अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण, पत्नीसाठी केली पोस्ट शेअर
अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण झाले आहेत. आता अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 26, 2026 at 11:31 AM IST
हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाचा 26 ऑगस्ट रोजी 41वा वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या एकत्रित प्रवासावर आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याला आकार देणाऱ्या अनेक अनुभवांवर भाष्य केलंय. अनुपम यांनी स्वतःमधील आणि किरण यांच्यातील फरकांबद्दलही भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, कदाचित याच फरकांमुळं त्यांचा 41वा वर्षांचा प्रवास रंजक बनला असावा. एकमेकांना 'जसे आहोत तसे' राहण्याचे स्वातंत्र्य आणि मोकळीक त्यांनी नेहमीच दिली. त्यांनी लिहिलं, 'आम्हाला लग्नाच्या 41 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! जेव्हा लग्नाच्या वाढदिवसाला पोस्ट करण्यासाठी फोटोच उरत नाहीत, कारण तुम्ही त्यातील बहुतेक फोटो आधीच्या वर्षांतच वापरलेले असतात, तेव्हा तुम्हाला समजते की तुमचे लग्न होऊन खूप मोठा काळ लोटला आहे! 41 वर्षे. यात प्रेम, हास्य, वाद, मतभेद, सहवास, वैयक्तिक प्रवास, कठीण काळ आणि अद्भुत क्षण... सर्व काही होते!! थोडक्यात सांगायचं झालं तर, हेच तर वैवाहिक आयुष्य आहे.'
अनुपम खेर आणि किरण खेर यांचा लग्नाचा वाढदिवस : यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, 'किरण आणि मी खूप वेगळ्या स्वभावाची माणसे आहोत. आणि कदाचित याच गोष्टीमुळं हे 41 वर्षांचे आयुष्य इतके रंजक बनले आहे. आम्ही एकमेकांना 'जसे आहोत तसे' राहण्याची मोकळीक नेहमीच दिली आहे. प्रेम तर आहेच, पण मला वाटते की जसजशी वर्षे उलटतात, तसतसा परस्पर आदरही तितकाच मौल्यवान ठरतो. आयुष्य बदलते. माणसे बदलतात. परिस्थिती बदलते. पण इतक्या वर्षांनंतरही, अशी एखादी व्यक्ती सोबत असणे खूप सुंदर असते, जिनं तुमचे आयुष्य इतक्या जवळून पाहिले आहे!! आणि तुम्हीही तिचे आयुष्य पाहिले आहे.' यानंतर त्यांनी पुढं म्हटलं, 'तर, आपल्या एकत्र प्रवासाची ही 41 वर्षे! आपण परिपूर्ण नाही, स्वतंत्र विचारांचे आहोत, कधीकधी एकमेकांना चिडवणारे किंवा हाताळायला कठीणही असतो, पण तरीही आपण नेहमीच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, प्रिय किरण! देव आपल्यावर कृपा करो. आणि आपण असेच अनेक वर्षे एकमेकांच्या सोबतीने चालत राहूया. खूप खूप प्रेम.'
अनुपम खेर आणि किरण खेर याच्याबद्दल : अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या फोटोत पत्नी किरण खेरबरोबर एकत्र घालवलेल्या क्षणांची झलक दिसत आहे, याशिवाय या जोडप्याचे पुरस्कार सोहळे आणि विविध कार्यक्रमांमधील एकत्र फोटो पाहायला मिळतात. यातील एक फोटो त्यांच्या लग्नापूर्वीच्या डेटिंगच्या काळातील आहे, तर एका फोटोमध्ये हे जोडपे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. दरम्यान अनुपम खेर आणि किरण खेर यांचं ऑगस्ट 1985रोजी लग्न झालं. हे जोडपे गेल्या 41 वर्षांपासून एकत्र आहे.

