावुक आणि प्रभावी कथा घेऊन ‘बंधू’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'राम श्वास, तर लक्ष्मण ध्यास—बंधुप्रेमाची हीच खरी व्याख्या अन खास!' हे ब्रीदवाक्य 'बंधू’ या चित्रपटाबद्दल बरेच काही सांगून जाते. घराघरांतील नात्यांची वास्तववादी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी एकत्र दिसणार : या चित्रपटात दोन दिग्गज कलाकारांची पहिलीच जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अत्यंत ताकदीचे अभिनेते एकत्र येत असून आपल्या अभिनयानं प्रत्येक भूमिकेला जिवंत करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि ‘इफ्फी’ विजेते जितेंद्र जोशी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. दोन भावांमधील घट्ट विणलेले बंध, त्यांच्यातील संघर्ष आणि भावनांचा कल्लोळ हे दोघे मोठ्या पडद्यावर अत्यंत जिवंतपणे साकारणार आहेत.
‘बंधू’ चित्रपटाबद्दल : हिंदी आणि दक्षिण भारतीय सिनेमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे आणि तीन पिढ्यांचा चित्रपट वारसा जपणारे रजत बेदी या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकत असून ते या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. निर्मिती जे एस् डी स्टुडिओ (JS D Studio) आणि ट्रायफ्लिक्स एंटरटेनमेंट (Triflix Entertainment) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ यांसारख्या आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शक नितीन सिंधू विजय सुपेकर यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन सांभाळले आहे. चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीताची धुरा विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली असून, त्यांच्या सुमधुर संगीतामुळं ही कथा अधिक प्रभावी ठरणार आहे.
चित्रपट कधी होणार रिलीज : ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ‘बंधू’ ही केवळ एका चित्रपटाची कथा नसून ती प्रत्येक कुटुंबातील नात्यांचा आरसा आहे. स्वतःच्या भावाच्या आनंदासाठी दुःखाचे काटे स्वीकारणारा भाऊ, नात्यात जपलेला अढळ विश्वास, सुप्तपणे वाढणारा अहंकार आणि काळाच्या ओघात समोर येणाऱ्या खडतर परीक्षा, या सगळ्या भावनिक प्रवासाचा प्रत्यय या चित्रपटातून मिळणार आहे. प्रेम, त्याग, संघर्ष आणि कौटुंबिक गुंतागुंतीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या काळजाला नक्कीच भिडेल. येत्या 20 नोव्हेंबर पासून 'बंधू' चित्रपटातील भावनिक प्रवास जवळच्या चित्रपटगृहात अनुभवता येईल.

