ETV Bharat / entertainment

Interview: अमेय वाघ - चांगला चित्रपट केवळ एका कलाकारामुळे घडत नाही, तर संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नातून तयार होतो!

अभिनेता अमेय वाघचा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्यानं या आगामी चित्रपटाबद्दल काही गोष्टी उघड केल्या आहेत.

Amey wagh Interview
अमेय वाघ मुलाखत (Special Arrangement)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : July 9, 2026 at 10:48 AM IST

7 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मराठी रंगभूमी, चित्रपट, वेब सीरीज आणि सूत्रसंचालन या चारही क्षेत्रांत आपल्या बहुआयामी अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. मुरांबा, गर्लफ्रेंड, धुरळा, फास्टर फेणे यांसारख्या मराठी चित्रपटांसह असुर, कालापानी आणि स्कॅम 1992 यांसारख्या गाजलेल्या हिंदी वेब सीरीजमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली आहे. छोट्या पडद्यावरील 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'अमर फोटो स्टुडिओ'सारख्या नाटकांमुळेही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यांचे प्रभावी सूत्रसंचालन करूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांच्या 'फ्रेम' या चित्रपटात तो 'सिद्धार्थ' या तरुण फोटो जर्नलिस्टची मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. या निमित्तानं आमचे वार्ताहर कीर्तिकुमार कदम यांनी अमेय वाघ यांच्याशी त्यांच्या भूमिकेची तयारी, नागराज मंजुळं यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि 'फ्रेम'च्या निमित्तानं माध्यमविश्वाकडे नव्या दृष्टीनं पाहण्याबाबत मनमोकळा संवाद साधला.

ईटीव्ही भारत: एखादा चित्रपट किंवा प्रोजेक्ट स्वीकारताना तुम्ही कोणत्या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देता? एखादी भूमिका निवडण्यामागची तुमची प्रक्रिया कशी असते?
अमेय वाघ: खरं सांगायचं तर, मी प्रोजेक्ट निवडतो असं मला कधीच वाटत नाही. उलट काही प्रोजेक्ट्सच आपल्याला निवडतात, असं माझं ठाम मत आहे. कलाकार म्हणून आपण अनेक कथा ऐकतो, अनेक भूमिका समोर येतात. पण प्रत्येक भूमिकेशी आपलं नातं जुळतंच असं नाही. काही भूमिका अशा असतात की, त्या त्या वेळेस आपण करू शकत नाही किंवा त्या आपल्यासाठी योग्य नाहीत असं वाटतं. अशा वेळी त्या प्रोजेक्टला नम्रपणे नकार देणं हेच योग्य असतं.

माझ्यासाठी एखादी भूमिका स्वीकारण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कथेचा प्रामाणिकपणा. ती कथा मला एक प्रेक्षक म्हणून किती भिडते, ती मला विचार करायला भाग पाडते का, त्या पात्राचा प्रवास मला आतून स्पर्श करतो का, हे मी सर्वप्रथम पाहतो. त्यानंतर दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, पटकथा आणि संपूर्ण टीम याचाही विचार करतो. कारण चांगला चित्रपट हा केवळ एका कलाकारामुळं घडत नाही, तर संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नातून तयार होतो.

'फ्रेम'ची कथा पहिल्यांदा ऐकली, तेव्हाच ती माझ्या मनाला खूप भावली. ही केवळ एका फोटो जर्नलिस्टची कथा नाही, तर आजच्या काळातील माध्यमांचं बदलतं स्वरूप, सत्याचा शोध आणि माणुसकी यांवर भाष्य करणारी संवेदनशील गोष्ट आहे. एक प्रेक्षक म्हणूनही ही कथा मला खूप महत्त्वाची वाटली आणि अभिनेता म्हणून तर अशा चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

म्हणूनच 'फ्रेम' स्वीकारताना मला फार विचार करावा लागला नाही. मला वाटलं की, ही अशी कथा आहे, जी सांगितली जाणं गरजेचं आहे आणि अशा चित्रपटाचा भाग होणं ही माझ्यासाठी एक जबाबदारी आणि तितकाच आनंदाचा अनुभव आहे.

Amey wagh Interview
अमेय वाघ मुलाखत (Special Arrangement)

ईटीव्ही भारत : 'फ्रेम'चा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. या चित्रपटात तुम्ही 23 वर्षीय फोटो जर्नलिस्ट 'सिद्धार्थ'ची भूमिका साकारत आहात. हे पात्र साकारण्याचा अनुभव कसा होता? सिद्धार्थचा प्रवास तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आणि समृद्ध करणारा ठरला?

अमेय वाघ: सिद्धार्थचा प्रवास माझ्यासाठी खूपच समृद्ध करणारा आणि विचार करायला लावणारा होता. प्रत्येक कलाकाराला काही भूमिका अशा मिळतात, ज्या केवळ अभिनय करण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या तुमच्याही विचारविश्वावर परिणाम करतात. 'फ्रेम' हा तसाच चित्रपट आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारतो आणि त्याची तयार उत्तरं देत नाही. त्यामुळं या चित्रपटाची पटकथा वाचताना मी केवळ अभिनेता नव्हतो, तर एक प्रेक्षकही होतो. मलाही या कथेने अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं आजही मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थ हा फक्त एक फोटो जर्नलिस्ट नाही, तर आपल्या कामाबद्दल प्रचंड संवेदनशील, जिज्ञासू आणि प्रामाणिक असलेला तरुण आहे. तो घटनांकडे फक्त कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहत नाही, तर माणुसकीच्या नजरेतूनही पाहतो. त्या भावविश्वात शिरणं आणि त्याची मानसिकता समजून घेणं, ही माझ्यासाठी या भूमिकेतील सर्वात मोठी गोष्ट होती.या भूमिकेसाठी मला विशेष तयारी करावी लागली. मी अनेक वर्षं कॅमेऱ्यासमोर काम करत आलो आहे, पण डीएसएलआर कॅमेरा हाताळून फोटो काढण्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नव्हता. त्यामुळं फोटो जर्नलिस्ट कॅमेरा कसा हाताळतो, योग्य क्षण कसा टिपतो, गर्दीत कसा वावरतो आणि सतत सतर्क कसा राहतो, याचं प्रशिक्षण घेतलं. आमचे दिग्दर्शक विक्रम पटवर्धन स्वतः पूर्वी प्रेस फोटोग्राफर असल्यामुळं त्यांनी आम्हाला या व्यवसायातील बारकावे अतिशय वास्तववादी पद्धतीने शिकवले. त्यामुळं पडद्यावर दिसणारा प्रत्येक हावभाव आणि कॅमेरा हाताळण्याची शैली नैसर्गिक वाटावी, यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली.

एक विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटात वापरण्यात आलेल्या अनेक छायाचित्रांपैकी बरीच छायाचित्रं मी आणि नागराज दादांनी स्वतः काढली आहेत. त्यामुळं या भूमिकेशी माझं नातं आणखी घट्ट झालं. माझी पत्नीही फोटोग्राफीची आवड जोपासते. मीच तिला एकदा डीएसएलआर कॅमेरा भेट दिला होता. या चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिच्याकडूनही मला कॅमेरा हाताळण्याबाबत आणि फोटोग्राफीच्या अनेक तांत्रिक गोष्टींबाबत खूप मदत झाली.

एकंदरीत, सिद्धार्थ साकारताना मी केवळ एका पात्राचा अभिनय केला नाही, तर फोटो जर्नलिस्टच्या जगाकडं नव्या नजरेनं पाहायला शिकलो. हा अनुभव मला अभिनेता म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही अधिक समृद्ध करून गेला.

Amey wagh Interview
अमेय वाघ मुलाखत (Special Arrangement)

ईटीव्ही भारत : प्रेस फोटो जर्नलिस्टला एक परफेक्ट छायाचित्र टिपण्यासाठी अनेकदा मोठी धावपळ, संयम आणि जोखीम पत्करावी लागते. ही भूमिका साकारण्यासाठी तुम्ही काही प्रत्यक्ष अभ्यास, निरीक्षण किंवा ग्राउंड लेव्हल रिसर्च केला होता का?
अमेय वाघ : हो, या भूमिकेसाठी वेगळ्या प्रकारची तयारी नक्कीच होती. मात्र, पूर्णपणे नव्यानं सुरुवात करावी लागली असं नाही. अभिनेता म्हणून चित्रपट, नाटक आणि वेब सीरीज या क्षेत्रात काम करत असल्यामुळं माध्यमांशी आमचा सतत संपर्क येत असतो. एखाद्या कार्यक्रमात, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान किंवा पत्रकार परिषदांमध्ये प्रेस फोटोग्राफर्स कसे काम करतात, त्यांचं निरीक्षण नकळतपणे अनेक वर्षं होत आलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामाची एक प्राथमिक ओळख आधीपासूनच होती.

याशिवाय मी मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळं पत्रकारिता, माध्यमांची कार्यपद्धती, बातमीमागची प्रक्रिया आणि मीडिया क्षेत्रातील जबाबदाऱ्या यांचा अभ्यास मी शैक्षणिक स्तरावरही केला आहे. त्या काळात जे काही शिकलो होतो, ते या भूमिकेत खूप उपयोगी पडलं. अनेक गोष्टी पुन्हा आठवल्या आणि त्या अभिनयात वापरता आल्या.
आमचे दिग्दर्शक विक्रम पटवर्धन स्वतः पूर्वी प्रेस फोटोग्राफर असल्यामुळं त्यांचा अनुभव आमच्यासाठी खूप मोलाचा ठरला. त्यांनी केवळ कॅमेरा कसा हाताळायचा हेच शिकवलं नाही, तर एखाद्या फोटो जर्नलिस्टचा विचार करण्याचा दृष्टिकोन, घटनास्थळी त्याची मानसिकता, योग्य क्षण टिपण्याची धडपड आणि त्यामागची जबाबदारीही समजावून सांगितली. त्यामुळं ही भूमिका केवळ बाह्यरूपात न वाटता, आतून समजून घेऊन साकारता आली.

माझ्या मते, फोटो जर्नलिस्टचं काम हे फक्त फोटो काढण्यापुरतं मर्यादित नसतं. तो इतिहासातील महत्त्वाचे क्षण जतन करत असतो. त्या भावनेची जाणीव या भूमिकेमुळं मला अधिक खोलवर झाली. त्यामुळं माझं आधीचं शिक्षण, माध्यमांशी आलेला अनुभव आणि विक्रमचं मार्गदर्शन या सगळ्यांचा एकत्रितपणे या भूमिकेला खूप मोठा फायदा झाला.

ईटीव्ही भारत : प्रेक्षकांनी तुम्हाला अनेकदा हलक्याफुलक्या, विनोदी आणि 'चॉकलेट बॉय' भूमिकांमध्ये पाहिलं आहे. अशा पार्श्वभूमीवर फ्रेममधील सिद्धार्थसारखी गंभीर आणि संवेदनशील भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता? या पात्रानं अभिनेता म्हणून किंवा माणूस म्हणून तुमच्यात काही बदल घडवला का?
अमेय वाघ : खरं सांगायचं तर, मला नेहमीच फक्त कॉमेडी किंवा 'चॉकलेट बॉय' भूमिका केल्याचं लेबल योग्य वाटत नाही. कदाचित काही लोकप्रिय भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनात तशी प्रतिमा तयार झाली असेल, पण माझ्या कारकिर्दीकडं नीट पाहिलं, तर मी अनेक वेगवेगळ्या धाटणीची पात्रं साकारली आहेत. 'असुर'मध्ये मी अत्यंत गंभीर आणि टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत अशा सीरीयल किलरची भूमिका केली होती. 'कालापानी'मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली, 'फास्टर फेणे'मध्ये डिटेक्टिव्हची भूमिका केली, तर 'क्रांतीज्योती'मध्ये पूर्णपणे वेगळ्या ढंगाचा आगरी तरुण साकारला. त्यामुळं स्वतःला एका विशिष्ट चौकटीत मी कधीच पाहिलं नाही.

माझ्यासाठी प्रत्येक नवीन भूमिका म्हणजे एक नवीन माणूस समजून घेण्याची संधी असते. 'फ्रेम'मधला सिद्धार्थही तसाच होता. तो अत्यंत संवेदनशील, प्रामाणिक आणि आपल्या कामाकडं जबाबदारीनं पाहणारा तरुण आहे. त्याच्या नजरेतून जगाकडं पाहण्याचा प्रयत्न करताना मलाही अनेक गोष्टी नव्यानं समजल्या.

या चित्रपटानं माझ्यात अभिनेता म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही काही बदल घडवले. आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात. पूर्वी त्या फक्त बातम्या म्हणून दिसायच्या, पण फ्रेम करताना त्या घटनांमागची माणसं, त्यांचं दुःख, संघर्ष आणि त्या सगळ्याची नोंद करणाऱ्या फोटो जर्नलिस्टची जबाबदारी याकडे मी अधिक सजगपणे पाहायला लागलो. जीवनातील छोट्या-छोट्या प्रसंगांकडे आणि माणसांच्या भावनांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.

मला वाटतं, एखादी भूमिका तेव्हाच यशस्वी ठरते, जेव्हा ती चित्रपट संपल्यानंतरही तुमच्यासोबत राहते आणि तुम्हाला काहीतरी शिकवून जाते. सिद्धार्थ ही माझ्यासाठी तशीच भूमिका आहे. या पात्रामुळं मी माझ्या अनुभवांकडे अधिक डोळसपणे आणि अधिक संवेदनशीलतेनं पाहायला शिकलो. कलाकार म्हणून हीच अशा भूमिकेची सर्वात मोठी कमाई आहे.

ईटीव्ही भारत : नागराज मंजुळे यांच्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव कसा होता? एक दिग्दर्शक म्हणून ज्यांचा तुम्ही आदर करता, त्यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम करताना काय शिकायला मिळालं?
अमेय वाघ : नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेलं जवळपास सगळंच काम मी पाहिलं आहे. त्यांनी संख्येनं फार कमी चित्रपट केले असले, तरी प्रत्येक कलाकृतीनं भारतीय चित्रपटसृष्टीवर खोलवर ठसा उमटवला आहे. नागराज मंजुळे हे याचं जिवंत उदाहरण आहेत की, कामाची संख्या महत्त्वाची नसते, तर त्याची गुणवत्ता आणि त्यामागचा प्रामाणिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

एका अर्थानं मी त्यांचा ऋणी आहे. 'फँड्री' आणि 'सैराट'सारख्या चित्रपटांनी केवळ त्यांना दिग्दर्शक म्हणून मोठी ओळख मिळवून दिली नाही, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अनेक नवीन दारं खुली केली. त्या चित्रपटांमुळं मराठी सिनेमाकडे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळं त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच खूप आदर आणि कुतूहल होतं.

मला नेहमी वाटायचं की कधीतरी त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळावी. ती इच्छा होती, पण ती इतक्या वेगळ्या पद्धतीनं पूर्ण होईल, असं कधी वाटलं नव्हतं. फ्रेममध्ये त्यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी अपेक्षेपेक्षाही अधिक समृद्ध करणारा ठरला.

दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात चांगला संवाद असतोच, पण दिग्दर्शक सेटवर सतत अनेक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतो. मात्र, दोन कलाकार एकत्र काम करत असतील, तर कॅमेरा बंद झाल्यानंतरही त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. मी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. शूटिंगच्या मधल्या वेळात, ब्रेकमध्ये आणि दिवसाचं काम संपल्यानंतरही मी शक्य तितका वेळ नागराज सरांसोबत घालवायचो.

मला नेहमी असं वाटतं की ते केवळ उत्तम दिग्दर्शक नाहीत, तर अत्यंत विचारशील आणि संवेदनशील माणूस आहेत. त्यामुळं मुद्दाम वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करायचो, त्यांची मतं जाणून घ्यायचो आणि त्यांच्या अनुभवांमधून शिकण्याचा प्रयत्न करायचो. या संपूर्ण प्रवासात मला केवळ एक चांगला सहकलाकार मिळाला नाही, तर एक उत्तम मार्गदर्शकही मिळाला. या अनुभवामुळं मी कलाकार म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही अधिक समृद्ध झालो, असं मी नक्की म्हणेन.