'गजनी' चित्रपटातील अभिनेता प्रदीप रावत यांच्यासारखे मराठी चित्रपटसृष्टीतील भीतीदायक खलनायक...
प्रदीप रावत यांच्या निधनामुळं चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे, आता अशाचं काही नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : August 6, 2026 at 1:01 PM IST
हैदराबाद : आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'गजनी'मधील अभिनेता प्रदीप रावत यांचं मंगळवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं. या बातमीनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण शोकाकुल झालं. या अभिनेत्यानं अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केलं आहे. त्यांनी मराठी,हिंदी , तेलुगू, पंजाबी, नेपाली, तमिळ आणि अशा अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आपल्या नकारात्मक भूमिकाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत एक छाप सोडली होती. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील शाकाल, मोगँबो पासून ते गब्बरपर्यंत अनेक खलनायकांनी प्रेक्षकांमध्ये एक भितीचं वातावरण निर्माण केलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीत देखील असे काही खलनायक आहे, ज्यांनी प्रेक्षकांची रात्रींची झोप उडवली. आज आम्ही अशा काही खलनायकांबद्दल तुम्हाला सांगणार आहेत.
तात्या विंचू : तात्या विंचू हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक गाजलेला खलनायक आहे. हॉलिवूड चित्रपट 'चाईल्ड प्ले'वरून प्रेरित असलेला तात्या विंचू हा 'झपाटलेला' चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून दिसला. या चित्रपटामधील तात्या विंचूची भूमिका गाजली, अनेक भाषांमध्ये हा चित्रपट यानंतर निर्मित करण्यात आला होता. तात्या विंचू जर या चित्रपटात नसता तर कदाचित मराठी सिनेसृष्टीतील एक अप्रतिम खलनायक हा प्रेक्षकांना पाहायला मिळाला नसता. गोड दिसणारा हा बाहुला दुसऱ्याच्या शरीरात जाण्याचा प्रयत्न करताना दिसत असतो. त्यांचा भीतीदायक मंत्र 'ओम भगनी भागोदरी भगमासे ओम फट्ट स्वाहा.' असून चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी तात्या विंचूची भूमिका साकारली आहे. जेव्हा ते एका चकमकमध्ये मरण्याच्या दारावर असतात, त्यावेळी ते आपला आत्मा एक बाहुल्यात टाकून जातात. यानंतर या चित्रपटामध्ये भीतीदायक खेळ सुरू होतो.
टकलू हैवान : लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या 'थरथराट' या चित्रपटातील खलनायक टकलू हैवान. हा खलनायक खूप भीतीदायक असून त्याचा टक्कल असलेला लूक खूप गाजला होता. या चित्रपटातील त्याचे संवाद खूप थरारक होते. त्याच्या गँगमधील सगळे टकले असल्यानं त्याच्या गँगला देखील नाव हेच देण्यात आलं होतं. त्याची हसण्याची स्टाइल देखील या चित्रपटातील अनोखी होती. त्याच्या बोलण्याच्या आणि हसण्याच्या हटके स्टाइलमुळं हा व्हिलन मराठी चित्रपटसृष्टीतील थरारक असल्याचे अनेकजण म्हणतात.
शाकाल : शाकाल म्हटल्यानंतर अनेकजण हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शान'मधील शाकालला आठवण करतात. मात्र मराठी चित्रपटातही असा एक शाकाल होता, जो खूप प्रसिद्ध आहे. 'टाइमपास' चित्रपटातील 'शाकाल' म्हणजेच प्राजक्ताचे पप्पा. ही भूमिका अभिनेता वैभव मांगले यांनी केली होती. यामधील त्यांचा अभिनय हा अनेकांना आवडला होता. या चित्रपटामधील त्यांचे प्रत्येक संवाद हे प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारे होते. 'हम क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे है' त्यांचा संवाद खूप प्रसिद्ध झाला होता.
इनामदार भुसनळे : 'पछाडलेला' चित्रपटातील खलनायक इनामदार भुसनळे. चित्रपटात ही भूमिका अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी केली आहे. त्यांची ही भूमिका इतकी गाजली की, अनेकांना ते प्रभावळकर आहेत हे शेवटपर्यंत कळलं नाही. त्यांच्या हातातला पाईप, मोठे डोळे, मिशा हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यांचा बाब्याला घाबरवण्यासाठीचा डायलॉग 'डोळे बघ डोळे बघ' हा खूप प्रसिद्ध झाला होता. त्यांचा 'सूड दुर्गे सूड' हा डायलॉगदेखील खूप गाजला होता.
गिधाड : लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, निवेदिता सराफ, विजय चव्हाण अभिनीत 1994 मध्ये आलेल्या 'माझा छकुला' यातील 'गिधाड' खूप थरारक होतं. 'गिधाड हा खलनायक प्रेक्षकांच्या मनात धडकी भरते. या खलनायकाची भूमिका बिपिन वर्ती यांनी साकारला होती. दरम्यान या चित्रपटातील व्हिलनचं लूक खूप भीतीदायक होतं. तसेच' गिधाड गँग' बँकेत दरोडा टाकते आणि लहान आदीला पकडण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटामध्ये छोट्या मुलाची भूमिका आदिनाथ कोठारेनं साकारली आहे.
कवट्या महाकाल : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रचंड गाजलेला खलनायक म्हणजे कवट्या महाकाल. महेश कोठारे यांनी कवठे महांकाल या सांगलीतील गावावरून खलनायकचं नाव ठेवलं होतं. चेहऱ्यावर कवटीचा मास्क घालून फिरणारा हा व्हिलन खूप भयावह असल्याचा पडद्यावर दिसतो. चित्रपटामध्ये खलनायकानं शेवटपर्यंत स्वतःचा चेहरा दाखवला नाही. 'धडाकेबाज' या चित्रपटात बाटलीतला गंगाराम हा लक्ष्मीकांतच्या प्रत्येक इच्छा जादूच्या रेतीनं कशी पूर्ण करतो आणि त्याला या खलनायकापासून कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो हे यामध्ये दाखविण्यात आलं आहे.

