'ही माझी पहिलीच अॅक्शन वेब सीरिज आहे' नेटफ्लिक्सच्या 'तस्करी'बद्दल अमृता खानविलकरनं शेअर केला अनुभव...
अमृता खानविलकर आता 'तस्करी'मध्ये दिसणार आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 8, 2026 at 1:07 PM IST
मुंबई - मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, जिनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं नव्या वर्षाची सुरुवात एकदम दमदार पद्धतीनं केली आहे. तिची बहुप्रतीक्षित वेब सीरिज 'तस्करी' सध्या खूप चर्चेत आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर हा आता प्रदर्शित झाला आहे. 'तस्करी' 14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. ही एक थरारक अॅक्शन पॅक सीरिज आहे. या सीरीजमध्ये आता बॉलिवूड स्टार इमरान हाशमी देखील दिसणार आहे. ही सीरीज 14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलंय. दरम्यान सीरीजबद्दल बोलताना अमृतानं सांगितलं, "तस्करी'चा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरला आहे. माझ्यासाठी 2025ची सुरुवात देखील धमाकेदार होती, कारण मागील वर्षी जानेवारीमध्येच मी 'तस्करी'च्या शूटिंगला सुरुवात केली आणि 2026च्या नव्या वर्षाची सुरुवात तिच्या रिलीजनं होणार आहे, याहून नवीन वर्षाची काय सुंदर सुरुवात होऊ शकते! 'तस्करी'चा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूप जास्त अविस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी मला ऑडिशनही द्यावं लागलं नाही. कास्टिंग डायरेक्टर विकी सदानाह यांच्या माध्यमातून माझी नीरज सरांशी भेट झाली. मी एक सीन सादर केला आणि त्यांना तो खूप आवडला आणि तिथेच 'तस्करी'ची गोष्ट पक्की झाली."
'तस्करी'मध्ये अमृता खानविलकर दिसणार : अमृतानं पुढं सांगितलं, "ही सीरीज माझ्या कारकिर्दीतील पहिलीच अॅक्शन वेब सीरीज आहे आणि म्हणून माझ्या संपूर्ण प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सीरीजमध्ये मी भरपूर अॅक्शन सीन केले आहेत. माझी व्यक्तिरेखा 'मिताली' ही असून खूपच स्ट्रॉंग आणि कस्टम्स टीममधील मी एक महत्त्वाची सदस्य आहे. मितालीच्या भूमिकेत शिरून स्वतःचा हा नवा पैलू अनुभवताना मला खूप आनंद झाला आणि यातून एक नवी अमृता मला गवसली." नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं हा अमृतासाठी एक शिकण्याचा अनुभव ठरला असेही तिनं सांगितलं. यानंतर तिनं म्हटलं, "नीरज सर एखादा सीन, ज्या पद्धतीनं विचारात घेतात आणि साकारतात ते अप्रतिम आहे. त्यांच्या सेटवर प्रत्येक क्षण वेगवान आणि ऊर्जेने भरलेला असतो. पुढं काय होणार याची कलाकारांना कायमच उत्सुकता असते. जणू थिएटर करत असल्यासारखं वाटतं लांब टेक्स, अनेक हालचाली आणि एका फ्रेममध्ये अनेक कलाकार. मोठ्या जमावाचे दृश्य हाताळण्यात ते खरोखरच तरबेज आहेत."
अमृता खानविलकरनं व्यक्त केल्या भावना : अमृताचा नेटफ्लिक्सबरोबर हा पहिला प्रोजेक्ट आहे. या संधीबद्दल बोलताना अमृतानं म्हटलं "नेटफ्लिक्स सारखा प्लॅटफॉर्म आणि नीरज पांडे यांच्यासारखे निर्माते हा दुहेरी योग जुळून आला आणि अशा प्रोजेक्टबरोबर वर्षाची सुरुवात होणं खूप खास वाटतंय. मला नेहमीच नेटफ्लिक्सबरोबर काम करायचं होतं आणि तेही नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली म्हणजे सोने पे सुहागा! मुंबई विमानतळावर शूटिंग करणं आणि संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष काम करताना पाहणं, हा स्वतःतच एक विलक्षण अनुभव होता." तसेच अमृता पुढं 23 जानेवारीपासून डिस्नी हॉटस्टारवरील 'स्पेस जेन – चंद्रयान' या आगामी प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे.
हेही वाचा :

