ETV Bharat / entertainment

'फडणवीस साहेब, मोदीजी, माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय...'; विशाखा सुभेदार यांची भावनिक साद

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती फटका विशाखा सुभेदार यांचा मुलगा याला बसला आहे. तो मागील चार दिवसांपासून कुवैतमध्ये अडकला आहे.

VISHAKHA SUBHEDAR APPEAL FOR HELP
अभिनेत्री विशाखा सुभेदार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 2:43 PM IST

|

Updated : March 3, 2026 at 3:54 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : इराणनं प्रत्युत्तरात अमेरिका आणि इस्रायलच्या महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला. त्यामुळं पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा अनेकांना फटका बसत आहे. कामानिमित्त आणि पर्यटनासाठी आखाती देशामध्ये गेलेले अेक भारतीय नागरिक तिथं अडकले आहेत. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मागील चार दिवसांपासून कुवैतमध्ये अडकला आहे. याबाबत विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्टकरून मुलाला भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कळकळीची विनंती केली आहे.

नागरिक, पर्यटक विमानतळांवर अडकले : अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई यांचा मृत्यू झाला. यामुळं इराणची जनता रस्त्यावर उतरली. तसंच इराणनं अमेरिका आणि इस्रायलच्या महत्वाच्या ठिकाणांवर प्रतिहल्ला केला. यामुळं पश्चिम आशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासह अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळं कतार, कुवैत, संयुक्त अरब अमिराती यांच्यासह अनेक देशांनी आपल्या हवाई सीमा बंद केल्या आहेत. यामुळं या देशांमध्ये विविध देशातील नागरिक आणि पर्यटक अडकले आहेत. यामध्ये मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाचादेखील समावेश आहे. विशाखा सुभेदार यांचा मुलगा इंग्लंडला जात होता. दरम्यान तो कुवैत इथं अडकला आहे.

विशाखा सुभेदार यांची कळकळीची विनंती : मागील दिवसांपासून विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवैतमध्ये असल्याने, त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत, जसं दुबईत अडकलेल्या नागरिकांना भारतात सुखरुप आणलं तसंच कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची विनंती विशाखा सुभेदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे.

काय म्हणाल्या विशाखा सुभेदार : "नमस्कार मी विशाखा सुभेदार... माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. पण कुवैतमध्ये 'लेओव्हर' असल्यामुळं त्याची फ्लाईट कुवैतमध्ये उतरवण्यात आली. पण मागील चार दिवस एअरस्पेस नसल्यामुळं विमानं रद्द आहेत. त्यामुळं चार दिवसांपासून माझा मुलगा कुवैतमध्ये अडकला आहे. तिथली परिस्थिती गंभीर होत आहे. बातम्यांच्या माध्यमातून तिथली परिस्थिती बघतोय. माझा मुलगा त्याठिकाणी परिस्थिती अनुभवतोय. कुवैतमध्ये अनेक ड्रोन हल्ले होत आहेत. एअर लाईन्स सर्व्हिसेसनं त्याची एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. जसं दुबईतील लोकांना आणलं. तसंच आता कुवैतमधील नागरिकांना देखील आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे," अशी विनंती विशाखा सुभेदार यांनी केली.

अनेक पोरांच्या आया वाट बघत आहेत : "अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंबं आपल्या पोरांची मायदेशी वाट बघत आहेत. त्यामुळं त्यांना लवकरात लवकर मायदेशात आणण्याची व्यवस्था करावी. आमच्या मुलांची काळजी घ्यावी. एवढीच विनंती सरकारला आणि भारताच्या पंतप्रधानांना करत आहे. लवकरात लवकर त्यांनी यासाठी मार्ग काढावा," असंदेखील विशाखा सुभेदार यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना सुरक्षित आणणार : "अनेक लोक बाहेर देशात अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांची विचारपूस केली. त्यांना माझा मोरल सपोर्ट मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीनं विशेष दोन विमान पाठवली आहेत. ते टेक ऑफ करून इकडं येतील. आणखी काही लोक अडकले होते, त्यांच्याशी संपर्क झाला आहे. ठाणे आणि पुणे येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणणार आहोत. पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकार प्रयत्न करून त्यांना सुखरुप परत आणणार आहेत. घाबरू नका, ते सर्व सुखरुप आहे. दुबईमध्ये अडकलेल्यांना मदत करत आहोत. संकट असेल तिथं शिवसेना असते. शिवसेनेनं रात्री 2 विशेष विमान पाठवली आहेत. 174 नागरिक सुरक्षित पोहोचतील. राहुल कनाल गेला असून तो लोकांना मदत करतोय. आणखी काही लोक मदत करत आहेत. ते लवकर मुंबईत सुरक्षित पोहचतील. पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रीदेखील संपर्क केला आहे. सर्व जण मदत करत आहेत," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विशाखा सुभेदारांच्या मुलाला आणण्याची व्यवस्था करतोय : विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियात पोस्ट करून मुलाला परत आणण्याची सरकारकडं मागणी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "विशाखा सुभेदार यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांचा मुलगा कुवैतमध्ये आहे. कुवैतमधून इकडं आणायची व्यवस्था करत आहोत. तिकडं ते सुरक्षित राहतील, याचीदेखील काळजी घेतली जात आहे."

हेही वाचा :

  1. लाइव्ह US Israel Iran War Live Updates : सलग चौथ्या दिवशी युद्धाचा भडका, इराणनं बहरीनमधील अमेरिकेच्या एअर बेसवर हल्ला केल्याचा दावा
  2. सौदीच्या रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला; प्रत्युत्तर लवकरच- ट्रम्प यांचा इशारा
  3. दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था; संध्याकाळी 164 प्रवासी मुंबईत दाखल होणार
Last Updated : March 3, 2026 at 3:54 PM IST