अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम; सोनं-चांदी विक्रमी दराच्या दिशेने
देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2 लाखांच्या उंबरठ्यावर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. चांदीही साडेतीन लाखांच्या दिशेने झेपावत आहे.

Published : March 2, 2026 at 3:58 PM IST
|Updated : March 2, 2026 at 4:57 PM IST
- प्राजक्ता पोळ
मुंबई- अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावाने नवे वळण घेतलंय. तेहरानचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली असून, गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतलीय. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच स्पॉट गोल्ड 1.72 टक्क्यांनी वाढून 5,368 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. (एक ट्रॉय औंस म्हणजे सुमारे 31.10 ग्रॅम; म्हणजेच हा दर अंदाजे 31 ग्रॅम सोन्यासाठी असतो.) तर अमेरिकन फ्युचर्स दर 2.58 टक्क्यांनी उसळी घेत 5,382 डॉलरवर गेले. चार आठवड्यांतील हा उच्चांक मानला जातोय. देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2 लाखांच्या उंबरठ्यावर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. चांदीही साडेतीन लाखांच्या दिशेने झेपावत आहे. चांदी 1.68 टक्के वाढून 95.35 डॉलर प्रति औंस झाली. प्लॅटिनम 0.74 टक्के आणि पॅलेडियम 0.25 टक्के वाढले आहे.

...तर सोनं 6000 डॉलरवर जाण्याची शक्यता : सोन्याला कायमच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. यावर्षी सोन्यात आधीच मोठी वाढ झाली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत सुमारे 64 टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीतील ही वाढ अनेक कारणांमुळे होत आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत आहेत, गोल्ड ईटीएफ (ETF) मध्ये सातत्याने गुंतवणूक वाढत आहे आणि अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, अमेरिकेतील उत्पादक किंमत निर्देशांक (PPI) अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने महागाई वाढण्याची भीती निर्माण झालीय. याशिवाय रोजगाराशी संबंधित महत्त्वाचे आर्थिक अहवाल या आठवड्यात जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे लागलंय.
युद्ध असेच सुरू राहिले तर परिस्थिती बिघडू शकते : इंडियन बुलियन असोसिएशनचे सेक्रेटरी सुरेंद्र मेहता ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, “युद्ध सुरू झाल्यानंतर बाजार 5500 डॉलरपर्यंत गेलाय. नंतर तो थोडा खाली येऊन 5368 डॉलरवर आला. सध्या दर वाढण्याची हीच मर्यादा आहे. मात्र युद्ध दीर्घकाळ चालले तर बाजार 5800 - 6000 डॉलरपर्यंतही जाऊ शकतो. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. भारतामध्ये युरोपियन देशांतूनही सोन्याची आयात होते. सध्या देशात सोन्याचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे मागणी-पुरवठ्याची तातडीची अडचण नाही. पण युद्ध असेच सुरू राहिले तर परिस्थिती बिघडू शकते. बहुतेक सोन्याची वाहतूक विमानाने होते. एअरलाईन्स बंद राहिल्यास पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे युद्ध लवकर संपावे आणि परिस्थिती नियंत्रणात यावी, अशी अपेक्षा आहे.”
किरकोळ बाजारात सोन्याच्या किमती 2 लाखांवर जाणार? : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे भारतात सोने आणि कच्च्या हिऱ्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतेय. दुबईमार्गे होणारा पुरवठा विस्कळीत झाल्याने व्यापारावर परिणाम होऊ शकतो. दुबई हे भारतासाठी कच्च्या हिऱ्यांचे सर्वात मोठे केंद्र आणि सोन्याच्या बिस्किटांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार आहे. त्यामुळे तेथील अडथळ्यांचा थेट परिणाम भारतीय सराफा आणि रत्नव्यवसायावर होतो. भारत दरवर्षी सुमारे 800 ते 850 टन सोने आयात करतो. त्यापैकी तब्बल 50 ते 60 टक्के सोने दुबईमार्गे येते. तसेच, भारतातील मोठ्या हिरे पॉलिशिंग उद्योगासाठी लागणारे बहुतेक कच्चे हिरेही दुबईतूनच येतात. सध्या हवाई मार्ग बंद असल्याने पुरवठ्यात विलंब होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास देशांतर्गत बाजारात सोन्याची आणि पॉलिश हिऱ्यांची उपलब्धता कमी होऊ शकते आणि किमतीमुळे आणखी वाढ होऊ शकते.
सोन्याला ‘सेफ हेवन’ म्हटलं जातं : मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन ईटीव्ही भारतशी बोलताना सांगतात की, “जेव्हा जेव्हा युद्ध सुरू होते, तेव्हा शेअर बाजार कोसळतो आणि सर्व गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळतात. त्यासाठी सोन्याला ‘सेफ हेवन’ म्हटलं जातं. आता मध्यपूर्वेतील देशांमधून सर्वाधिक सोने भारतात येते. त्यावर युद्धामुळे रोख लागला आहे. जर हे असेच सुरू राहिले तर बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे सोन्याचा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव हा 2 लाखांपर्यंत तर चांदी 3.50 लाखांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे किरकोळ बाजारात सामान्य माणसाला सोनं घेणं कठीण होईल. पण सर्वाधिक गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवल्यामुळे हा भाव प्रचंड वाढणार आहे हे निश्चित.
सोन्याच्या किमतीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ : यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय. जानेवारीच्या अखेरीस झालेल्या विक्रमी उच्चांकानंतर दरात तीव्र घसरण झाली होती, मात्र आता पुन्हा सोनं प्रति औंस 5,000 डॉलरच्या वर स्थिरावलं आहे. सोन्याने सलग सातवा महिना वाढ नोंदवली असून, 1973 नंतरचा हा सर्वात मोठा तेजीचा कालावधी आहे. सततचे राजकीय आणि व्यापारी तणाव, डॉलरच्या अवमूल्यनाची भीती (डॉलर डिबेसमेंट ट्रेड) आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या स्वायत्ततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे सोन्यात गेल्या काही वर्षांपासून तेजी दिसत आहे.
हेही वाचाः
सोने झाले स्वस्त, 1.5 लाखांच्या खाली किंमत, तर चांदी 16 हजारांनी घसरली; आजचे दर जाणून घ्या

