'रामायण'मध्ये लक्ष्मणाची भूमिका कशी रवी दुबेला मिळाली याबद्दल झाला खुलासा...
'रामायण'मधील रवी दुबेला लक्ष्मणाची भूमिका कशाप्रकारे मिळाली याबद्दल त्यानं सांगितलं आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 27, 2026 at 4:02 PM IST
हैदराबाद : अभिनेता रवी दुबे हा भारतीय मनोरंजन उद्योगातील सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. त्यानं केवळ एक अभिनेता म्हणून एक मजबूत ओळख निर्माण केली नाही तर ड्रीमियाता एंटरटेनमेंट या त्याच्या बॅनरद्वारे एक यशस्वी निर्माता म्हणूनही लक्षणीय यश मिळवले आहे. आता तो एका मोठ्या प्रोजक्टचा भाग आहे. तो नितेश तिवारी दिग्दर्शित भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'रामायण'मध्ये असणार आहे. या पौराणिक गाथेत रवी दुबे लक्ष्मणची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात काम करण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात एक खास योगायोग घडला, जो त्यानं अलीकडेच शेअर केला.
रवी दुबेला कसा मिळाला लक्ष्मणचा भूमिका : रवीनं खुलासा केला की चित्रपटात काम करण्यापूर्वी अगदी एक वर्ष आधी, त्यानं लखनौमधील एका शूटिंग दरम्यान लक्ष्मण मंदिराला भेट दिली होती. तो म्हणाला, "चित्रपटासाठी लॉक होण्यापूर्वी सुमारे एक वर्ष आधी, मी लखनौमध्ये शूटिंग करत होतो. मी बाईक चालवत होतो आणि माझी नायिका मागे बसली होती. आम्ही रस्त्यावर फिरत होतो. त्यावेळी, मी माझ्या दिग्दर्शकाशी फोनवर बोलत होतो. दिग्दर्शकानं 'कट' म्हटले, म्हणून आम्ही बाईक पार्क केली आणि पुढील सूचनांची वाट पाहिली. मग मी मागे वळून पाहिले तर तिथे एक मंदिर होते, ते लक्ष्मणजींचे मंदिर होते."
अद्भुत योगायोग : त्यानं पुढं सांगितलं, "मला कधीच माहित नव्हते की, तिथे असे मंदिर आहे. तेव्हा मला कळले की, लखनौ प्रत्यक्षात 'लक्ष्मणपुरी' आहे. पौराणिक कथेनुसार, जर मी चुकलो नसेन तर हे ठिकाण स्वतः भगवान रामानं लक्ष्मणला दिले होते. त्या क्षणी, मला मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा झाली. मी आत गेलो, हात जोडून आदरांजली अर्पण केली. तिथे राम, सीता आणि लक्ष्मण या पारंपारिक त्रिमूर्तीची प्रतिमा होती. मी थोडा वेळ बसलो, प्रार्थना केली आणि बाहेर आलो. मी त्या प्रतिमेचा फोटो देखील काढला." रवीनं असेही पुढं सांगितलं की, त्यावेळी तो ज्या शोचे शूटिंग करत होता त्या शोमधील त्याच्या पात्राचे नाव 'लखन' होते. त्या शोचे नाव 'लखन लीला भार्गव' होते. तो म्हणाला, "हा एक अद्भुत योगायोग होता आणि जेव्हा मी चित्रपटासाठी लॉक झालो, तेव्हा तीच प्रतिमा माझ्यासमोर आली. मला जाणवले की, मी ही घटना पूर्णपणे विसरलो होतो. बरोबर एक वर्षानंतर, त्याच मंदिरात गेल्यानंतर, मला चित्रपटात लक्ष्मणची भूमिका मिळाली."
रामायण कधी होणार रिलीज : प्रेक्षक आता रवीला मोठ्या पडद्यावर लक्ष्मणाच्या शक्तिशाली भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या भव्य चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दोन भाग जगभरात आयमॅक्समध्ये प्रदर्शित होईल. पहिला भाग 2026च्या दिवाळीला आणि दुसरा 2027च्या दिवाळीला प्रदर्शित होईल.
हेही वाचा :

