सावधान! 'आमची कोणतीही जबाबदारी नाही', डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याआधी 'सेबी'चा सतर्कतेचा इशारा वाचा
सेबीने डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीबाबत अलर्ट जारी केला आहे. यामध्ये म्हटलंय की, डिजिटल सोनं आणि ई-गोल्ड उत्पादनं सिक्युरिटीज मार्केट फ्रेमवर्कमध्ये येत नाहीत, त्यामुळे त्यामध्ये धोका आहे.

Published : November 9, 2025 at 2:04 PM IST
नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या पद्धतीदेखील बदलत आहेत. दागिने, नाणी खरेदी करण्याव्यतिरिक्त आता डिजिटल गोल्डमधील गुंतवणूकही वाढत आहे. मात्र, यामध्ये फसवणुकीचा धोकाही कायम आहे. अशातच आता सेबीनं याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, डिजिटल गोल्ड आणि ई-गोल्ड उत्पादनं सिक्युरिटीज मार्केट फ्रेमवर्क अंतर्गत येत नाहीत. ही सेबी नियंत्रित गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावत्यांपासून वेगळी आहेत.
सेबीचा इशारा : सेबीनं सतर्कतेचा इशारा देत पुढे म्हटलं आहे की, सध्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म डिजिटल गोल्ड किंवा ई-गोल्डमध्ये गुंतवणुकीची ऑफर देताना दिसत आहेत. परंतु नियमन नसल्यामुळे यामध्ये गुंतवणुकीचा धोका आहे. डिजिटल गोल्ड सेबीच्या नियमनाच्या कक्षेत येत नसल्यानं डिजिटल गोल्ड किंवा ई-गोल्ड उत्पादनांमध्ये गुंतवणुकीदरम्यान काही गडबड झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास, सेबीकडून कोणतंही संरक्षण किंवा मदत मिळणार नाही.
डिजिटल गोल्ड म्हणजे काय? : डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं सोने खरेदी किंवा विक्री करू शकता. डिजिटल गोल्ड गुंतवणूक घरबसल्या मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सहज करता येते. सध्या याला खूप प्रोत्साहन दिलं जात आहे. यामध्ये तुम्ही किमान 1 रुपयापासूनही गुंतवणूक सुरू करू शकता आणि बाजारातील सोन्याच्या भावानुसार खरेदी किंवा विक्री करू शकता. अनेक डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म सेबी नियंत्रित नाहीत, अशा परिस्थितीत डिफॉल्ट झाल्यास तुम्हाला सेबीकडून कोणतंही संरक्षण मिळणार नाही.
गुंतवणुकीचे इतर अनेक सुरक्षित मार्ग : सेबीने सांगितलं की, जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर यासाठी आधीपासूनच अनेक मार्ग उपलब्ध आहेत, जे सेबीच्या नियमांच्या कक्षेत येतात आणि यामध्ये गुंतवणुकीला कोणताही धोका नाही. तुमची इच्छा असल्यास सेबी-नोंदणीकृत मध्यस्थांमार्फत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETFs), इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGRs) आणि एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्समध्ये गुंतवणूक करू शकता.
हेही वाचा

